अगंबाई अरेच्चा भाग २ - व्यर्थ खटाटोप

केदार शिंदे या माणसाने मराठी चित्रपटसृष्टीत काही बरे प्रयोग केले होते. "अगंबाई अरेच्चा" हा त्यातला एक प्रयोग. 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'माझा नवरा तुझी बायको' हे चित्रपट पठडीतले नसल्याने ठाकठीक होते.
दूरचित्रवाणीवर दिसणाऱ्या बहुतेक मांसाहारी पाककृतींमध्ये 'बारीक चिरलेला कांदा' हा कढईमध्ये घालण्याचा पहिला घटकपदार्थ असतो. तसे केदार शिंदेच्या चित्रपटात 'भरत जाधव' हा ठरलेला घटक असतो. पण तेही असो. भरत जाधव हा नट म्हणून वाईट नाही. निदान केदार शिंदेच्या चित्रपटांत.
अगंबाई अरेच्चा या केदारच्या पहिल्या चित्रपटात भरत जाधव नाही. संजय नार्वेकर, दिलिप प्रभावळकर, शुभांगी संगवई अशी नंतर त्याच्या चित्रपटांतून न दिसलेली नामावळ आहे. तो चित्रपट बराचसा जमलेला होता, सोनाली बेंद्रेचे गरज नसलेले 'आयटेम साँग' सोडता.
त्याचा भाग दोन, अकरा वर्षांनी, सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत. फार (वा थोडे) महत्त्वाचे कुठलेही काम नव्हते. भर दुपारी बारा वाजताचा शो पकडला.
आणि संपूर्ण पश्वात्ताप पावलो.
पहिल्या चित्रपटात बायकांच्या मनातले बोलणे ऐकू येणाऱ्या श्रीरंग देशमुखची कथा छानछोट्या टपल्या मारत मांडली होती. शेवटचा बाँब पेरण्याचा भाग थोडा जास्तच होता, पण खपला.
या भागाचा त्या भागाशी काडीमात्र संबंध नाही.
किंबहुना या भागाचा आणि विचारशक्तीचाही काही संबंध नाही.
शुभांगी कुडाळकर ही एक लग्न न होणारी तरुणी. कारण काय, तर ती कुणाच्या दुहेरी प्रेमात पडली आणि तिने त्या मुलाला स्पर्श केला तर स्पर्श केल्यापासून चोवीस तासांत (पण प्रत्यक्षात एकाददोन तासांत वा काही मिनिटांतच) त्या मुलाचा अपघात होतो. कारण काय, तर "अष्टमात शनी की मंगळ युती आहे की काहीतरी".
हिला लग्न समारंभांत (अर्थात दुसऱ्यांच्या) सामील होण्याची आवड. आणि लोकांना हिला टाकून बोलण्याची आवड. एका अशा लग्नसमारंभात ही सिद्धार्थ जाधवबरोबर नाच नाच नाचते. आणि मग हळद लावायच्या वेळी "तू नाही तिला हळद लावायची. खूप प्रयत्नांनी तिचे लग्न जमले आहे, तिचे तुझ्यासारखे काहीतरी व्हायला नको" हे ऐकून हिरमुसून घरी जाते. आणि सामान भरून थेट गोव्याला कुडाळकर कुटुंबाचे एक रिकामे असलेले घर आहे तिथे चालती होते. तिथे "नर्सरीचे काम आहे" असे म्हणते, पण चित्रपटभर ती नर्सरी (मुलांची वा फुलांची) कधीच दिसत नाही.
त्या लग्नात फोटो काढणारी एक संशयास्पद हालचाली करणारी व्यक्ती दिसते. ती व्यक्ती निघते एक पुस्तक प्रकाशक. आणि शुभांगी कुडाळकर या "कडक, मसालेदार माला"विषयी पुस्तक लिहिण्याचे काम तो प्रकाशक त्याच्या एका लेखकाला देतो. अगदी किरकोळीत. जेवण झाल्यावर सुपारी द्यावी तशी. लेखक भोट. जेवण मिळालेले नसतानाही ही सुपारी स्वीकारतो.
आता असे कुणाच्या खाजगी आयुष्यात डोकावून शोध पत्रकारिता करण्यासाठी लेखकाला पूर्वानुभव हवा. ह्या लेखकाचे प्रसिद्ध झालेले पुस्तक कुठले, तर "विठ्ठल रखुमाई".
हा लेखक थेट तिच्या घरात दाखल होतो. त्याला पहिल्यांदा "चालते व्हा" करणारी शुभांगी मग हा लेखक मासळीबाजारात भेटल्यावरही परत उसळते.
पण तिचा आरडाओरडा ऐकून कोळणी जेव्हा कोयते नि खुरपी काढून या लेखकाचे खवले सोलायची तयारी सुरू करतात तेव्हा तिचे अचानक "लोगों न मारो इसे" असे होते आणि ती लेखकाला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये चहा प्यायला जाते. आणि स्वतःबद्दल सांगायला सुरुवात करते.
फ्लॅशबॅक सुरू. आणि कथेतील शुभांगीच्या वयाप्रमाणे साधारण त्या वयाची वाटणारी नटी शुभांगी म्हणून पुढे येते. साताठ वर्षांची मुलगी आणि अकराबारा वर्षांची मुलगी म्हणून दोन वेगवेगळ्या मुली ठीक आहेत. पण कॉलेजमध्ये म्हणून जी शुभांगी दाखवली आहे तिचे प्रयोजन कळले नाही. एकतर नरभक्षक टोळीच्या तोंडाला पाणी सुटावे अशी गुटगुटीत असलेली ती मुलगी आणि मोठेपणाची शुभांगी यांच्या वयांमध्ये फारसा फरक मला तरी जाणवला नाही.
आणि तर्कशुद्ध नव्हे, तर थोडाफार पटू शकेल एवढाही विचार करण्याची तसदी न घेताना चित्रपट सुसाट सुटतो. विचारशक्तीला काम नसल्याने मग मध्येच अजिबात लक्षात न राहणारी गाणी येतात, नाच होतात, मारामाऱ्या होतात. भरत जाधव अर्थात येतो. तो कमी पडू नये म्हणून प्रसाद ओकही येतो आणि बरेच काही होते. आणि चित्रपट एकदाचा संपतो.
सोनाली कुलकर्णी ही नटी यात नसती तर पहिल्या काही मिनिटांतच चित्रपटगृह सोडून चालते होणे जमले असते. पण सोनालीसारख्या नटीने ही भूमिका स्वीकारली म्हणजे यात काहीतरी असणार या वेड्या आशेवर बसून राहिलो. आणि आजवरच्या कारकीर्दीत तिने तिच्या खात्यात जी जमा साठवली होती ती बरीचशी कमी झाली.
तिच्या दिसण्यामुळे दोन तास बसायला कष्ट पडत नाहीत हे खरे. 'देऊळ'नंतर तिने वजनही कमी केलेले आहे आणि पंधरावीस वर्षांपूर्वीची, संदेशबरोबर नाट्यधडपडींत भाग घेणारी सोनाली परत दिसू लागली आहे. पण त्यामुळे चित्रपटाची (नसलेली) पात्रता एका टक्क्यानेही वाढत नाही.
एखाद्या(च) कलाकाराने अख्खा सिनेमा आपल्या खांद्यावर वाहून नेण्याची उदाहरणे चिकार आहेत. पण त्यासाठी पटकथा किमान सामान्य दर्जाची तरी हवी. आणि दिग्दर्शन म्हणजे केवळ कॅमेरामन व संगीतदिग्दर्शक यांना मोकळे सोडणे आणि आपल्या नावाचे स्पेलिंग Kedar ऐवजी Kedhar करणे नव्हे. सोनालीच्या खात्यावर बरी रक्कम जमा होती. केदार शिंदेच्या खात्यात फार शिल्लक नसल्याने त्याने काळजी घ्यावी हे बरे.
जाता जाता - या चित्रपटाचे नाव "अगंबाई अरेच्चा भाग २" ऐवजी "सांगत्ये ऐका भाग २" का बरे ठेवले नसेल?