पेयपुराण

"आजकाल तो जरा जास्तच प्यायला लागलाय" आई एका शेजाऱ्या बद्दल सांगत होती आणि माझ्या मनात विचार आला की आपल्या मराठीमध्ये "पिणं "हे क्रियापद फारच बदनाम झालं आहे.

खरंतर जन्माला आल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट आपण करतो ती म्हणजे "पिणं"आणि मग मरेपर्यंत माणूस पीतच राहतो. माझ्या एका मित्राने तर परीक्षेत पिता या शब्दाचा अर्थ पिणारा (करतो तो कर्ता तसेच पितो तो पिता ) असं लिहून चांगलीच आफत ओढवून घेतली होती. असो. आता स्थूलमानाने (म्हणजे नेमके काय ते माहीत नाही पण म्हणायला बरे वाटते ) पेयांचा एक आढावा घ्यायचा म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आठवतात.

लहानपणी दूध सोडून बाकीच्या शीत पेयांच खूप आकर्षण वाटायचं आणि मग एखाद्या विशेष दिवशी आई बाबा हट्ट पुरवून गोल्ड स्पॉट नाहीतर थंब्स अप घेऊन द्यायचे. "आनंदी दिवस पुन्हा येथे, अंगठा वर " असे त्या जाहिरातीचे मराठी भाषांतर उत्साहाच्या भरात केल्याचे स्मरते. त्या शीत पेयांच्या बाटलीची बुचे एकत्र करून दुकानात दिली की सुनील गावसकर नाही तर कपिल देव यांचे हालणारे चित्र वाले पुस्तक मिळायचे. ते असले की शाळेत चांगलीच "शायनिंग " मारता यायची. मात्र ती एनर्जी म्हणजे तर लहान मुलांना फसवून दूध पाजण्याची युक्ती होती, आम्ही एकदा त्याला फसलो आणि मग शहाणे झालो दूरदर्शन वर रसना, रुह अफझा वगैरे जाहिरातींचा मारा सुरू झाला की समजायचे उन्हाळा आला! सुटीत तर रोज नवीन पेयाला न्याय -कधी पन्हं तर कधी वाळा घालून केलेलं सरबत. शहाळं, लिंबू सरबत, लस्सी, उसाचा रस वगैरे मंडळी पण हजेरी लावून असायची. उसाचा रस प्यायचा तर तो पुण्याच्या गणेशखिंड रस्त्यावरील शेतकी महाविद्यालयाच्या आवारातील दुकानात. अहो पन्नास पैशांत मोठा ग्लास भरून मिळायचा. दर वर्षी शाळेच्या शेवटच्या दिवशी आम्ही मित्र तिथे जायचो. रणरणत्या उन्हात सिंहगड चढून वाटेत थंड ताक पिण्याची मजा तर काही औरच. लग्नाच्या मंडपातला मट्ठा (नाही तो बोहोल्यावरचा नाही, वाटीतला हो ) जिलबीची रंगत अजूनच वाढवतो.

पेय प्रांतातल्या सुखाची परमावधी म्हणजे मस्तानी नाही तर आइसक्रीम घालून केलेले नेस्कॅफे शेक. (छोडो हर काम, पियो नेस्कॅफे शेक!! आठवतंय का? )

पुण्यात ठिकठिकाणी सरकारमान्य नीरा विक्री केंद्र दिसायची आणि तिथे उपवासाला नीरा चालते असं हमखास लिहिलेलं असायचं. खूप वर्ष नीरा म्हणजे देशी दारू सारखंच काही तरी प्रकरण असावं असे त्या "सरकारमान्य" शब्दामुळे वाटायचे.

पावसाळ्यात मात्र शीतपेय जाऊन औषधी पेयं काढा, गवती चहा आणि कधीतरी चमचाभर ब्रांडी अश्या रूपात समोर यायची आणि राग राग व्हायचा. अर्थात आलं घातलेला वाफाळता चहा आणि जायफळ घातलेली कॉफी यांच्यामुळे पावसाळा व हिवाळा सुसह्य व्हायचा. जायफळ घातलेली कॉफी पण नेहमी नसायची, कधीतरी कुणी चहा न पिणारं आले की मग कॉफी. मला अजूनही चहा पीत नाही पण कॉफी चालते या शहाणपणाचं कारण कळलेलं नाहीये. पण काहीही म्हणा कॉफी म्हणजे चहाची श्रीमंत बहीण असल्यासारखी वाटते. मित्रांबरोबर अमृततुल्याचा चहा चालतो पण मैत्रिणीबरोबर वैशालीमध्ये कॉफीच पितात. आजपर्यंत मी कुणालाही एखाद्या मुलीला चहाला येणार का असं विचारताना पाहिलेलं नाही!!

वर्षात एकदाच उत्साहाने दूध प्यायला होकार फक्त कोजागरीला. मिळतो. गच्चीवर केलेला गाण्याचा कार्यक्रम आणि मग मस्तपैकी आटवलेले दूध,

अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असताना शिंग फुटलेल्या मित्रांनी वाइन आणि बियर पिण्याची टूम काढली. गाडी पेयपानावरून अपेयपानाकडे वळली. ३१ डिसेंबरला कुणीतरी उत्साहाने पोर्ट वाइन घेऊन आले आणि सगळ्यांनी पिऊन तोंड वाकडे करत आवडली नाही तरी छान आहे छान आहे असं म्हटलं. काय करणार काही महिन्यात अमेरिकेला जायचे होते ना

माझे बाबा सेनादलातले निवृत्त अधिकारी त्यामुळे लहानपणापासून ओल्ड मोंक वगैरे मंडळी माझ्या डोळ्याखालून गेलेली पण त्यांना कधी हाताखालून घालण्याची इच्छा झाली नाही. अमेरिकेत आल्यावर मात्र कॅबेर्नेत, शिराझ, झालंच तर जेलो शॉट वगैरे मंडळींशी थोडीशी ओळख झाली. मार्गारीटा, तकीला व इतर कॉकटेलची वेगळी शान. त्यांच्या ग्लासच्या कडेला मीठ, साखर, तिखट वगैरे लावून अजून चवदार केलेले असतात. अर्थात पट्टीच्या पिणाऱ्या लोकांचे पान शिवास रिगल वगैरे शिवाय हलत नाही. असं म्हणतात की मेफ्लॉवर बोटीवर पाण्यापेक्षा बियर चा साठा अधिक होता आणि रोज प्रत्येक यात्रेकरूला (१६२० साली इंग्लंड हून अमेरिकेला जी लोकं मेफ्लॉवर बोटीतून आली त्यांना पिलग्रिम म्हणतात ) मोजूनमापूनच बियर मिळायची.

पाणी म्हणजे तर जीवन त्या बद्दल काय आणि किती लिहिणार? इथे बाहेर बर्फ असतांनासुद्धा जेव्हा उपहार गृहामध्ये ग्लासभर बर्फ आणि थोडेसे पाणी घालून देतात तेव्हाची माझ्या बायकोची चिडचिड पाहण्यासारखी असते. आयुष्याच्या अखेरीस सुद्धा गंगाजल पिऊनच माणूस जगाचा निरोप घेतो.

या सगळ्या स्थूलमानाने (अरे परत तो शब्द आलाच ) घेतलेल्या आढाव्याचा निष्कर्ष असा की प्रत्येक जण "पेताड"असतो. बोला काय म्हणता?