तिची दिव्य दृष्टी

        कोणतीही गोष्ट हरवणे हीच खरे तर एक कला आहे असे मला वाटते म्हणजे त्याच एकमेव गोष्टीत मी प्रवीण असल्यामुळे माझा असा समज असेल. अगदी लहानपणी झोपताना आज आपली कोठली गोष्ट सापडत नाही याचा आढावा घेऊन उगीचच स्वत:च्या झोपेचे खोबरे करण्याची मला संवय होती. कारण असे आठवू लागल्यावर हमखास एकादी तरी गोष्ट हरवल्याचा शोध मला लागत असे. बरं इतक्या रात्री उठून शोधण्याचे काम करणेही शक्य नसे.शिवाय ती वस्तू शोधूनच झोपलो तर पुन्हा झोप लागण्यापूर्वी दुसरी एकादी गोष्ट हरवल्याचे लक्षात आले तर आणखीनच पंचाईत. त्यामुळे त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या हरवलेल्या गोष्टीचा शोध घेण्याचे माझे काम सुरू होत असे आणि  मी "अनंताचा शोध" करणाऱ्या संतांच्या थाटात शोधण्याचे काम सुरू करत असे,घरातील इतर लोकांचे लक्ष  आपल्याकडे जाऊन त्यांनी मग आपल्या शोधकार्यात मदत करावी अशी अंतर्यामी इच्छा असे पण आपली वस्तू हरवली आहे हे जाहीर करण्याची मात्र लाज वाटत असे.शेवटी कोणाला तरी माझ्या शोधकार्याची कुणकुण लागत असे आणि मग सगळे घरदार त्या शोधण्यामागे लागले की मग मी आरामात बसत असे कारण आता वस्तू सापडणार याची निश्चिती झालेली असे.
            लहानपणी आपण शोधत आहोत ही गोष्ट इतरांना कळावी असे मला वाटे पण आता मात्र मी काही शोधू लागलो की बायकोला त्याचा पत्ता लागू नये असे मला वाटत असते याचे कारण मी ती वस्तू  सापडत नाही म्हटल्यावर ती कदाचित माझ्याच खिशातून किंवा टेबलावरून उचलून "ही काय इथेच तर आहे " असे प्रत्यक्ष , पण मनातल्या मनात " किती हो बावळट तुम्ही अगदी समोरची वस्तूही दिसत नाही " असे म्हणताना मला दिसते म्हणून मी माझा शोध अगदी गुप्तपणे घेत असतो पण तिला मी शोधतो आहे एवढेच काय पण काय शोधतो आहे याचाही कसा काय पत्ता लागतो कळत नाही आणि मग " हेच शोधताय ना ?"म्हणून  अलगद ती वस्तू काढून ती माझ्या हातात ठेवते आणि माझा पुरता मामा करते. आणि मग वस्तू सापडण्याच्या आनंदापेक्षा आपण  पकडले गेलो याचेच दु:ख मला अधिक होते.
        मात्र कधी तरी गुप्तपणे शोध घेण्याचा माझा प्रयत्न तरी यशस्वी होतो, म्हणजे मी शोध घेत आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येऊ न देण्याबाबतीत मी यशस्वी ठरतो पण अर्थातच वस्तू सापडण्याबाबतीत मात्र मी नेहमीप्रमाणेच अयशस्वी ठरतो मग नाइलाजाने मला माझा पराभव जाहीर करून सूत्रे तिच्या हातात सोपवावीच लागतात.
     तिचा एक नेहमीचा सिद्धान्त आहे जो मी कधीच खोटा ठरवत नाही.त्यानुसार हरवलेली वस्तु तिच्या नेहमीच्याच जागेवर असते पण ती नीट शोधावयाला हवी.उदा: पॅन कार्ड अगदी आवश्यक असेल तेव्हां सापडत नाही आणि ते ठेवण्याची जागा माझ्याच ड्रॉवरमध्ये असते व मी पूर्ण ड्रॉवर शोधलेला असतो आणि मला सापडलेले नसते आणि त्यामुळे मी तिला शरण गेलेला असतो.मग तिने "ड्रॉवरमध्ये नीट शोधले का ?" असे मला विचारल्यावर अर्थातच शोधण्याच्या श्रमाने अगोदरच बेजार झाल्यावर तिने असा प्रश्न विचारावा याचा राग येऊन ," मग तुला काय वाटते? ड्रॉवरमध्ये न बघताच तुला सांगतोय का ?""  असा उलट सवाल करतो. अर्थात त्यावर अधिक चर्चा न करता ती मला बाजूस सारून ड्रॉवर उघडून त्यातील एक एक कागद सुट्टा करून बाजूस ठेवत जाते आणि मी मात्र "आत्ताच तर आपण शोधले त्यात आता ही काय उजेड पाडणार अश्या आविर्भावात बाजूस उभा रहातो आणि आश्चर्य म्हणजे खरोखरच तिचा उजेड पडून दोन कागदांच्या मध्ये अडकलेले पॅन कार्ड तिला बरोब्बर सापडते आणि मग ते माझ्यापुढे नाचवत ती म्हणते,"हे काय इथेच तर आहे"आणि मी मात्र आपण इतके शोधूनही आपल्याला कसे सापडले नाही हा विचार करत बसतो.
             पण तिचीच ही दृष्टी अलीकडे जरा कमी सूक्ष्म झाली असे वाटू लागले.म्हणजे तिच्या दृष्टीने झालेल्या माझ्या चुका काढणे कमी झाले अश्यातला भाग नाही पण कधीतरी जेवणानंतर मी बडीशेपेचा बोकणा भरताना माझ्या चिमटीतून ( माझ्यामते) चुकून निसटून फरशीवर पडलेले दोन दाणेही ज्या दृष्टीतून निसटत नसत, किंवा तिला मदत करण्याच्या उच्च हेतूने  चहाचा कप विसळून ठेवण्याचा प्रयत्न मी केला तर तिचा त्रास वाचवण्याच्या माझ्या उच्च हेतूकडे लक्ष न देता त्या कपाच्या तळाशी राहिलेला चहाचा सूक्ष्म डाग मात्र माझ्या निदर्शनास आणून देण्यास जी चुकत नसे.(अश्या वेळी मला त्या हरवलेल्या मुलाला शोधून देऊन मोठ्या उत्सुकतेने त्याची आई आपली कशी प्रशंसा करील याची वाट पहाणाऱ्या वेड्या माणसाची आठवण होते कारण ती हुशार आई आपल्या मुलाकडे शोधक नजरेने पहात आपल्या करड्या स्वरात  त्या माणसाला प्रश्न विचारते,"पण याची टोपी कुठे आहे ?) किंवा सकाळी दात घासण्यासाठी मी वापरत असलेल्या डाबर लाल दंतमंजनाचा डाग शर्टाच्या पुढच्या भागावर पडलेला जी तत्परतेने मला दाखवत असे तीच अलीकडे माझ्या हातून होणाऱ्या अनेक गफलतींकडे दुर्लक्ष करू लागली होती आणि हे तिच्या दोषदिग्दर्शन तत्परतेत बसत नव्हते त्यामुळे असा संशय मला येऊ लागला होता.
     अलीकडे तर तिच्या हातूनच तांदळाचा डबा सांडणे वगैरे माझ्यासाठी राखीव असलेले अपघात होऊ लागले.एक दिवस तर तिच्या हातातून पापडाचा डबा निसटला व त्यानंतर तिचा एक डोळा उघडॅनासा झाला अर्थात पापड डबा अपघात हे कारण त्यामागे नसावे असे तिला ही वाटत होते पण ते तात्कालिक कारण असल्याने त्या डब्यातीलच काही प्रक्षोभक द्रव्य डोळ्यात गेले असावे असा अंदाज बांधावा लागला पण त्यानंतर डोळा उघड मिट करू लागल्यामुळे तो तात्पुरताच परिणाम असावा असे वाटले.पण त्यानंतर शब्दकोडे सोडवायला तिला त्रास होऊ लागला म्हणजे पूर्वी एका दमात ती अनेक कोडी ती सोडवत असे पण आता मात्र एकाच शब्दकोड्यातील थोडे पर्याय आटोपले की तिच्या डॉळ्यातून पाणी वाहू लागे व थोडी विश्रांती घ्यावी लागे..  
     यावर उपाय अर्थातच डॉळ्याच्या डॉक्टरकडे जाणे हा होता .थोड्याच दिवसापूर्वी मलाही एका डोळ्याचा त्रास जाणवू लागला होता म्हणजे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर सुद्धा पुन्हा एका डोळ्याने अंधुक दिसते असे जाणवू लागले होते व त्यासाठी मी औरंगाबादला जाऊन नेहमीच्या नेत्रतज्ञाकडे जाऊन दाखवले असता त्याने लेसरच्या सहाय्याने त्या डोळ्याचे भिंग साफ करावे लागेल असे सांगितले होते व त्याप्रकारची सामग्री त्याच्याकडे नसल्यामुळे दुसऱ्या नेत्रालयाकडे जाण्याचा सल्ला दिला होता व तेथे माझ्या भिंगाची सफाई मी करून घेतली होती यावेळीही आम्ही दोघेही त्याच नेत्र रुग्णालयात गेलो व त्यानी बऱ्याच तपासण्या करून काचबिंदूचे निदान केले.
    काचबिंदूची शस्रक्रिया करण्याविषयी अर्थातच आमचे डॉक्टर बंधू व त्याची पत्नी यांच्याशी चर्चा झाली व त्याच वेळी त्यांची एक नेत्रतज्ञ सहकारी  औरंगाबादमध्येच असल्यामुळे तिच्याकडे जाऊन यावे असे ठरले.ती आमचीही परिचितच होती. तिच्या नेत्रालयात गेल्यावर तिने ताबडतोबच सौ.च्या डोळ्याचे निरीक्षण करून तुमच्या एका डोळ्याची पापणीच आत गेली आहे आणि ती घासल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे असे म्हणून त्या डोळ्यात एक औषधी थेंब टाकून थोडा वेळ जाऊ देऊन तिच्याजवळील उपकरणाने ती पापणी ओढून सरळ केल्यावर एकदम तिला होणारा त्रास बंद झाला.काचबिंदूची शस्त्रक्रिया पुण्यासच करून घेण्याचे आम्ही ठरवले आणि पुण्यात माझी मोतिबिंदूची शस्त्रक्रिया जेथे केली त्या लेसर क्लिनिकमध्ये ती करावी असे ठरले.क्लिनिकच्या प्रमुख शल्यतज्ञास फोन केल्यावर त्यांनी काचबिंदू करण्याऐवजी मोतिबिंदूचीच शस्त्रक्रिया करून घ्या कारण काचबिंदूची शस्त्रक्रिया केल्यावर देखील पुन्हा मोतिबिंदू वाढू शकतो व पुन्हा ती शस्त्रक्रिया करावीच लागेल असे म्हटल्यावर आम्हाला फारसा विचार करण्याचे कारणच उरले नाही शिवाय पापणीचा होणारा त्रास गेल्यामुळे सध्या कोणतीच शस्त्रक्रिया करणे जरी आवश्यक नव्हते तरीही पुढेमागे करायचीच आहे तर आत्ताच करून घ्यावी असा विचार केला.
    आता मोठा मुलगाही बरोबरच असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी हवी ती मदत घरी उपलब्ध होती.शस्त्रल्रियेनंतर गॅसजवळ न जाण्याचे पथ्य पाळणे सूनबाई घरात असल्यामुळे अशक्य नव्हते नाहीतर माझ्या अतिप्राचीन पाककौशल्यास उजाळा देऊन माझ्या विचित्र पाककृतींबरोबर सौ.च्या तिखट शब्दांचा घासहॉ गिळावा लागला असता .शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊन फारसा विचार न करता शस्त्रक्रिया आणि त्याही दोन्ही डोळ्यांच्या पार पडल्या. मी माझ्याकडून शस्त्रक्रियेनंतर डोळ्यात घालण्याच्या औषधांचे वेळापत्रक करण्याचे व नंतर तिच्या डोळ्यात ते घालण्याचे काम माझ्या शिरावर घेतले पण त्यातही मी केलेल्या चुका आता तिच्या सुधारलेल्या दृष्टीमुळे अधिक तत्परतेने तिने माझ्या निदर्शनास आणल्या एवढेच काय त्या वेळापत्रकानुसार औषधही तीच घालू लागली. मधून मधून तिला आठवण करून देण्याचे कामच काय ते मला उरले.
    तिची दृष्टी सुधारली ही आनंदाची गोष्ट खरी पण आता यापुढे तिच्या सुधारलेल्या दिव्य दृष्टिपुढे माझी कुठलीच चूक लपवणे ही गोष्ट माझ्या कुवतीच्या बाहेरच असणार हे मात्र निश्चित !.