नृत्य क्षेत्रातील १२ दिग्गजांना कलातीर्थ पुरस्कार प्रदान

थर्ड बेल एंटरटेनमेंट तर्फे दिला जाणारा कलातीर्थ पुरस्कार नुकताच नृत्य क्षेत्रातील १२ दिग्गजांना ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कलातीर्थ पुरस्काराचे यंदाचे हे तिसरे पर्व होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना पूजा शेंडे हिच्या गणेशवंदनेने झाली पाठोपाठ अनुजा बाठे, ईशा फडके व कलावर्धिनी च्या विद्यार्थिनींनी देखिल नृत्य सादरीकरण केले.

त्यानंतर सोनिया परचुरे, दिपाली विचारे, अश्विनी एकबोटे, मयूर वैद्य, सुभाष नकाशे, शर्वरी जमेनिस, प्राजक्ता माळी, मेघा घाडगे, परिमल फडके, रॉकी पूनावाला, अदिती भागवत व शांभवी दांडेकर ह्या १२ नृत्य कलावंतांना कलातीर्थ नृत्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या गीतकार मंदार चोळकर, छायाचित्रकार नंदू धुरंदर, रेडियो जॉकी संग्राम खोपडे, फॅशन कोरियोग्राफर अभ्यंग कुवळेकर, वेशभूषाकार प्राची बडवे, पार्श्वसंगीत दिग्दर्शक अमर मोहिले आदी मान्यवरांना विशेष सन्मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.

त्यावेळी बोलताना "मी एक उत्तम रसिक आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे. कोणी काहीही म्हटले तरी चालेल पण माझी रसिकता निर्विवाद आहे" अशा भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांनी व्यक्त केल्या. थर्ड बेल एंटरटेनमेंट ला शुभेच्छा देत "हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे" त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पुरंदरे म्हणाले, "पुण्याच्या ह्याच मध्य भागात मस्तानी ने देखिल नृत्य सादर केले होते हा इतिहास अनेकांना माहीत नसेल. " अशी आठवण करून देत, " मस्तानी च्या जीवनावर नृत्य नाटिका दिग्दर्शित होऊन ती प्रेक्षकांसमोर सादर व्हायला हवी" अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.  

आपले मनोगत व्यक्त करताना शमाताई भाटे ह्यांनी "ह्या सर्व पुरस्कारार्थींना योग्य वयात पुरस्कार दिले आहेत. हे सांगत त्यांनी इथून पुढे नृत्याचा अभ्यास असाच चालू ठेवत त्यामध्ये अधिकाधिक प्रावीण्य मिळवावं असे शुभाशीर्वाद सर्व पुरस्कारार्थींना दिले.  

संस्थेचे संस्थापक स्वप्नील रास्ते ह्यांनी थर्ड बेल एंटरटेनमेंट च्या आगामी उपक्रमांबद्दल सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यावेळी पी. एन. जी. चे पराग गाडगीळ, ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे, पुष्कर देशपांडे, डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.