उगाचच ….

दाखवू का मी तुला माझी ती कविता 
आपल्या जुन्या दिवसाची  
कदाचित आठवतील  तुला माझ्या कवितेत काही तुझे संदर्भ
जेव्हा मी झुलत होतो तुझ्या भोवती 
आठवले तर बरे वाटेलही कदाचित तुला 
आज सापडली म्हणून तुला विचारतो आहे  
रागावणार तर नाहीस ना …. ?
तेव्हा फिरलो होतो तुझ्या बरोबर 
कळत न कळत हातात हात घालून 
तिन्ही सांजेला तळ्याकाठी
मी घेतला होता तुझा हात माझ्या हातात
जसा आज मी घेतलाय….  
आणि तूही दिलास  अलगद हात नकळत 
जसा तेव्हा दिला होतास
किंवा मी घेतला होता 
नाही सोडवून घेतला तेव्हा तू तुझा  हात  
कुठल्याशा आर्त ओढीनं …?
जसा आज माझ्या हातात आहे तुझा हात सहज मायेनं   
तेव्हा तू  बघत बसली होती तिन्हीसांजेला पाखरांची भिरी 
उगवतीचा चंद्र 
आणि ती चांदणी 
आज तशीच बघत बसलीस तिन्ही सांजेला पाखरांची भिरी 
तिन्हीसांजेला 
चंद्राकडे न बघता …। 
काहीशी खिन्न ….  
आज मात्र जाणवून गेले तुझे खरखरीत तळहात
आपल्या संसारात राबून गेलेले 
अचानक  आठवून गेले तुझे  ते तळहात  
नि त्याचा रेशीम  स्पर्श 
हरवून गेलेला 
उगाचच …
प्रकाश