कोर्ट - एक वेगळा प्रयत्न

'वेगळ्या विषयांला हात घालू पाहणारा चित्रपट' असे समजून 'व्हॉट अबाऊट सावरकर' पाहिला आणि बराचसा पस्तावलो. पण 'कोर्ट' हा चित्रपट मात्र विषय फारसा वेगळा नसला तरी मांडणी अगदीच वेगळ्या धाटणीची असलेला चित्रपट आहे.
तो 'चांगला' आहे का हा वैयक्तिक आवडीनिवडीचा मुद्दा झाला. पण जी 'वेगळी मांडणी' त्यात केलेली आहे ती निश्चितच स्वागतार्ह आहे. थोडे पुस्तकी वाक्य वापरायचे झाले तर 'तो वेगळा आहे म्हणून चांगला आहे असे नव्हे, तर तो वेगळा आहे हे चांगले आहे'.
कोर्ट हा परिसर चित्रपटांतून अनेकदा येऊन गेलेला आहे. काही चित्रपट तर 'कोर्टरूम ड्रामा' असे लेबल लावून खपवले गेले. एकंदरीतच कोर्टरूम दाखवायची म्हटली की आठदहा फूट उंचीवर बसलेला न्यायाधीश, खाली फिर्यादी-आरोपींच्या पिंजऱ्यांत चांगली पन्नासेक फूट जागा, ज्यात येराझाऱ्या घालत उभयपक्षी वकीलमंडळींना डायलॉगबाजी करण्याची सोय, प्रेक्षकवर्ग बराच मागे, न्यायाधीशाच्या हातात लाकडी हातोडा, न्यायाधीशाच्या मागची छायाचित्रे आणि न्यायदेवतेचा हातात तराजू घेतलेला स्टॉक पुतळा. कुठल्याही फिल्म कंपनीच्या प्रॉडक्शन मॅनेजरला तोंडपाठ झालेली यादी.
आणि वकील म्हणून टाळ्याखाऊ आणि भावनांना हात घालणारे संवाद फेकण्यात पटाईत (चांगल्या बाजूचे वकील) वा शुद्ध हलकट दिसणारे आणि तशीच संवादफेक करणारे (वाईट बाजूचे वकील). हो, आपल्याला चित्रपटातल्या कोर्टात 'खरी' आणि 'खोटी' बाजू बघण्याची सवय नाही. कोर्टातल्या कायद्यापेक्षा गल्लापेटीतला फायदा जास्त महत्त्वाचा असल्याने प्रेक्षकांनाच सुपर-जज्ज म्हणून नेमण्यात येते आणि ते बिचारे दिग्दर्शक मांडेल ते मिटक्या मारीत चघळतात.
या सर्व पार्श्वभूमीवर 'कोर्ट' बघायला गेलो आणि सुखद धक्का बसला.
एक तर या चित्रपटाबद्दल फारसे ऐकलेले नव्हते. त्याला बरीच पारितोषिके आहेत अशी कुजबूज कानी आली होती ती कानाआड केली होती. तसेच तो खूप 'स्लो' आहे असेही कुणीतरी पुटपुटले होते. हे बाकी मला काही कळत नाही. कुठल्याही चित्रपटाची गती 'मिनिटाला चोवीस फ्रेम' एवढीच असते, मग ही 'स्लो' भानगड कुठून येते?
थोडक्यात, चित्रपट सुरू होताना माझी पाटी जवळपास कोरी होती.
आणि त्या पाटीवर एक छानसे मुक्तहस्त चित्र चितारले गेले.
कोर्टातल्या एका खटल्याची कथा असे ढोबळमानाने कथानक. पण ती कथाही 'पूर्ण' नाही. अटकेपासून सुरू होते आणि कुठल्याही ठाम ठिकाणाला पोहोचण्याआधीच विसावते. बचावपक्षाचा वकील, सरकारी वकील आणि न्यायाधीश यांच्याकडे, त्यांच्या वैयक्तिक जीवनासकट, वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून पाहण्याचा प्रयोग असे म्हणता येईल.
त्या अटकेपाठीचे कथानक फार सविस्तर दाखवले आहे असे नाही.
एका शाहीराला (चुकलो, 'लोकशाहीरा'ला) अटक होते. नेहमीची कारणे - सामाजिक शांतता भंग इ. आहेतच, पण 'आत्महत्येला प्रवृत्त करणे' हे हुकुमाचे पान.
बचावपक्षाला वकील मिळतो तो मराठी फारसा न उमजणारा गुजराती. त्यामुळे चित्रपट मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती असे चारही भाषांतील संवाद मिरवतो. पण 'फेस्टिवल सर्किट'मधला चित्रपट असल्याने खाली इंग्रजी सबटायटल्स आहेत.
या चित्रपटाला मिळालेली बक्षीसे इ हे लिहायला घेताना वाचले. आधी वाचले नाही हे योग्य केले. कारण एवढी पारितोषिके म्हणजे 'बसवलेला गणपती' असणार म्हणून टाळलाच असता आणि नुकसान झाले असते.
चित्रपटात खटकणाऱ्या गोष्टीही आहेत. विशेषतः बचावपक्षाच्या वकिलाचे पात्र. मराठी अर्धवट समजणारे असे हे पात्र का रंगवले असेल बरे? हे पात्र साकारणारा अभिनेताच या चित्रपटाचा निर्माता आहे हा योगायोग असेल का?
पण ही एक छोटीशी अडचण आहे. बाकी पात्रयोजना अप्रतिम आणि चपखल आहे. तसा योग याआधी सामना आणि सिंहासनमध्येच आला होता. विशेषतः उषा बने या अभिनेत्रीने जे काही केले आहे त्याला तोड नाही. या अभिनेत्रीचे खास नाव घेतले, पण इतर तिच्याहून खूप मागे आहेत असे नव्हे. एकोणीस-वीसचाच फरक. कदाचित एकोणीस-साडे एकोणीसचाही असेल. विरा साथीदार, गीतांजली कुलकर्णी आणि प्रदीप जोशी. आणि ज्यांची नावे सहज उपलब्ध नाहीत अशी इतर छोटी पात्रे. पात्रयोजना आणि त्यांनी केलेला अभिनय याबद्दल अजून लिहिणे व्यर्थ आहे. प्रत्यक्षच अनुभव घ्यावा.
यातली गाणी ही खरोखर त्याविना कथा पुढे सरकली नसती म्हणूनच येतात ('कथानकाची गरज' म्हणून येतात असे म्हणणार होतो, पण हा शब्द इतका अतिवापराने गुळगुळीत झालेला आहे की तो वापरण्याचीही शिसारी येते). आणि दृक वा श्राव्य या दोन्ही प्रकारे काहीही अत्याचार न करता संपतात.
चित्रीकरणाचे स्थळे हा अजून एक सुखद अनुभव. काही वेळेस प्रकाशयोजना उगाचच अंधारलेली वाटते, पण अशा वेळा खूप कमी.
चित्रपटात एकंदरीतच एक कथानक घेऊन ते पूर्णत्वास नेले आहे असे नसल्याने वेगवेगळ्या रंगीबेरंगी धाग्यांतून एक छानशी नक्षी करावी तसे काहीसे वाटते. चित्रपट संपतो तो क्षण अजून आधी आणता आला असता (असे माझे मत).
पण चित्रपट पाहून चार दिवस झाले तरी तो पहायला गेलेल्या दोस्तमंडळींत त्याबद्दल अजून विचारविनिमय आणि चर्चा चालू आहे. आणि हे गेल्या बऱ्याच वर्षांत घडले नव्हते!