ऐश ट्रे!

ऐष-ट्रे!
न रिते पान कुठले, जुन्या या डायरीत आता … 
सर- सर सरणारे ऋतू,
"ओले-सुके"  
…… "बेरके !"
भरून गेलाय ऐष-ट्रे सुधा…. 
कधीचा!!!
व्यक्त-अव्यक्त भावनांची निराकार राख साचालीये त्यात. 
"विचार"; जे अर्धवट पण नव्हते पेटले, 
आणि,
चिरडले होते तसेच…. 
त्यांचीच काही थोटकं   साठलीयेत या ऐष-ट्रेमध्ये अजूनही!!!
"यामधून पुन्हा धूर यायलाच नको!"
याच हेतूने, रगडलेले काही मतले… काफ़िये…
ज्यांचे ओढले होते एक-दोनच कश… 
ते ही आहेत,
आणि;
माझ्या 'ब्रांड' ची नसलेली काही थोटकं, 'ठसका' लागून पहिल्याच कश मध्ये चिरडली होती जी क्रूरपणे… 
ती ही आहेत 
भावनांच्या आवेगामध्ये रात्रीच्या मनगटातून टपकणाऱ्या रक्ताळलेल्या आठवणी सुद्धा,
निपचीत पडल्या आहेत कधीच्या त्यामध्ये..
प्रसंगी धुंदीत तोडलेले चंद्राचे लचके, जे भिरकावले होते नशेतच या ऐष-ट्रे मध्ये,
येतोय त्यांचाही दर्प यातून!
काहींच्या नावाच्या काड्या आहेत यात,
ज्यांच्या स्मृतींमध्ये पेटवल्या होत्या काही चारोळ्या,
झाले तशे पुष्कळ दिवस, पण त्यांनाही आहे दर्प, "त्यांचा" असा स्वतंत्र!
प्रहराच्या या वळणावरती नवं असं काही सुचेल असं नाही वाटत आता...
शोधतोय कधीचा,
या ऐष-ट्रे मध्ये,
एखादा तरी झुरका मरता यावा इतक्या लायकीचे एखादे थोटूक..
तल्लफ आलिये,
तल्लफ आलिये!!!
_______________________________________________________________
गुलझार साहेबांची ऐष-ट्रे नावाची रचना वाचली, आणि मोह आवरला नाही!