त्याच्यासाठी

अजूनही ती तशीच आहे 
नाही हट्ट करीत ती कधी कशाचाच 
तिचे बाबा आणायचे तिच्यासाठी लोकलमधून कधी कानातल्या रिंगा 
कधी हातातल्या बांगड्या कधी गळ्यातील 
स्वस्त मिळायचे तेव्हा गाडीत 
तेच मुरलेय  का तिच्या मनात अजूनही 
लग्नानंतर तोही आणायचा तिला गजरा 
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तिन्हीसांजेला 
तेव्हा खुशीने दरवळत रहायची घरभर 
कितीतरी वर्ष बसायची सायकलवर बिन गर्दीच्या वाटेवर 
तळयाकाठच्या गर्द झाडीत नागमोडी वळणावर 
कधीतरी  गुणगुणायचा  तिच्या कानात 
सास तेरी मदिर मदिर जैसे रजनीगंधा 
तेव्हा ती मोहरून जायची आभाळभर 
तिला कधीच नाही वाटले बसावे त्याच्या बाईकवर 
कधी  हुंदडावे  उनाड होऊन 
कधीच नाही हट्ट केला तिने ह्याचा त्याचा 
ना  कधी रुसून बसली ना रागावली कधी त्याच्यावर 
किती वेळा वाटायचे त्याला काढावे डोळ्यातून पाणी तिने 
अलगद जवळ घ्यायला काहीतरी निमित्त हवेच ना …?
पण एकदाच आणि शेवटचे काढले होते डोळ्यातून पाणी तिने 
जेव्हा तिचा छकुला गेला तिच्या पासून खूप दूर 
आणि तोही कोसळून गेला होता खोल 
तेव्हाच तिने पुसून टाकले डोळ्यातून पाणी कायमचे 
फक्त त्याच्यासाठी …. 
प्रकाश