अवलिया कलाकार :स्व.झरीन दारूवाला

अवलिया

झरीनताई दारूवालांची सरोदवर फिरणारी बोटं अखेर कायमची थांबली!
काळाने काळजाचा आणखी एक तुकडा ओढून नेला.
ज्यांनी झरीनताईंना प्रत्यक्ष ऐकलं आहे त्यांना ती सरोदवर वाकलेली बुटकी मूर्ती आठवेल आणि भडभडून येईल.
त्यांची कृश शरीरयष्टी, भरजरी साडी,कुंकू आणि केसातला भरघोस गजरा पाहिला की त्या एखाद्या हळदीकुंकवाला निघालेल्या काकू वाटायच्या. ह्या काकू अवलिया सरोदवादक आहेत अशी शंकाही कुणाला आली नसती. सरोदसाररखं काहीसं अवजड वाद्य त्या कशा पेलतील अशी भीती त्यांना प्रत्यक्ष वाजवतांना पाहीपर्यंत मला सुध्दा वाटली होती. पण एकदा का त्या मंचावर स्थानापन्न होऊन सरोदवर झुकून वाजवायला लागल्या की सरोदच्या त्या मधुर स्वरांनी देहभान विसरायला लावत आणि श्रोत्यांना अनेक आश्चर्यकारक स्वरयात्रा घडवीत.
माधुर्य हा त्यांच्या वादनाचा स्थायी भाव! मी माझ्या श्रोतृजीवनात वादनातले जे काही अविस्मरणीय चमत्कार ऐकले आहेत त्यातले बरेचसे झरीनताईंकडून! त्या वाजवतांना क्वचितच वर पहायच्या आणि कधी तबलजीकडे तर कधी श्रोत्यांकडे पाहून मंद मिश्कील स्मित करायच्या.जाणकार श्रोत्यांना माहित असे की आता सावरून बसायचं कारण आता काहीतरी खास कानावर पडणार आहे.त्यांची रागविस्ताराची शैली केवळ अजोड होती.ऐकलेला राग त्यांच्याकडून पुन्हा ऐकतांना नवाच वाटे. ‘दरबारी’ वाजवावा तर त्यांनीच! त्यांचे सूर एकाच वेळी अवखळ व दर्दभरे दोन्ही! त्या पुढे काय वाजवतील याचा अंदाज बांधणे मी तरी त्यांना पहिल्यांदा ऐकल्यावरच सोडून दिले!!

पण झरीनताईंच्या मैफली इतर कलाकारांच्या मानाने मुळातच कमी व्हायच्या आणि त्यांचे ध्वनिमुद्रित संगीतही थोडेसेच आहे. पण त्यांची मैफल मुंबईत कुठेही असली तरी तास दोन तास प्रवास करून मी धडपडत जात असे आणि मैफल संपल्यावर त्या स्वरमंचावरून जाईपर्यंत त्यांना डोळे भरून पाहात असे. कारण झरीनताईंना पुन्हा केंव्हा ऐकायला मिळेल याची शाश्वती नसायची. त्यांच्या मैफलीत श्रोत्यात तेच ओळखीचे चेहरे दिसायचे... उशीराने का होईना धावतपळत येणारे व "फार वेळ नाही झाला न हो’ असं विचारणारेहि बरेच! माझ्यासाठी त्यांची सायनच्या ‘वल्लभ संगीत विद्यालया’तली मैफल शेवटची ठरली.
‘परवरीश’ मधल्या मुकेशच्या ‘मुझे तुमसे कुछ भी ना चाहिये’ च्या आधीचा सरोदचा काळीज चिरत जाणारा ‘पीस’ त्यांनी वाजवला आहे असे काल वाचण्यात आले आणि तो पीस तेंव्हा पासून सारखा काळजात वाजतो आहे!

आजकालच्या संगीताच्या गदारोळात असे अस्सल कलाकार विस्मृतीत न गेले तरच नवल.

अलविदा झरीनताई!!