एकमेव

      नेली हार्पर ली या लेखिकेची "To kill a mocking bird" ही पहिलीच आणि एकुलती एकच कादंबरी  तिच्या वयाच्या ३५ व्या वर्षी म्हणजे ११ जुलै १९६० मध्ये प्रकाशित झाली आणि लगेचच १९६१ मध्ये साहित्यविश्वातील सन्माननीय पुलित्झर पारितोषिक ही तिला मिळाले. शतकातील सर्वोत्कृष्ट कादंबरी असाही १९९९ मध्ये तिचा गौरव करण्यात आला.अमेरिकेतील वर्णभेदावरील तिच्या काळात तिला अनुभवास आलेल्या सत्यस्थितीचा अतिशय सहज आविष्कार त्या कादंबरीची नायिका असणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीच्याच भाषेत लिहिलेल्या या कादंबरीत करण्यात आलेला आहे.त्यामुळे ५ नोव्हेम्बर २००७ या दिवशी  राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या हस्ते अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान असलेले Presidential medal of freedom देऊन तिचा सन्मान करण्यात आला.राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडूनही तिला गौरवण्यात आले ते २०१० मध्ये या कादंबरीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल.
         १९६२ मध्ये लगेचच या कादंबरीवर बनवण्यात आलेल्या चित्रपटात कादंबरीची नायिका स्काउट इच्या वडिलांची म्हणजे ऑटिकस फिंच या प्रमुख व्यक्तीची व्यक्तिरेखा "ग्रेगरी पेक " या नावाजलेल्या अभिनेत्याने सादर केली.ऑटिकस फिंच हा पेशाने वकील असतो व कादंबरीत तो कृष्णवर्णीय व्यक्तींवरील अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढाई करतो. ग्रेगरी पेक हा अभिनेताही व्यक्तिगत आयुष्यातही सामाजिक जाणीव असलेला होता ही बाब महत्त्वाची.
       हार्पर लीचा आज ८९ वा जन्मदिवस आहे आणि तिच्या ८८ व्या जन्मदिनी आपण आपली दुसरी कादंबरी " गो सेट अ वॉचमन "१५ जुलै २०१५ मध्ये प्रकाशित करणार आहोत असे तिने जाहीर केले आहे. ती कादंबरी तिने पहिल्या कादंबरीनंतर लगेअ लिहिली होती पण प्रसिद्ध करण्यास नकार दिला होता.पहिल्या कादंबरीतील स्काउट मोठी झाल्यावर घडलेला कथाभाग त्यात आहे. पण आज तरी तिच्या नावावर एकच पुस्तक आहे. 
     फक्त एकच कादंबरी लिहून अशीच प्रसिद्ध झालेली दुसरी लेखिका म्हणजे "गॉन विथ द विंड " या कादंबरीची लेखिका मार्गारेट मिचेल.१९३६ मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली आणि १९३७ चे पुलित्झर पारितोषिक तिला मिळाले व अजूनही  बायबलच्या खालोखाल त्या कादंबरीचा खप आहे असे म्हणतात. याही कादंबरीवर १९३९ मध्ये चित्रपट निघाला व त्यात क्लार्क गेबल आणि विव्हियन ली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या कादंबरीनंतर लेखिहेने लेखनसंन्यासच घेतला.
    याच परंपरेतील तिसरी लेखिका म्हणजे "वुदरिंग हाइट्स Wuthering Heights" लिहिणारी एमिली ब्रॉन्टे ! ही कादंबरी तिने १८४५ व ४६ या काळात लिहिली व ती १८४७ मध्ये प्रकाशित झाली.त्यावेळी ती  गाजली पण वेगळ्याच पद्धतीने म्हणजे तिच्यावर त्यामध्ये दाखवण्यात आलेल्या क्रूरपणाबद्दल टीकाच झाली होती. तरी आता तिची गणना  Old Classics" मध्ये होते. याही कादंबरीवर चित्रपट निघाला पण तो फार उशीरा म्हणजे १९३९ मध्ये आणि त्यात लोरेन्स ऑलिव्हिए व मर्ले ओबेरॉन यांनी प्रमुख भूमिका केल्या .एमिली कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर एकच वर्ष जगली आणि त्यामुळे तिच्या हातून दुसरी साहित्यकृती झाली नाही असे म्हणता येईल कारण तिची बहीण शर्लोट हिची "Jane Eyre " ही एकच कादंबरी गाजली तरी तिने आणखी तीन पुस्तके लिहिली होती.
     मराठी भाषेत अश्या एकच पुस्तक लिहून प्रसिद्ध झालेल्या लेखिकाच सापडतात. त्यातील बहुतांशी आत्मचरित्रेच आहेत.त्यातील एक म्हणजे "स्मृतिचित्रे " कार लक्ष्मीबाई टिळक.वयाच्या केवळ सहाव्या वर्षी रे.ना.वा.टिळक यांच्यासारख्या कविमनाच्या पण लहरी पतीबरोबर व अगदी जुनाट ब्राह्मणी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना असलेल्या घरात  लग्न होऊन आलेल्या लक्ष्मीबाईंनी लग्नानंतर अक्षरओळख करून घेऊन  लिहिलेले हे आत्मचरित्र म्हणजे मराठी भाषेचे लेणेच असून  पुढे त्या साहित्याचे कौतुक करताना आचार्य अत्रे यांनी त्यांना साहित्यलक्ष्मी म्हणून गौरविले.
     ज्याकाळी महिला घराबाहेर पडत नसत त्याकाळी एक बाई १९३३ सालच्या कवी संमेलनाची स्वागताध्यक्षा होऊन आपल्या धारदार भाषणाने कवी संमेलन गाजवते ही आश्चर्याचीच गोष्ट होती .स्मृतिचित्रे चार भागात प्रथम १९३४ ते ३७ या काळात प्रसिद्ध झाले. याशिवाय लक्ष्मीबाई टिळकांनी बऱ्याच भावोत्कट कविताही लिहिल्या आणि रे.टिळकांचे ख्रिस्तपुराण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पूर्ण केले.
    याच मालिकेतील आणखी एक उल्लेखनीय आत्मचरित्र म्हणजे रमाबाई रानडे यांचे "उंच माझा झोका" या मालिकेमुळे सर्वांना परिचित झालेले "माझ्या आयुष्यातील आठवणी" हे होय.अर्थात साहित्य या दृष्टीने त्या पुस्तकाकडे कितपत पहाता येईल हा प्रश्नच आहे.
     केवळ एकच पुस्तक लिहून त्यामुळेच प्रसिद्ध झालेले मराठीतील एक लेखक म्हणजे "नाट्यछटाकार दिवाकर " दिवाकरांनी काही कथाही लिहिल्या होत्या.पण त्यातील एकच जुन्या पाठ्यपुस्तकात आढळते. ती म्हणजे "अहो मला वाचता येते " ही एक वाचकास अतिशय चुटपुट लावणारी कथा आहे.