सत्कार !

लोक पुसती कारणे, माझ्या कपाळी आठीचे, 
उत्तरे नाही मिळाली, प्रश्न झाले साठीचे.
ह्या जगी मी हिंडताना, भिन्न स्नेही जोडले,
सभ्यतेला नाव आहे, आतल्या त्या गाठीचे.
सोयीने भांडून गेले, गोड ही ते बोलले, 
काय होते आतले, अन काय होते ओठीचे ?
पावसाळे सोसुनी, उरलो जरी मी जाणता,
वार होते झोंबणारे, जाणिवेच्या काठीचे.
जाहला सत्कार माझा, खूप होते लोक ही,
शाल त्यांची झाकते का, घाव माझ्या पाठीचे ?
- अनुबंध