नवी सुरुवात

दुपारचे 12 वाजलेले असतात. पोलिसांची गाडी धूळ उडवत संतोषच्या झोपडीवजा घरासमोर येऊन थांबते. काही पोलीस आणी ठाणेदार तडकाफडकी गाडीतून उतरतात. संतोषच्या घरात शिरतात, कॉन्स्टेबल विचारतो," संतोष मेश्राम कोण आहे इथे?". अचानक आलेल्या आवाजाने घरातील सारेच दचकतात. संतोष आणी आबा जेवत असतात. संतोषला काहीच कळत नाही तरी पण उत्तर म्हणून," म्या हाय संतोष".
"अरे घ्या रे याला गाडीत", ठाणेदार उत्तरतो तसेच दोन कॉन्स्टेबल पुढे सरसावतात. संतोषला काहीच कळत नाही. सरिता मध्येच येते, विचारते "आवो, काय झालं, काय केलं ह्यानं इन्स्पेक्टर साहेब ?"
"ते तुम्हाला पोलीस स्टेशन मध्येच कळेल, घ्या रे त्याला", ठाणेदार खेकसतो.
संतोष गया- वया करू लागतो परंतु त्याचा पोलिसांवर काही एक परिणाम होत नाही. ते संतोषला उचलून गाडीत डांबतात आणी पोलीस स्टेशनकडे रवाना होतात. सरिता काळजीत पडते. घडलेला प्रकार काय आहे काहीच कळायला मार्ग नसतो. आबा मात्र शांत असतात. ते सरिताला धीर देतात. "मी हावो ना, जाऊन बघतो ठाण्यात, तू काई बी काळजी करू नको. तू घरीच राय, आलोच म्या संत्याले घेऊन". आबा आपली सायकल काढतात आणी पोलीस ठाण्याकडे निघतात. 
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील ‘कोळसा’ हे पाचसहाशे लोकसंख्येचं छोटंसं गाव. जवळपास सारेच लोक आदिवासी जमातीचे. तेंदूपत्ता गोळा करणं तसेच लाकडे गोळा करून ते शेजारील मुलं- सावली तालुक्यात नेऊन विकणे हा तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय. ‘लांजेवार’ हे गावातील श्रीमंत आणी पाटील व्यक्ती. त्यांचा लाकूड आणी बांबूचा मोठाच धंदा. संतोष मेश्राम हा अडाणी परंतु पीळदार शरीरयष्टीचा तरुण पोटापाण्यासाठी लांजेवार पाटलांकडे ‘गडी काम’ करीत असतो. जंगलातील लाकडे तोडणे, ते उचलून गाडीत भरणे इत्यादी काम तो रोजीने करीत असतो. संपूर्ण आयुष्यच जंगलात गेल्याने संतोषला त्या भागाची, तेथील जनावराची, झाडांची तसेच पक्ष्यांची चांगलीच जाण असते. ह्या सर्व गोष्टीची त्याला आवडही असते परंतु बेताची परिस्थिती आणी शिक्षण न झाल्यामुळे त्याच्या नशिबी गडीकामच येते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निमित्ताने गावात येणाऱ्या पर्यटक तसेच फॉरेस्ट अधिकाऱ्याला संतोष मदत करीत असतो.
व्याघ्र प्रकल्पाबाहेरील झाडे तोडून विकण्याचे कंत्राट लांजेपाटलांनी मिळविले असल्याने तेथील भागात लाकूडतोड सुरू असते. परंतु काही दिवसांपूर्वीच पाटलांनी आपला मोर्चा बफर क्षेत्राकडे वळविला असतो. खरंतर ह्या क्षेत्रात लाकूडतोड करणे कायद्याने गुन्हा असूनही जास्त पैशाच्या हव्यासापोटी पाटील ते काम आपल्या लाकूडतोड्या गड्यांकडून करवून घेत असतो. संतोष तसेच त्याचे साथीदार हे अडाणी असल्यामुळे आणी कायद्याच ज्ञान नसल्याने काहीच विरोध न करता मालक सांगेल तेथील लाकडे ते तोडत असतात. आणी ज्ञान असेलही तरी मालकाला विरोध करून स्वतःच्या पोटावर लाथ कोण मारून घेणार?
" काका, तुमच्या पोराने अवैध लाकूडतोड केली आहे. बफर क्षेत्रातील झाडे तोडणे हे कायद्याने गुन्हा आहे"
"साहेब, माह्या पोराले तेवढं नाई समजत हो, पाटील जे सांगीन थे काम थो करते. माफ करा साहेब त्याले". आबा हात जोडून इन्स्पेक्टरला विनवणी करतात. ठाणेदार काहीच ऐकण्याच्या मूड मध्ये नसतो. 
ज्या ‘गुलमोहर’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने ह्या अवैध लाकूड तोडीची तक्रार केली असते त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. तायडे तेथे उपस्थित असतात आणी हा सगळा प्रकार बघत असतात. ते आबाला गाठतात आणी सविस्तर चौकशी करतात. तेव्हा त्यांना कळते की संतोष आणी त्याच्यासारखेच अटक झालेले इतर तिघे हे तर फक्त पाटलाच्या सांगण्यावरून लाकडे तोडत आहे. म्हणजे खरा गुन्हेगार तर लांजेवार पाटील असतो तर संतोष आणी त्याचे साथीदार नाही . पाटील ह्या सगळ्या गोष्टीचा सुगावा लागताच फरार झालेला असतो. प्रा. तायडे सर्व हकीकत इन्स्पेक्टरला समजावितात आणी आपल्या 'गुलमोहर' संस्थेतर्फे जमानतीची रक्कम भरून संतोषसह इतर तिघांची पण सुटका करून घेतात.
पोलिसांच्या तावडीतून जरी सुटका झाली तरी आता आपल्या हातचे काम जाईल आणी उपासमार होईल ह्या चिंतेने संतोषला ग्रासले असते. त्याच्या सोबत झालेल्या संभाषणातून प्रा. तायडेंना संतोषमधील गुणांची जाणीव झाली असते. ते संतोषला त्यांच्या संस्थेत काम करण्याची तसेच ताडोब्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी गाईड म्हणून काम करशील का म्हणून विचारणी करतात. त्यासाठी चांगल्या मानधनाचीही हमी देऊ करतात.
हे ऐकून संतोषला आनंद होतो. नकळत त्याच्या मनातील निराशा दूर होते. पाटलांकडील सुटलेल्या कामाने रिकामा झालेला प्याला प्रा. तायडेंनी दिलेल्या संधीने अर्धा भरला आणि आता आपल्या कर्माने आणि मेहनतीने तो पूर्ण भरायचा असा एक आशावादी विचार संतोषच्या मनात नकळत तरळून जातो.
लेखाची लिंक- दुवा क्र. १