कधी वाटतं

कधी वाटतं
मी चंद्र व्हावं
आणि किरणांचे बाहू पसरून
तुला मिठीत घ्यावं

कधी वाटतं
मी ईवलासा पक्षी व्हावं
आणि तुझ्या नीलश्यामल घरट्यात
हळुवार विसावून जावं

कधी वाटतं
मी निळाशार सागर बनावं
रत्न मोत्यांची तू खाण तुला
मी माझ्यातच हुडकावं

कधी वाटतं
मी पारिजाताचं सुंदर मुग्ध फुल व्हावं
आणि तुझ्या स्पर्शानं
मी आणखीनच बहरून यावं

कधी वाटतं
मी तुझ्यातच विरून जावं
आणि तुझ्या गहिऱ्या डोळ्यात
स्वतःच स्वतःला शोधावं..