स्मृति

नभोदरात गर्जती अशांत मेघ सावळे
इथे मनात माझिया तुझ्या स्मृतींचि वादळे!
क्षणात मौक्तिके खुळी विसावली कळ्यांवरी
कसे जुळून येति हे ऋणानुबंध आगळे!
उनाड वात वाहता उरामधून मातिच्या
थरारत्या हवेतुनी तुझाच गंध दर्वळे!
उधाणत्या सरींतुनी तुझे सुहास्य सांडले
भिजून चिंब जाहले तृषीत श्वास कोवळे!
अजाण उर्मि अंतरी तुझाच स्पर्श चेतवी
अनाम आर्त भाव हा तुला कळे मला कळे!
तनामनात ही अशी जणू सतार वाजते
तशात रम्य धुंद हा अखंड मेघ कोसळे!