सुसंवादिनी !!!

नमस्कार ... मी वरदा... दहावीत शिकतेय....

मी संवादिनी शिकतेय... मला गायनाचीही आवड आहे .... त्यामुळे शास्त्रीय संगीतातल्या मला आवडणाऱ्या काही रागांची नावं गुंफून मी एक छोटीशी कविता तयार केली आहे...



संधिप्रकाशात मी गात असते एखादा मारवा...




पण अचानक..... शुद्ध धैवताला कोमलतेची जोड देऊन,


रंगतो पूरिया धनाश्री ... !!!
निषादावरून कोमल रिषभावर संवाद करून,
तीव्र मध्यमाच्या वाटेवरून,
पुन्हा यावं शुद्ध गंधाराकडे...
मनाला लागलेली हुरहूर शमवताना,
तीव्र मध्यमाला जोड लाभावी... कोमल धैवताची !
शुद्ध निषादावरून,


तारषड्जावरून 
पुन्हा माघारी येताना,

मनाला लागलेली टोचणी कमी होते, 
ती तीव्र मध्यमावरून गंधाराची जोड दिलेल्या कोमल रिषभामुळे....
कधीकधी रंगविलेला पूरिया धनाश्री असाच अनोळखी राहतो...
अंतर्धान पावतो एखाद्या देवदूतासारखा !
मध्येच सुरू होतो स्वर्गीय सौंदर्य लाभलेला... झिंझोटी ... !!
खर्जषडजावरून थेट शुद्ध रिषभावर... 
आणि रिषभावरून शुद्ध मध्यमावर पोचून रंगते दुर्गा...
पण...
तारषडजावरून दिलेली  कोमल निषादाची जोड,
जागवते... शुद्ध खमाज ... !!
भिन्न प्रकृतीचे हे दोन राग पोटात घेऊन स्वतःचा नावलौकिक निर्माण करणारा... 
हाच झिंझोटी स्वर्गीय चेतना निर्माण करून जातो... 
आणि मग वाटतं...
आता थांबूच नये....