निवडणूकपूर्व अंदाजातून लक्ष्यभेद

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्या पक्षाच्या बाजूने कौल दिला, हे १९ ऑक्टोबरला स्पष्ट होईलच, तत्पूर्वी विविध वृत्तवाहिन्या आणि सर्वेक्षण करणार्‍या कंपन्यांनी त्यांचा निवडणूकीचा निकालपूर्व कौल जाहीर केला. त्यात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील, असे दाखविण्यात आले आहे. समजा १९ तारखेला भाजपला जास्त जागा मिळाल्यास आमचा अंदाज खरा कसा खरा ठरला, हे दाखवण्याची स्पर्धा या वृत्त वाहिन्यांमध्ये लागेल जर भाजपला कमी जागा मिळाल्या तर मात्र सर्वेक्षणवाले तोंडघशी पडतील.
इथे त्या त्या वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणाला आवाहन देण्याचा प्रयत्न नाही. परंतु, त्याचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. मुळात सर्वेक्षण कशा प्रकारे केले जाते हे समजून घ्यायला हवे. सर्वेक्षण हे गृहीतकावर अवलंबून असते. अर्थात त्यात Quantitative (संख्यात्मक) आणि Qualitative (गुणात्मक) हे घटक असतात. संख्यात्मक सर्वेक्षणाचा निष्कर्ष नेहमी आकड्यांमध्ये असतो. उदाहरणार्थ शिवसेनेला २८८ पैकी १२७ जागा मिळतील हे झाले संख्यात्मक तर गुणात्मक सर्वेक्षणात आकड्यांच्या मागील वास्तव किंवा कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ शिवसेनेला १२७ जागा कोणत्या आधारे मिळतील याचे गणित मांडले जाते. त्यात मतदारसंघात केलेली कामे, त्यांच्या नेत्याचा करिश्मा, पक्षाचा प्रभाव आदींचा विचार केला जातो. कोणत्याही सर्वेक्षणात काही नमुन्यांचे परीक्षण करून व्यापक निष्कर्षावर पोहचणे शक्य असते. जसे समजा दादर भागाचे सर्वेक्षण करायचे असल्यास तेथील काही नागरिकांची मते घेतली जातात आणि त्यातून निघालेला निष्कर्ष संपूर्ण दादर विभागाला लागू केला जातो. या ठिकाणी सर्वेक्षणाच्या नमुन्यांची निवड ही सर्वसमावेशक हवी. या पार्श्वभूमीवर निकालपूर्व कौलाचा मतदारांवर मारा करण्याचा प्रयत्नच केला जात आहे.  
एखाद्या भागाचे संपूर्ण सर्वेक्षण झाले तरी त्या भागातील मतदारांची बदलणारी मानसिकता लक्षात येऊ शकत नाही. झालेले सर्वेक्षण किती दिवस आधी झाले हे आज तरी सर्वेक्षण करणार्‍यांनी सांगितलेले नाही. समजा जे सर्वेक्षण एक महिना आधी झाले, तेव्हा मतदारांचा कौल वेगळा असू शकेल. तेव्हा युती आणि आघाडी अस्तित्वात होती. मतदानाला काही दिवसच शिल्लक असताना युती किंवा आघाडी तुटल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यामुळे मतदारांच्या मानसिकतेत बदल झाला नाही हे कौल दाखविणारे सिद्ध करू शकतात का? एखाद्या नेत्याची सभा त्या भागातील वातावरण बदलवू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या प्रमुख नेत्यांनी सभा घेतल्या आणि गाजवल्या. या नेत्यांचा जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. असे असताना जाहीर झालेल्या कौलामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता सर्वच पक्षांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त करणारा आहे. निकालानंतर कोणाचे नेतृत्व सक्षम आहे, ते दिसेलच. परंतु त्याआधीच कौल जाहीर करून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, कोणाचा पाठिंबा हवा हे सांगणे सुरू झाले आहे. ज्या प्रमाणे शिवसेना- भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटेल हे सांगता येत नव्हते. त्याच प्रमाणे निकालानंतर कोणते पक्ष एकत्र येतील हे सांगणे कठीण आहे. त्यानुसार कौल आणि त्या आधारे असणारे अंदाज याला अर्थ उरत नाही. सत्तेत कोण येणार ते मतदार सांगतीलच. कदाचित त्रिशंकू परिस्थिती असेल. परंतु, त्रिशंकूचा विचार होताना दिसत नाही.
एका विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या अडीच लाख अशी धरू, त्यात प्रमुख पक्ष पाच आणि इतर अपक्ष उमेदवार पाहता मत विभागणीचा अंदाज लगेच येऊ शकतो. असे असताना एकाच पक्षाच्या बाजूने वृत्तवाहिन्यांनी दिलेला कौल विचार करायला लावणारा आहे. कौलातून लक्ष्य भेदण्याचे काम झाले आहे. लक्ष्यभेद म्हणजे लक्ष्यावर अचूक नेम साधण्याची कृती. त्यामुळे सर्वांचेच लक्ष्य भाजपकडे केंद्रित करून वृत्तवाहिन्यांनी इतर पक्षांकडे काणाडोळा केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. देशात काँग्रेसविरोधी वातावरण होते. शिवसेना भाजप युती होती, त्याचा फायदा भाजपला झाला आणि देशात भाजपचे सरकार आले. यानंतर चार महिन्यांनी राज्याची विधानसभा निवडणूक झाली. निकाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र या निवडणुकीत ना युती आहे ना आघाडी त्यात महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आहे. याचा विचार करता सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत. मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होणार हे स्पष्ट आहे. असे असताना केवळ एकाच पक्षाला जास्त जागा मिळतील, असे विधान करणे योग्य ठरणार नाही. शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष राज्याच्या सर्व भागात पोहोचले आहेत. मात्र भाजप खरोखरच सर्व भागात पोहचला आहे का? हा संशोधनाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी लोकसभा मतदारसंघात जिथे भाजपचा उमेदवार उभा होता तेथील जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. त्यावेळी भाजपला शिवसेनेची साथ होती, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी १९ तारखेची वाट पाहणे आणि जनमताचा खरा कौल काय आहे, हे पाहणे सुज्ञपणाचे ठरेल.
राज्यात सरासरी ६४ टक्के मतदान झाले आहे. २००९ च्या निवडणुकीपेक्षा हा आकडा जास्त आहे. मोठ्या प्रमाणावर जेव्हा मतदान होते, तेव्हा ते सरकारविरोधी असते, असे ढोबळमानाने राज्यशास्त्रात मानले जाते. तसे मानल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीच सरकार विरोधात शिवसेना, भाजप आणि मनसे या पक्षांनी स्वतंत्रपणे लढत दिली आहे. असे असताना सरकारविरोधी लढणार्‍या भाजपच्या बाजूनेच निवडणुकीचा निकाल पूर्व कौल का झुकला आणि शिवसेना, मनसेच्या बाजूने का नाही? याबाबत विचार होणे महत्त्वाचे आहे.
कोणताही पक्ष जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत असतो. सत्ता मिळवणे हे त्याचे अंतिम ध्येय असते. त्यांचा नेता, पक्षाची विचारसरणी याचा मतदारांवर प्रभाव असतो. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात प्रचंड मेहनत घेतली. राज्यातील मतदारसंघ पिंजून काढले. या मेहनतीचे चीज १९ तारखेला दिसेलच. ज्याला जनतेचा आधार आहे, तो सत्तेत येईल पण त्या आधीच भाजप सोडल्यास सर्वच पक्षांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वृत्तवाहिन्यांनी चालवला आहे.