तीन विधाने

    नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला एक वर्षाहून अधिक काळ उलटलेला आहे. त्यांचे मारेकरी अजूनही सापडलेले नाहीत.
दाभोलकरांच्या हत्येनंतर लगेचच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा अाशयाचे विधान केलेः महात्मा गांधींची हत्या ज्या मानसिकतेतून झाली, त्याच मानसिकतेतून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झालेली आहे. यावर माझे मत असे की, महात्मा गांधींची हत्या हा राजकीय विषय होता आणि दाभोलकर अंधश्रध्दा निर्मूलनाशी संबंधित होते. दोन्ही हत्यांची तुलना अयोग्य आहे. 
     तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अशा आशयाचे विधान होतेः दाभोलकरांची हत्या हे आपल्या पोलीस दलाचे अपयश आहे. यावर माझे मत असे की, दाभोलकरांना सुऱक्षा देऊ केलेली असतानाही त्यांनी ती नाकारली. अशा स्थितीत त्यांची हत्या झाली, हे पोलीस दलाचे अपयश होऊ शकत नाही. सुरक्षा नाकारलेली असूनही पोलिसांनी चोवीस तास दाभोलकरांच्या भोवती रहावे, अशी अजित पवार यांची अपेक्षा होती की काय, हे समजलेले नाही. तसेही, पोलिस दलाच्या यशापयशावर हत्येनंतर काही काळ उलटल्यावर चर्चा होऊ शकते, ताबडतोब नाही.
    अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीतील आणखी एक नेते श्याम मानव यांनी हत्येनंतर काही भाषणांमध्ये अशा आशयाचे विधान केलेः दाभोलकरांचे मारेकरी सापडणे कठीण आहे. यावर माझे मत असे की, अशी टिप्पणी जाहीरपणे करणे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम करणारे ठरू शकते. 
   हत्येनंतर साहजिकच संशयाचे सुई हिंदुत्ववादी संघटनांकडे वळली. अद्याप तरी कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यक्तीचे नाव या प्रकरणात समोर आलेले नाही. पोलिसांना त्यांचे काम निःपक्षपातीपणे करु द्यावे. तपास सुरु झालाही नसताना किंवा सुरु असताना अशा प्रकारची विधाने करणे, हे पोलिस दलाच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करणारे तसेच दिशाभूल करणारे ठरू शकते. हे या तीनही 'समजूतदार' व्यक्तींना समजत नसावे का , असा प्रश्न सतत मनात येतो.