व्हॉट अबाऊट सावरकर?

आता अनेकानेक वेगळ्या विषयांना हात घालू पाहणारे चित्रपट निघताहेत. त्या श्रेणीतील हा असावा असे समजून काल ह्या चित्रपटाला गेलो.
सावरकर हा तसा कुणालाच न उमगलेला विषय. सावरकरांचा पराभव आधी त्यांच्या
पाठीराख्यांनी केला, मग विरोधक सरसावले. आता परत पाठीराखे त्यांचे तेरावे
घालण्यासाठी 'गोवंश हत्याबंदी विधेयक' घेऊन आलेत. 'गोमाते'च्या ह्या
'पुत्रां'चा विजय असो.
मुळात खेळ होईल की नाही याबद्दल तिथे पोहोचल्यावर साशंक झालो. कारण द्वाररक्षकाने पुरेसे प्रेक्षक नसल्यात "टेक्निकल फाल्ट व्हईल" असा आशीर्वाद दिला. पार्वती मल्टिप्लेक्स हे तसेही अशा 'फाल्ट'साठी प्रसिद्ध असल्याचे नंतर कळले. मी धरून चार डोकी होती. फाल्ट होणार असे वाटत असताना एक बाराचौदा महिलांचा गट कलकलाट करीत आत शिरला आणि खेळ सुरू झाला.
हल्लीचे मराठी चित्रपट पाहताना दृक आणि श्राव्य ह्या दोन्ही आघाड्यांवर किती सुखावह बदल झाले आहेत ते जाणवत राहते.
संगीत आणि ध्वनीसंयोजन यात झालेले बदलही स्पृहणीय.
पण ज्या जिवावर चित्रपट तयार होतो ते कथा-पटकथा लेखन मात्र तेवढेसे सुधारलेले नाही. 'बदलापूर' पाहताना ते जाणवले होते. ह्या चित्रपटातही त्याचा दांडगा प्रत्यय आला.
'सिनेमॅटिक/डायरेक्टोरिअल' लिबर्टी' नामक काही संकल्पना असते हे मान्य. पण प्रेक्षकांनी 'समजून' घ्यायचे म्हणजे किती?
कथासूत्र थोडक्यातः एका मोठ्या 'आयटी/इंफोटेक' कंपनीत नोकरी करणारा अभिमान मराठे. त्याची मणिपुरी असलेली प्रेयसी. घरी एक 'टिपिकल' आईवडील. आणि भयानक टेक-सॅव्ही आजोबा.
अभिमान एकदम रजनीकांतचा अवतार. रस्त्यावर थुंकला म्हणून बेस्ट बसचा पाठलाग करून तो थुंकणाऱ्याला उतरवतो आणि कानफटवतो. "माझ्या आईवर थुंकण्याचा अधिकार तुला कोणी दिला? " हा टाळ्याखाऊ संवाद.
तर असा हा अभिमान या धरतीतलावर आहे याची सुतराम कल्पना नसलेला कुणी एक अय्यंगार नामे केंद्रीय मंत्री सावरकरांचा अपमान होईल असे वक्तव्य करतो (हे वक्तव्य काय हे, आणि त्या अय्यंगारचा चेहरा झकास लपवले आहे) आणि अभिमान पिसाळतो. त्या मंत्र्याला चपलांचा हार घालण्याचा निश्चय व्यक्त करतो. हा निश्चय तडीस जातो का, त्या निश्चयात त्याला कोणकोण साथीदार सामील होतात ही ह्या चित्रपटाची कथा.
यात सध्याच्या वातावरणावर, विशेषतः सावरकर (वा कुठल्याही तत्सम विचारसरणीचा) एक 'इव्हेंट' करून त्याचा आपल्या राजकारणाला उपयोग करून घेणारे राजकारणी, 'मला काय त्याचे' छाप बहुजन, 'पुरोगामी' शक्ती यांना बरेच सुंदर फटके लगावले आहेत.
पण कथेचा जीव कमी असल्याने मग आमटीत दोडके नि बटाटे घालून तोंडमिळवणी करावी तशी इतर पात्रे आणि स्थळे येतात. पण त्या दोडक्यात नि बटाट्यात आमटीचा मसाला काही मुरत नाही. ते वेगळेच राहतात.
आणि सिनेमॅटिक/डायरेक्टोरिअल लिबर्टीचा अगदी अतिरेक झाला आहे.
अभिमानची मणिपुरी प्रेयसी सुरुवातीचा संवाद हिंदीत आणि नंतरचे सगळे स्वच्छ मराठीत. तिचे स्वप्न काय, तर मराठी घरातली सून होऊन सासूमागोमाग हिंडत तुळशीवृंदावनाला पाणी वगैरे घालणे. बरे ती बालपणापासूनच इथे असेल म्हणावे तर तिचे कुटुंब मणीपूरला.
अभिमान ज्या 'आयटी' कंपनीत नोकरी करतो ती 'मोठी' कंपनी आहे असे भासवण्यात येतो. आता निर्मात्याचा निधी कमी पडला की दिग्दर्शकाचा आवाका हे माहीत नाही. पण त्या कंपनीला मोठी 'आयटी कंपनी' म्हणणे अशक्य आहे.
आणि आयटी कंपनीत हाताखालच्या माणसाला बोलावण्यासाठी शिपाई वापरण्याची सरकारी पद्धत नसते. त्यासाठी फोन असतात.
अभिमानचे आजोबा एकदम टेक सॅव्ही. म्हणजे काय, तर फेसबुकवर 'लाईक्स' आणि 'कमेंटस' मोजणे हे काम ते निष्ठेने हातात आयपॅड घेऊन पार पाडतात.
अभिमान गिटार घेऊन एकदोन गाणी म्हणतो. गाण्यांच्या चाली वेगळ्या आहेत हे निश्चित. चांगल्या आहेत की नाही हा प्रश्न प्रत्येकाने सोडवावा. पण 'जयोस्तुते' या गाण्याची जनमानसांत रुजलेली चाल सोडून एकदम वेगळी 'पॉप' चाल लावण्याचा प्रयत्न नक्की सुखावह आहे.
पण जेव्हा घर सोडून भूमिगत व्हायची वेळ येते तेव्हा हे गिटार सोबत कशासाठी. सुरुवातीचे गाणे झाल्यावर अभिमानबुवा त्या गिटारला नखही लावत नाहीत.
एका तथाकथित 'वॉक-टॉक' कार्यक्रमाचे चित्रण आणि त्यातली प्रश्नोत्तरे जी दाखवली आहेत त्यापेक्षा बरी दृष्ये विद्यापीठाच्या मासकॉमच्या विद्यार्थ्यांच्या प्रॉजेक्टसमध्ये असतात.
ज्याच्या मागावर (म्हणे) पोलिस आहेत असा महापुरुष पाच दिवसांत मणिपूरला जाऊन, तिथे नायिकेबरोबर एक (गिटार न वाजवता) गाणे म्हणून अमृतसरला सुवर्णमंदिरात 'मथ्था टेकून' दिल्लीला पोहोचतो. पोलिस हे मठ्ठ दाखवण्याचा प्रघात आहे मान्य. पण इतका मठ्ठपणा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ताही करणार नाही!
आणि भाषाशुद्धीसाठी धडपडणारे सावरकर संवादलेखकाला माहीत नाहीत हे स्पष्ट आहे. अधूनमधून 'वंदेमातरम'च्या गंगाजलाने इतर इंग्रजी शब्द धुऊन निघत नाहीत.
आणि चित्रपटाच्या शेवटी सावरकरांचे जे थोडे काही उधृत केले आहे त्याचे शुद्धलेखन तपासून घेतले असते तर बरे झाले असते.
असे पटकथेतले मोठमोठे खड्डे चुकवत कशीबशी गाडी गंतव्य स्थळाला पोहोचते. खरेतर ती पोहोचते त्या स्थळाला गंतव्य स्थळ म्हणावे लागते.
आणि बाहेर पडताना मनात प्रश्न उमटतो - व्हॉट अबाउट सावरकर?