व्यवस्थापन नावाचा बागुलबोवा

   कंपनीत काम करताना कर्मचाऱ्यांच्या साधारण काही फळ्या असतात. वरिष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ. कनिष्ठांचे साहेब म्हणजे मध्यम आणि मध्यमांचे साहेब म्हणजे वरिष्ठ. या वरिष्ठांना कधी कधी व्यवस्थापन असे म्हणतात. सर्व प्रकारचे महत्त्वाचे निर्णय हे व्यवस्थापन घेते. 
    कनिष्ठ अधिकारी साधारणपणे आपले साहेब सांगतील ती जबाबदारी पार पाडतात. एखाद्या कामाबद्दल ज्या काही अडचणी असतील त्या आपल्याच साहेबांना सांगायच्या असतात, हा संकेत असतो आणि तो बरेचदा पाळलाही जातो. कधी कधी काही मुद्दे हे मधले व्यवस्थापक नीटपणे ऐकून घेत नाहीत. नव्याने रुजू झालेले कनिष्ठ पातळीवरील उमेदवार महाविद्यालयातून नवी कौशल्ये शिकून आलेले असतात, त्यांच्यात काहीतरी करून दाखविण्याची उमेद असते, काही प्रयोग त्यांना करून पाहायचे असतात. ते काही प्रस्ताव ठेवतात पण त्यांना लगेच मंजुरी मिळत नाही. लगेच मंजुरी मिळायलाच पाहिजे, असे कोणीही म्हणत नाही पण काही मधले अधिकारी सकारात्मक वृत्तीने काम करत नाहीत. 'आहे हे असे आहे, त्यातच काम करा', ' तुमचा विषय वरच्या व्यवस्थापनाकडे पोचवला आहे, वरून जो निर्णय होईल तो होईल', 'आपल्या कंपनीत असे होत नाही. तुम्ही नवीन काहीतरी काढू नका',  ' तरी तुमची पिढी फार नशीबवान आहे, आम्ही कसे काम केले हे आमचे आम्हाला माहीत'...अशा असंख्य प्रकारच्या उत्तरांच्या 'तयार प्लेट’ त्यांच्याकडे तयार असतात. दरवेळी एक प्लेट दाखवली जाते. त्यात ' व्यवस्थापन मान्य करणार नाही' आणि 'आतापर्यंत असे झाले नाही' या पाट्या आघाडीवर असतात. अशा परिस्थितीत नवे नाउमेद होतात. एकीकडे ते शिकलेले असतात- सृजनशीलता दाखवा, स्वप्ने पहा, प्रश्न विचारा, करून बघा आणि वास्तवात हे ऐकावे लागते - हे जमणार नाही. व्यवस्थापन नाही म्हणेल. अर्थात,  या सगळ्याला सन्माननीय आणि सुंदर अपवाद असतातच.   
     माझ्या संदर्भातील दोन अनुभव नोंदवतो. मला माझ्या ग्रंथालयासाठी एक सॉफ्टवेअर बनवून हवे होते. माझ्या साहेबांकडे मी रीतसर प्रस्ताव पाठवला. मंजुरीची तशी मला घाई नव्हती. मी हळुहळू मागोवा घेत गेलो. ‘तुमची मागणी नवीन आहे’,  ‘बघू नंतर’,  ‘मला त्यावर विचार करण्यासाठी वेळ झाला नाही’, ‘सॉफ्टवेअर खरोखरीच हवे आहे का’ इत्यादी उत्तरे मिळत गेली. माझ्या लक्षात आले की, माझ्या साहेबांना त्यात फारसा रस नाही, विषयाचे फार आकलनही नाही. ते ही मागणी वर पोचवतच नाहीत. मी चिकाटी सोडली नाही. शेवटी मला साहेबांकडून असे उत्तर मिळाले - तुम्ही आता सरळ वरच्या साहेबांना भेटा. तेच निर्णय घेऊ शकतील. मी वरच्या साहेबांकडे गेलो, प्रस्ताव नीट दाखवला व अक्षरशः दहा मिनिटांत मला पुढील कार्यवाहीची मंजुरी मिळाली. मला माझ्या साहेबांनी मोकळेपणाने वरील साहेबांकडे जाण्याची सूचना केली, याचे श्रेय त्यांना द्यायलाच पाहिजे. 
    दुसऱ्या एका प्रकरणात, माझे साहेब निराळे होते. ग्रंथालयासाठी काही वातानुकूलन यंत्रणा, खुर्च्या व तदानुषंगिक गोष्टींची गरज होती. याहीवेळच्या साहेबांनी  - ‘बघू नंतर,  काय गरज आहे?’ ‘व्यवस्थापनाकडे विषय मांडावा लागेल’ असे सांगायला सुरुवात केली. मला अंदाज आला व मी सरळ वरिष्ठांकडे गेलो. हा  एक भला माणूस होता. त्यांनी ताबडतोब काही फोन करून संबंधितांना सूचना दिल्या. या प्रकरणात ‘वर जा’ अशी परवानगी मिळालेली नव्हती पण धाडस करून मी वर गेलो आणि हवे ते मिळाले.
     या दोन्ही प्रकरणात कसा प्रतिसाद मिळेल, अशी धाकधूक होती पण चांगली दखल घेतली गेली. 
    आपल्या वरिष्ठाला डावलून थेट वरच्या साहेबांकडे जाणे, हा चांगला संकेत मानला जात नाही. तरीही, कधीकधी वरच्या पातळीवर संपर्क साधून आपल्याला हव्या त्या गोष्टींना मान्यता मिळवता येते. यात संकेतभंगाचा धोकाही असतो. काही जण याला ' राजकारण’ म्हणतील, काही 'चांगले राजकारण’ असे म्हणतील. मनुष्यबळ व्यवस्थापन, माणसामाणसातले संबंध हा फार अभ्यसनीय आणि रंजक विषय आहे. त्या विषयावरची पुस्तके खूप छान रीतीने समजावून सांगतात. जोडीला मानसिकतेचा अभ्यास असेल तर दुधात साखरच. नव्या प्रस्तावांना लगेच मान्यता न देणाऱ्या लोकांची फार चूक असते असे नाही. त्यांचे बोलणे, वागणे बरेचदा त्यांच्या पूर्वानुभवांवर बेतलेले असते आणि त्यातून त्यांच्या काही धारणा बनलेल्या असतात. सुधारणांना या धारणा आडव्या येतात. क्वचित नव्यांना पुढे जाऊ न देण्याचाही सुप्त हेतू असू शकतो. मोठे साहेब, व्यवस्थापन या नावांचा बागुलबुवा उभा केला जातो आणि काही करून दाखविण्याच्या आकांक्षा कोमेजून जातात.
    माझ्या अनुभवांवरून मला असे वाटते की, ही वरची माणसे शेवटी माणसेच असतात. त्यांच्याशी चांगले संबंध ठेवले,  प्रस्तावांचा चिकाटीने पाठपुरावा केला, कोणालाही न दुखविण्याचे भावनिक व्यवस्थापन केले तर पुढील मार्ग सुकर होण्यास मदत होते.   
   
    या लेखाच्या निमित्ताने प्रतिसादकांचे अनुभव, त्यांची मते वाचायला आवडतील.