पिकू - बुलंद अमिताभ

पिकू हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाच 'आपण हा बघण्याची शक्यता आहे' हे कुठेतरी वाटून गेले. मग मी डोके वापरले आणि कुठलेही परीक्षण वाचण्याचे टाळले. अमिताभ बच्चन ही व्यक्ती अपेक्षाभंग करण्याची शक्यता फारतर पाच टक्के. त्यातही विनोदी चित्रपट म्हणजे दोनतीन टक्केच. अगदी "बुड्ढा होगा तेरा बाप" धरूनही.
पिकू पाहिल्यावर पश्चात्ताप अजिबात झाला नाही.
नंतर परीक्षणे वाचली तेव्हा थोडे हसू आले. कारण एका परीक्षणात पटकथालेखिकेचा उदोउदो केला होता. आणि पिकूची पटकथा अगदीच सुमार नसली तरी फारतर 'ब' दर्जाची आहे. छोटछोट्या तपशिलांनी पात्रे खुलवत नेणे हे पटकथाकाराचे काम असते याचा पूर्ण विसर पडलेला आहे. संकलकाने मध्येच डुलक्या मारल्याचा संशय येतो (विशेषतः हायवेवरच्या प्रवासाच्या भागात). "इथे दिग्दर्शक दिसतो" असे क्षण जवळपास नाहीत. तरीही इतर परीक्षणांत दिग्दर्शकाचा गणपती (तोही दगडूशेटचा) बसवण्याचा जोरदार प्रयत्न दिसला.
मग या चित्रपटात आहे तरी काय?
अमिताभ बच्चन. आणि अमिताभ बच्चन.
अख्खा चित्रपट बच्चनबुवांनी आपल्या खांद्यावर दरादरा ओढत नेला आहे.
सत्तरीला पोहोचलेला एक किरकिरा बोंग 'भाष्कोर बानर्जी'. त्याची तिशीचा उंबरठा ओलांडलेली अविवाहित मुलगी. मुलीचे डाकनाम पिकू. बंगाल्यांत दोन नावे असतात. एक डाकनाम - नेहमीच्या वापरातले. आणि एक भालोनाम - कागदोपत्री वापरायचे. पत्नी गचकलेली. भाष्कोरबाबूंना चिरंतन चिंता पोटाची. म्हणजे पोट साफ होण्याची. इतर सर्व गोष्टी (ब्लड शुगर, बीपी आदि) 'नॉर्मल'. आणि भाष्कोरबाबूंना हे सर्व गोष्टी 'नॉर्मल' असणे पसंत नाही.
मुलगी आर्किटेक्ट. पण तिचा व्यवसाय फारसा स्पष्टरीत्या समोर येत नाही. इतर कुणाला चित्रपट पाहून तो स्पष्ट समजला तर माझा दृष्टीदोष आधीच मान्य करून ठेवतो.
ही मुलगी दिल्लीतल्या दिल्लीत हिंडताना (म्हणजे घरून कार्यालयात जाताना) कॅब चालकांना बिथरवते आणि त्यातल्या एकाचा अपघात होतो. हा अपघात माणसांना इजा होणार नाही आणि गाडीचे नुकसान होईल असा असतो. सगळे अपघात एवढे सोपे असते तर बरे झाले असते. आणि ती बापडी अशी चालकांना का बिथरवते? काहीही कल्पना नाही. घरी असले किरकिरे वडील असल्याने असेल अशी स्वतःची समजूत घालून घ्यायची. पण या बिथरवण्यामुळे तिच्याकडे जायला कुणी कॅबचालक उत्सुक नसतात.
हे भाष्कोरबाबू आपल्या मेव्हणीच्या घरी पार्टीला जातात, तिथे जरा जास्तच घेतात, घरी आल्यावर अजून घेतात आणि आडवे पडून ऑक्सिजन मास्क, सलाईन आदी सामग्री आजूबाजूला जमवतात. मग हळूहळू ठीकठाक व्हायला येतात.
या बानर्जी मंडळींची कोलकात्याला मालमत्ता आहे. ती विकायचा प्रस्ताव आलेला आहे. त्यासाठी भाष्कोरबाबूंना कोलकात्याला जायची इच्छा आहे. त्यासाठी म्हणजे घर विकायला नव्हे, तर त्यानिमित्ताने.
दिल्लीत पिकूलाही वैताग वैताग झालेला आहे. त्यामुळे कुठे चार दिवस बाहेर जाऊन यावे असे अंधुकसे तिच्या मनातही तरळू लागले आहे.
भाष्कोरबाबू प्रवास हा रस्त्यानेच करायला तयार आहेत. विमानात बसल्यावर त्यांना कसेसेच होते. आणि रेल्वे प्रवासात त्यांना रेल्वेच्या डचमळत चालण्याच्या रीतीने त्रास होतो.
पिकूच्या चालकांना उचकावण्याच्या सवयीमुळे ट्रॅव्हल एजन्सीला आधी सांगूनही कुणी चालक ठरल्या वेळेला - म्हणजे पहाटे चार वाजता - येत नाही. सगळे आपले सेलफोन बंद करून झोपतात.
आता दीड हजार किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करायचा तर किमान तीस तास लागणार. मग हे इतक्या भल्या पहाटे निघण्याचे कारण काय? उलगडा नाही.
कुणी चालक घरी पोहोचला नाही म्हणून पिकू ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकालाच फोन करून पिडत बसते. तोही घरी आई आणि बहिणीच्या करवादण्याला वैतागलेला आहे. शेवटी सकाळी सहाच्या सुमारास तोच गाडी चालवत तिच्या घरी दाखल होतो.
मग बऱ्याचशा सामानासकट त्यांचा प्रवास. आणि कोलकात्यातले काही दिवस. असा चित्रपटाचा ऐवज.
बंगाली भाषेचा लहेजा अमिताभने ज्या प्रकारे तोलला आहे ते अतुलनीय. विशेषतः बंगाली माणसे हिंदी बोलताना ज्या सुरात नि स्वरात बोलतात ते अप्रतिमरीत्या ऐकवले आहे. तेवढ्यासाठी सासरी जाऊन शिकून आला होता की काय नकळे.
पिकूचे काम दीपिका पदुकोण या विदुषींनी केले आहे. बंगाली माणसाचा हिंदी बोलतानाचा लहेजा अमिताभने जो पकडला आहे त्याला उतारा म्हणून यांची निवड झाली असावी. तिच्या हिंदी बोलण्यात जितका बंगाली लहेजा आहे त्याहून जास्त कतरीना कैफच्या बोलण्यात असेल.
ट्रॅव्हल एजन्सीचा मालक इरफान. याच्या अभिनयनैपुण्याने भारावून जाण्याची हल्ली प्रथा पडली आहे असे परीक्षणे वाचल्यावर जाणवले. पण ती प्रथा मला तरी भावली नाही.
संपूर्ण चित्रपटापैकी ऐंशी टक्के अमिताभने स्वतः खेचला आहे.
दहा टक्के त्याच्या मेव्हणीच्या भूमिकेतल्या मौशुमी चॅटर्जीने. तिच्या दिसण्यात भीषण बदल झाला आहे. तशीही ही बंगाली माणसे 'सुंदर' म्हणताना 'भीषोण शुंदोर' म्हणतातच.
उरलेले दहा टक्के भाष्कोरबाबूंचा कोलकात्यातला भाऊ आणि त्याची बायको यांनी मारला आहे.
एकंदर छायाचित्रण बरेचसे सुखद आहे. गाणी गरजेपुरती आणि गरजेइतकीच येतात. इतर मालमसालाही मर्यादेत ठेवला आहे.
थोडक्यात, अमिताभने उभा केलेला हा एकखांबी तंबू निश्चितच प्रेक्षणीय आहे.