दैवतपंचक

गद्धेपंचविशित पोहोचल्यावर प्रेम-प्रेमभंग-फिरून यत्न वा प्रेम-लग्न-संसार वा कांदेपोहे-लग्न-संसार यापैकी एका मार्गाला लागणे ही माझ्या वेळी तरी प्रथा होती. यापैकी पहिला मार्ग मी अठराव्या वर्षीच दोन-तृतियांश तुडवला होता. उरलेला एक तृतियांश तुडवायला हरकत नव्हती पण तोवर मी हातचे सोडून पळत्यापाठी लागलो होतो आणि त्यामुळे 'इनएलिजिबल बॅचलर' या श्रेणीत पोहोचलो होतो.  दुसरा आणि तिसरा मार्गही अर्थातच 'नो एंट्री' झाला होता.
थोडक्यात, मी तसा मोकळाच होतो.
त्याच काळात मला जाणीव झाली की माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी पंचदैवते तोवर माझ्या आयुष्यात येऊन स्थिरस्थावर झाली आहेत.

भीमसेन जोशींचे चिरेबंदी स्वर लहानपणापासूनच ऐकत मोठा झालो होतो. पण पुण्यात आल्यावर त्यांच्या मैफली ऐकण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली आणि मी ती सोडली नाही. तशा मैफली इतरांच्याही खूप ऐकल्या. पण भीमसेन जोशींची मैफल म्हणजे एखाद्या आस्तिक माणसाने शुचिर्भूत होऊन पूजेला बसावे तसे काहीसे होते. लक्ष्मी-क्रीडा मध्ये वा रमणबागेत वा केसरीवाड्यात वा नूमवित पंधरावीस फुटांवरून त्यांना प्रत्यक्ष पाहत त्यांच्या स्वरांच्या धबधब्याखाली गुदमरून जाणे हा त्या काळात एक अवर्णनीय आनंद होता. विद्यापीठात शिकत असताना नित्रवर्य चंदूच्या (कै. पं. चंद्रकांत सरदेशमुख) कृपेने त्यांचे जवळून दर्शन आणि भेटी घडल्या. दर वेळी भेट झाल्यावर त्यांच्या नुसत्या दर्शनानेच मनकामना पूर्ण होत असे.

तसाच आधार मिळे व्यंकटेश माडगूळकरांच्या लिखाणातून. त्यांचे "पांढऱ्यावर काळे" तर पाठ झाले होते. त्याखेरीज त्यांचे हाताला लागेल ते पुस्तक त्यांच्या शब्दकळेने तसेच मंतरून टाकीत असे. त्या काळात मी एकदा त्यांच्या शैलीने मोहित होऊन तसे लिहायचा प्रयत्न केला. आणि एक पान लिहून झाल्यावर  शुद्धीवर येऊन ते पान फाडून टाकले. पण त्यांचे साहित्य वाचायची चटक जी लागली ती लागलीच.
तसे माझे इतर वाचनही लहानपणापासूनच बरे होते. इयत्ता तिसरीत असताना मी शेजारच्या विजयदादाने कपाटावर लपवलेली चंद्रकांत काकोडकरांची कादंबरी स्टुलावर चडून हस्तगत केली आणि प्रत्येक शंकेचे उत्तर वर्गातल्या बाईंकडे असते या समजुतीने भरवर्गात बाईंना "उन्नत उरोज" म्हणजे काय हे विचारले. उत्तरादाखल बरीच मारहाण झाली, पण ती तशीही होतच असे त्यामुळे काही वाटले नाही. अर्थ कळला नाही याचे वाईट तेवढे वाटले.
पण मोठेपणीच्या बऱ्याशा विस्तृत वाचनानंतर लेखकांमध्ये दोन प्रकार आहेत. एक व्यंकटेश माडगूळकर आणि बाकीचे इतर सर्व ही जाणीव तोवर रुजायला लागली. माडगूळकरांनी त्यांचा पाट पंगतीत अगदी पक्का ठोकून ठेवला.

माझे इंग्रजी वाचनही तेव्हा नुकतेच भरात आलेले होते. जेम्स हेरियट, रिचर्ड गॉर्डन यांपासून सुरुवात करत मी ग्रॅहॅम ग्रीन, डेव्हिड लॉज, जॉर्ज बर्नार्ड शॉ अशा उसळ्या मारीत होतो.
आणि मला 'लकी जिम' सापडली. लागोपाठ 'दॅट अनसर्टन फीलिंग' आणि 'टेक अ गर्ल लाईक यू'. तेवढे पुरेसे होते. किंग्जले ऍमिस यांनी आपली जागा कधी पटकावली हे कळलेदेखिल नाही. आणि ती जागा दैवतपंचकातली होती. त्यामुळे गेली पंधरा वर्षे मी त्यांचे काहीही वाचले नाही तरी ती जागा ते सोडणार नाहीत.

बालपणी सिनेमा पहायला लागल्यापासून लॉरेलऱ्हार्डी (ऊर्फ जाड्या-रड्या) आणि चार्ली चॅप्लीन हे लहान मुलांना दाखवायला सोयीचे असल्याने बहुतेक चित्रपट त्यांचेच पाहिले जात. त्या काळी चित्रपट बघण्याची सरासरी वर्षाला दोनतीन एवढीच असे.
पण चार्ली चॅप्लीन यांचे आत्मचरित्र वाचून मी त्यांच्या चित्रपटांच्या प्रेमात पडलो. म्हणजे पंचविशित. सर्कस, मॉडर्न टाईम्स, ग्रेट डिक्टेटर. सगळे सिनेमे सगळ्या दुनियेने डोक्यावर घेऊन लोकप्रिय केलेले. पण त्यांचे आत्मचरित्र वाचल्यावर मला त्या वरवर 'धमाल विनोदी' चित्रपटांतली एक वेगळीच बाजू जाणवली. नट-निर्माता-दिग्दर्शक-संगीतकार अशा वेगवेगळ्या भूमिकांत सफाईने वावरत त्यांनी जी अंतःकरणापर्यंत पोहोचणारी धमाल उडवून दिली की त्यांच्या दैवतपंचकातल्या जागेचे 'ऑक्युपन्सी सर्टिफिकेट' त्यांनी केव्हा हस्तगत केले कळलेच नाही.

१९८६ सालचा फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने आणि अंतिम सामना जागून पाहिले आणि सार्थक झाले असे वाटले. पण ते तेव्हा तसे सार्थक बऱ्याच गोष्टींनी व्हायचे. १९९०च्या सामन्यात रॉजर मिलाचा धिंगाणा आणि इटलीचा गोलकीपर झेंगाचा उपांत्य फेरीत उतरवलेला लेंगा लक्षात राहिला. पण १९९४च्या वर्ल्ड कपमध्ये कारकीर्दीचा अस्त होऊ घातलेला असताना, किंबहुना अस्त झालेला असताना, दिएगो मॅरादोना यांच्या चारदोन सामन्यांतच दिसलेल्या अस्तित्वात काहीतरी झपाटून टाकणारे होते. त्यांचे मैदानावर वावरणे, जखमी झाल्याचे सोंग करणे आणि एफेड्रीनच्या सेवनामुळे बाहेर पडल्यावर पत्रकार परिषदेत भैकूसारखे बरळणे. का कुणास ठाऊक, दुनियेला दिसले त्यापेक्षा मला त्यात काहीतरी वेगळे जाणवले. अर्जेंटिनाच्या झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास आता जीवघेणा झाला होता. आपली कला आता संपली आहे याची विदारक जाणीव झालेल्या कलाकाराने काहीतरी करून तिला जिवंत ठेवण्याची केविलवाणी धडपड मला आकळली. त्यांचे एकंदर कलंदर वागणे सभ्यतेला धरून फारसे नव्हतेच.
काय असेल ते असो. दिएगो अर्मांदो मॅरादोना फ्रँको यांनी दैवतपंचकातले आपले स्थान पटकावलेच.

इतर मंडळींनी या पंचकात घुसण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. पीटर सेलर्स, अलेक्झांद्र सोल्झेनित्सीन, आ ना पेडणेकर, वसंतराव देशपांडे, मिशेल प्लाटिनी या मंडळींनी चांगलीच मुसंडी मारली. इतकी, की दैवतपंचकासोबत एक 'अभिमत' दैवतपंचकही बाळगावे असा विचार मनात येऊन गेला. पण त्यात काही अर्थ नाही हे जाणवले.

या पाचांपैकी मी फक्त एकाला काहीवेळेस भेटलो. पण त्यावेळेस माझ्या आयुष्यात दैवतपंचक आलेले नव्हते.
स्थापना करतेवेळेसच एक हयात नव्हते. आता एकच हयात आहेत. आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचण्याची शक्यता मी मोहन मेकीन ब्रुअरीजचा अध्यक्ष होण्याच्या शक्यतेइतकीच आहे.

दैवतपंचकातले स्थान याचा अर्थ त्यांच्यावरची श्रद्धा मोजण्यामापण्याच्या कक्षेबाहेर आहे. ही सर्व मंडळी अगदी अस्तित्वातच नव्हती असे ठाम पुराव्याने सिद्ध झाले तरीही फरक पडणार नाही. माझ्या मनात पकडलेली  त्यांची प्रतिमा कुणी डागाळू शकणार नाही.
आणि म्हणूनच "गाणाऱ्याचे पोर" वाचून मी भारावलो, ती वेदना उमगून कळवळलो. पण म्हणून भीमसेन जोशी यांच्या दैवतपंचकातल्या स्थानाला काही धक्का मुळीसुद्धा लागला नाही.
आणि लागणारही नाही.