चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला

चांगला होता जरी हा "त्या"स कधि ना भावला
"चांगला असणे"च ह्याचा दोष "त्या"ला घावला ..
आज पटली त्या यमाला फार माझी थोरवी
श्वासही माझाच तो का पळवण्याला धावला ..
एक सदरा मी सुखाचा माणसाचा घातला
फाडण्याचा घाट त्यांचा का अती सोकावला ..
हाय ना मी फेडला पहिला नवस त्याचा कधी
क्षण सुखाचा मज मिळेना देवही रागावला
लेउनीया साज आली कामिनी थाटात ती
तेज बघुनी कामिनीचे साजही भारावला ..
.