प्रावश

भोवताली दाटलेल्या आकाशात सैरभैर झालेलं असतं तुझं माझं आयुष्य. दोघांची मनं घिरट्या घालतात अवतीभवती. तुझी गरूडझेप आणि माझं स्वतःच्या अस्तित्वाभोवती घुटमळणं.

माझी समजूत घातलेली असते मी मला जमेल तशी पण कधीतरी बंड करून उठतं माझ्या डोळ्यांच्या पापणीत जपलेलं माझं आणि फक्त माझं स्वप्नं

तुझा हात हातात घेऊन मोठ्या अभिमानाने चालले होते मी सप्तपदी, दिली होती वचनं तुझ्यापासून काहीही न लपवण्याची. सगळीच होती फसवणूक आपण केलेली आणि  करून घेतलेली. खर्‍या संसारात बरंच काही लपवलं होतं. जाणूनबुजून नसेलही ते पण शेवटी फसवणूकच ती.

दोष कोणाचा याला अर्थ नव्हता. थोडं कमी जास्त असलं तरी भोगावं दोघांनाही लागलं. मी  एक चौकट आखली आणि तू उंबर्‍याभवती घुटमळत राहिलास. आत यावं की बाहेरंच थांबावं या विवंचनेत.