धुरंधर भाटवडेकर - मांजा तुटलेला पतंग

मोहन वर्ग (आगाशे नि जोशी), किशोरी शहाणे एवढी तीन नावे पुरतील म्हणून हौशीने कार्यालयातून मध्येच पळ काढला नि चारचा खेळ गाठला. कोल्हापूरला 'झक मारली नि झुणका खाल्ला' असा एक शब्दप्रयोग केला जातो. बऱ्याच दिवसांनी तो वापरायची संधी मिळाली. मिळेलसे वाटले नव्हते.
पुण्यातील 'अथश्री'च्या धर्तीवर असलेली मुंबईतली एक सोसायटी. सर्वसाधारणपणे कुठल्याही सोसायटीच्या एका मजल्यावर असतात त्याहून कमी मंडळी या अख्ख्या सोसायटीत मिळून असतात (चिक्कू निर्माता वा मंद दिग्दर्शक वा दोघांचा समसमा संयोग). आणि त्या सोसायटीचे आवार पाहिले तर एवढे नि असे आवार मुंबई-पुण्यात सोडाच, तळेगाव वा कामशेटला मिळणेही अवघड आहे. खाजगी पोहोण्याचा तलाव, मोठेसे आवार वगैरे. या सोसायटीच्या सर्वेसर्वा सौ. दामले (किशोरी शहाणे) या विधवा बाई. त्यांच्याबरोबर त्यांची राणी (तन्वी हेगडे) ही विशी ओलांडलेली मुलगी. एकाच वेळी कोलगेट नि क्लोजपची जाहिरात करता येतील एवढे दात त्या मुलीच्या तोंडात आहेत नि ते ती सतत दाखवतही असते. कोलगेट-पामॉलिव्ह आणि युनिलिव्हरच्या जाहिरात एजन्सीज इकडे लक्ष देतील का?
ही मुलगी खांडेकरांचे वाटतील असे संवाद सुरुवातीलाच सटासट हाणते. मग मात्र माणसांत येते.
सोसायटीत बरेचसे नियम. बरेचसे म्हटले, पण एक मोठ्या वहीचा कागद भरेले एवढेच खरेतर दिसतात. यातला एक नियम असा की एकट्याला ठेवायचे नाही, कुठल्याही खोलीत दोन सभासद ठेवायचे. खोल्या रिकाम्या राहिल्या तरी चालतील. आणि मुंबईतल्या या सोसायटीत खोल्या रिकाम्या असतात!
तर इथे भाटवडेकर (मोहन आगाशे) नामक एक सत्तरीचे वृद्ध एकटेच एका खोलीत राहतात. का? आधीचा जोडीदार गचकला की पळून गेला? उत्तर नाही.
हे भाटवडेकर त्यांच्या खोलीत एक जोडीदार येणार म्हणून उखडलेले आहेत. सोसायटीतल्या रिकाम्या खोल्यांची यादी त्यांनी शिपायाकडून मिळवलेली आहे. आणि भाटवडेकर देशस्थ (कऱ्हाडे मंडळींचा मोर्चा आला की कळेल! ) व दामले कोब्रा म्हणून दामलेबाई भाटवडेकरांना खोलीत एक जोडीदार देऊन पिडताहेत असे भाटवडेकरांचे शिपायाला सांगणे.
तर हे भाटवडेकर सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा होतो. घरातून निघण्याआधी खात्री करायला म्हणून आपण पँटच्या खिशात हात घातला आणि नेहमीप्रमाणे हाताला रुमाल लागला नाही तर जितपत तणाव जाणवतो त्याच्या एकदशांश तणाव पडद्यावर कसाबसा निर्माण होतो नि भाटवडेकर सापडतात. कुठे तर गच्चीत शेजारच्या बंगल्यातल्या मुलाबरोबर गप्पा मारीत बसलेले. गच्चीसुद्धा व्यवस्थित कठडा नि रेलिंग असलेली.
या भाटवडेकरांच्या खोलीत येणारे जोडीदार रात्री उगवतात. हे धुरंधर (मोहन जोशी). सिनेमा-नाटकांत 'मोहनलाल' नावाने प्रसिद्ध असलेले नायक.
भाटवडेकर फार शिस्तीचे वगैरे असल्याचे दिसत नाही. नंतर एका संवादात त्यांच्या शिस्तीबद्दल उल्लेख येतो. पण चित्रपट हे दृक-श्राव्य माध्यम आहे. इथे गोष्टी 'दिसाव्या' लागतात; 'ऐकवायच्या' असतील तर नभोनाट्य लिहावे हे कुणीतरी दिग्दर्शकाला सांगेल का?
तर या भाटवडेकरांची न दिसलेली शिस्त या धुरंधरांच्या येण्यामुळे खडुळते असे समजून घेईपर्यंत सकाळ होते. धुरंधरांनी भल्यापहाटेचा गजर लावून ठेवलेला आहे. बंद करण्यासाठी. आणि धुरंधर झोपलेत दोन पलंगांच्या मध्ये, खाली. कारण? पलंगावर म्हणे धुरंधरांचे 'बाबा' आहेत. हे अदृष्य बाबा चारपाच वेळेस संवादात उल्लेखले जातात आणि शेवटपर्यंत अदृष्यच राहतात. संवादांमध्ये त्यांचा उल्लेख कशासाठी केला आहे हे कोडे प्रेक्षकाने घरी घेऊन जावे.
तर हे धुरंधर नि भाटवडेकर दोघेही दामलेबाईंवर लाईन मारू लागतात. आधी कुणी स्पर्धक नसताना लाईन मारणे भाटवडेकरांना का जमले नसेल? अजून एक कोडे घेऊन जा.
हे 'लाईन मारणे' इतके बाष्कळ आहे की त्या तुलनेत मकरंद अनासपुरेच्या कुठल्याही चित्रपटाला सुवर्णकमळ नि अनासपुरेला फाळके पुरस्कार द्यायला हवा.
आणि ही लाईन मारताना मध्येच धुरंधर नि भाटवडेकर एकत्र येऊन मोटरसायकलवर हिंडायला जातात, पबमध्ये जातात, नि परत एकमेकांना आडवे जातात.
भिरभिरणारा पतंग मग काही काळ पोलिस इन्स्पेक्टरच्या (विजय कदम) खांद्यावर विसावतो. मध्येच सोसायटीतल्या इतर सभासदांवर पाखर धरतो. त्यात जयंत सावरकरांना खर्ची घातलेले. त्यात अजून एक कॅन्सर ष्टोरी. तिथे अजून जरा रेंगाळून पतंग त्या सोसायटीच्या डॉक्टरवर नजर ठेवायला जातो. मध्येच एक शेजारच्या लहान मुलाची (भाटवडेकरांच्याबरोबर सुरुवातीला गच्चीत बसलेला तोच) 'बर्थडे पार्टी'. हे बाळ सुरुवातीला गच्चीत बसते, मग 'बर्थडे पार्टी'त दिसते आणि शेवटच्या क्लायमॅक्सला असते. बाकीचा वेळ ते कुठे असते हे अजून एक कोडे घेऊन जा.
थोडक्यात, एक ना धड भाराभर चिंध्या.
योगायोग असा, की आदल्याच रात्रीच 'द बिग लेबॉवस्की' हा चित्रपट पाहिला. मध्येच भरकटलेले नि मध्येच अचानक मार्गावर येणारे कथासूत्र, थोडी उथळ वाटणारी पण मध्येच धप्पकरून पाठीत धपका घालणारी संवादरचना, एका धाग्यावर प्रेक्षकाने विचार करायला सुरुवात केली की अचानक तो धागा सोडून देऊन आधीच्या कुठल्यातरी धाग्याची मन लावून पाठराखण असे बरेच काही त्यात आहे. आणि जे आहे ते खिळवून ठेवते.
सांगण्याचा मुद्दा असा, की एका सरधोपट मार्गानेच चित्रकथा मांडली पाहिजे असे अजिबात नाही हे आदल्या रात्रीच पाहिले होते. पण इथे इतका बालिश नि पोरकट प्रकार पाहायला मिळाला की मराठी चित्रपटसृष्टीच्या भवितव्याची चिंता हा बेळगाव प्रश्नाहून जटिल प्रकार आहे हे उमजले.
विसविशीत पटकथा नि मंदबुद्धी दिग्दर्शन यांच्या संयोगात मग मोहनवर्ग नि किशोरीबाई वाहून जातात यात नवल नाही. आगाशे नि जोशी दोघेही वयाच्या मानाने जास्तच वयस्कर दिसतात. आणि मग त्यांचे 'मोकळेढाकळे' वागणे कीव करण्याजोगे दिसते. 'व्हिक्टोरिया नं २०३' मध्ये वयस्कर पण लोभसवाणे दिसणारे अशोककुमार नि प्राण आठवतात? त्याच्या दुसऱ्या टोकाचे चित्र पहायचे असेल तर इथे बघा.
थोडक्यात, अगदी लक्ष देऊन टाळा.