बॅरिस्टरचं कार्टं - स्वच्छ, प्रांजळ आत्मकथन

डॉक्टर हिम्मतराव बावस्कर हे नाव आता अनोळखी राहिलेले नाही. विंचूदंशावर मूलभूत संशोधन, तेही प्रयोगांतून केलेले संशोधन, जागतिक पातळीवर त्यांच्या नावावर आहे. अर्थात हे 'लॅन्सेट' या जगद्विख्यात संशोधनपत्रिकेने इंग्लंडमध्ये बसून जाहीर केले तेव्हा आपल्याला कळले. त्याआधी इथल्या 'ज्येष्ठ संशोधकांनी' बावस्करांना कसा हिसका दाखवला होता हे वाचल्यावरच कळेल.
हे पुस्तक वाचायचे ते मुळात शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेल्या आणि शिकणे हेच आपले जीवनध्येय आहे याची जाणीव झालेल्या एका आत्यंतिक कष्टाळू व्यक्तीच्या जीवनाचे चक्र कसकसे फिरले हे जाणून घेण्यासाठी. शिक्षणासाठीचा बावस्करांचा अट्टाहास हा गंगाराम गवाणकरांच्या शिकण्याच्या हट्टाच्याच जातकुळीतला. भूगोल बदलला म्हणून मानसिकता बदलली नाही. त्यात नोकऱ्या संभाळून नाईटस्कूल या ऐवजी पोटाला चिमटे घेत (आणि सुटीत शेतात राबत) अखेर मेडिकल स्कूल एवढा बदल.
अजून एक बदल म्हणजे मेडिकल स्कूलला गेल्यावर (आणि पास झाल्यावर) आलेला नैराश्याचा झटका आणो मानसोपचारतज्ञाच्या देखरेखीखाली काढलेली दोनेक वर्षे. अखेर बावस्करांनी जिवाचा करार करून त्या गर्तेतून सुटका करून घेतली खरी. पण नंतरच्या काळात त्यांच्या संशोधनाला हिणवण्यासाठी "तो सायको आहे" अशी कुशल अफवापेरणी करणाऱ्यांपासून त्यांची सुटका झाली नाहीच.
बावस्करांच्या या पुस्तकात खेड्यात वाढलेल्या, उच्चभ्रू समाजात वावरण्याची सवय नसलेल्या, पण आपल्या बुद्धीमत्तेवर विश्वास असलेल्या एका भोळसर व्यक्तीने केलेले आपल्या आयुष्याचे शब्दांकन आहे. मग त्यात कुठे स्वस्तुती झाली असेल तर त्याचीही त्यांना "सभ्य समाजात असले करायचे नसते. स्वतःबद्दल चांगले बोलायचे नसते" असली जाण नाही. आणि नाही तेच बरे आहे. 'जे घडले ते सांगितले' या खाक्यामध्ये बावस्करांनी शालेय शिक्षण, त्यासाठी केलेली शरीरकष्टाची कामे, मेडिकल स्कूल, नंतरचे कृष्णावर्त, तिथून बाहेर पडून सरकारी नोकरीसाठी पुण्यातले वास्तव्य, सरकारी डॉक्टर म्हणून आलेले रंगीबेरंगी अनुभव, महाडसारख्या हवामानाच्या दृष्टीने कुग्रामात निष्ठेने पाय रोवून केलेली धडपड,  कधी समजून घेणारे तर बऱ्याच वेळेस आडवे जाणारे कुटुंबीय (आई-वडील-भाऊ-बहिणी आदि), त्यात खंबीरपणे मागे उभे राहिलेली पत्नी आणि अपत्ये, पहिल्या परदेशवारीचे अगदी गावंढळ माणसाला वाटावे तसे वाटलेले आणि ते तसेच लिहिलेले अप्रूप...
बावस्करांची तळमळ या सरधोपट लिखाणाला एक सुरेख चौकट पुरवते. दुसरा कुणीही हे असे काही लिहिता तर ते "अखिल पांढरा गणपती मित्रमंडळाच्या अहवाला"पेक्षाही जास्त रटाळ होते. पण बावस्करांचे सोनेच इतके बावनकशी आहे की त्याचा नाजूक-सुंदर गोफ करण्याऐवजी त्या सोन्याची लगडच जरी ठेवली तरी त्याचे तेज झळाळून उठते. तांब्या-पितळेस सोने सिद्ध करण्याच्या युगात असले खरे सोने विरळाच.
खंत एकाच गोष्टीची वाटते. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनिष्ट गोष्टींबद्दल बावस्करांनी खुल्या निर्भयपणे आवाज उठवला. काही वर्षांमागे पुण्यातल्या एका "सुप्रसिद्ध" रुग्णालयातून बावस्करांना तिथे सीटी स्कॅनसाठी रुग्ण पाठवल्याबद्दल हप्ता मिळाला. मुळात बावस्करांनी रुग्णाला "सीटी स्कॅन करावे लागेल" एवढेच सांगितले होते. कुठल्याही रुग्णालयाचा नावपत्ता दिलेला नव्हता. तरीही रेफरिंग डॉक्टर म्हणून बावस्करांचे नाव वाचल्यावर त्या रुग्णालयातून बावस्करांना धनादेश गेला. बावस्करांनी मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली.
पण पंतप्रधानांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन पाठवणाऱ्या आणि त्याबदल्यात पद्मभूषण लाटून बसलेल्या त्या रुग्णालयाच्या मालकावर काहीही कारवाई झाली नाही. इतर वेळेला 'सामाजिक भान' या नावाने उठसूट गळे काढणाऱ्या कुणाही पुरोगामी दुढ्ढाचार्यांना त्याबद्दल बोलावेसे वाटले नाही. आणि त्याबद्दल कुणालाही खंत वाटली नाही.
आता त्या रुग्णालयमालकाला भारतरत्न मिळायची मी वाट पाहतो आहे.

बॅरिस्टरचं कार्टं
डॉक्टर हिम्मतराव बावस्कर
मॅजेस्टिक प्रकाशन
प्रथमावृत्ती जानेवारी २००५
द्वितियावृत्ती जून २००५
तृतियावृत्ती नोव्हेंबर २००६
किंमत २०० रु