अ पेइंग घोस्ट - सुकाणू हरवलेली गळकी होडी

व पु काळे.
शहरी (म्हणजे मुंबई आणि काही प्रमाणात पुणे) वातावरणात वाढलेल्या दोनेक पिढ्या या साहित्य-पिझ्झावरती जगल्या. पहिल्या पिढीवरचा प्रभाव संपतासंपता कथाकथनाच्या कॅसेटसचे प्रस्थ बोकाळले आणि दुसरी पिढीही त्यात गारद झाली.
मी त्यांघे कथाकथन ऐकले ते चाळीस वर्षांपूर्वी खानदेशातल्या एका तालुक्याच्या ठिकाणी. कथाकथन आवडले पण माडगूळकर-पाटील-मिरासदार यांच्या कथाकथनासारखे हे मातीतून उगवलेले कथाकथन नव्हे हेही जाणवले. गुऱ्हाळात शिरून फूफू करीत निववून खाल्लेला गूळ आणि वाण्याच्या दुकानातून वृत्तपत्राच्या कागदाच्या पुडीत बांधून आणलेला गूळ असा तो फरक.
दहा बाय दहाच्या दोन खोल्या म्हणजे स्वर्ग मानणाऱ्या कनिष्ठ मध्यमवर्गाला एक 'कथाकार-कम-विदूषक-कम-बाबा' पुरवण्याचे काम काळेंनी चोख केले. म्हणजे, सुरुवातीला त्यांच्या कथा काहीतरी सांगू पाहत. नंतर नंतर काळेंना समजू लागले की हुकमी हसू नि आसू कुठून मिळवता येतात. काही काळ असा गेल्यावर त्यांच्याकडून लोक आयुष्याचे तत्त्वज्ञान वगैरे अपेक्षू लागले. त्यांच्या कथाकथनाच्या रेकॉर्डिंगला कुठे वाहवा मिळते नि कुठे हशे मिळतात हे ऐकले की काय ते उमजेल.
त्यानंतर दहापंधरा वर्षांत इंटरनेट आणि टेलीव्हिजन या दोन समंधांनी सगळी छोटी भुते नामशेष केली.
त्यांच्या 'बदली' या कथेवर आधारित असलेला चित्रपट म्हटल्यावर कथासूत्राची कल्पना होतीच. तेवढ्या कथेवर अख्खा चित्रपट काढायचा म्हणजे चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा मसाला घातलेला असणार याचीही कल्पना होती. हे गुणोत्तर अगदी काटेकोरपणे पाळले आहे. तेहेतीस मिनिटे (दुवा क्र. १ इथे ऐका) कथिलेल्या कथेवर एकशेबत्तीस मिनिटांचा चित्रपट.
मी तसा धडधाकट आहे. उमेश कामत आणि पुष्कर श्रोत्री दोघांनाही झेलू शकतो. मकरंद अनासपुरे असता तर मात्र पळ काढावा लागला असता.
चित्रपटाच्या सुरुवातीच्या टायटल्सपासूनच धोक्याची घंटा किणकिणायला लागली. टायटल्ससाठी वापरलेले फोटो 'शेंडा ना बुडखा' श्रेणीतले आहेत आणि काही फोटो रिपीट करण्यामागचा कार्यकारणभाव कळण्याच्या पलिकडचा आहे.
चित्रपट सुरू झाला. एक गरीब बिचारे दृष्य गिमिक दाखवून भुताची (पुष्कर श्रोत्री) एंट्री झाली.
मराठी चित्रपट पाहताना पडणारा नेहमीचा प्रश्न नेहमीप्रमाणे पडला - अशी गरीब बिचारी दृष्ये दाखवण्यामागे निर्मात्याची दारिद्र्य असते की दिग्दर्शक/छायालेखकाचे कल्पनादारिद्र्य? निर्मात्याच्या दारिद्र्याच्या नावाने पावती फाडायची असेल तर 'पथेर पांचाली' सारख्या चित्रपटात जी दृष्यसौंदर्याची श्रीमंती दिसते त्याचे काय? 'पथेर पांचाली'चा निर्माता 'गरीब' नव्हता, तर भिकेला लागायला आला होता. स्वतःची विमापॉलीसी आणि बायकोचे दागिने गहाण टाकून राय ह्यांनी तो चित्रपट तयार केला.
असो. चूक माझीच. 'कॉफे रम'मध्ये 'आयरिश क्रीम'चा मखमली अनुभव शोधायला जाण्याची.
आता मूळ कथेच्या चौपट ऐवजाचा सिनेमा करायचा म्हणजे अनेकानेक उपकथानके तयार करून जोडावी लागणार हे उघड आहे. पण इथले जोडकाम इतके विजोड आहे की 'जोड' म्हणण्याऐवजी 'ठिगळ'म्हटले तरी तो बहुमान ठरेल.
खरेतर निवडक लोकांनाच दिसणारे भूत या संकल्पनेवर इतके सुंदर चित्रपट आहेत. 'ब्लॅकबिअर्डस घोस्ट' इंग्रजी, 'चमत्कार' हिंदी, 'एक डाव भुताचा' मराठी. शोधले तर हवे तितके अजून सापडतील. पण छे. सगळा विस्कोट करायचा चंगच बांधला असेल तर काय करणार?
मूळ कथेतले दामले हे कुटुंबवत्सल. इथे नायकाला अविवाहित दाखवून त्याचे लग्न हा एक सांधा जोडायचा क्षीण यत्न केला आहे. त्यात त्याच्यावर मरणाऱ्या मुली दोन. त्याच्या चाळीत राहणारी आणि दिसायला साधारण वृंदा (अनिता दाते) आणि ऑफिसमधली फाकडू माधवी (स्पृहा जोशी). तो कुणाकडे झुकणार आहे याची स्पष्ट कल्पना पहिल्या दृष्यापासूनच प्रेक्षकांना येते. आणि वृंदाचे पात्र कशासाठी फूटेज खाते आहे हा प्रश्न शेवटपर्यंत सुटत नाही.
सिनेमॅटिक लिबर्टी तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत चोथा होईपर्यंत वापरलेली आहे.
चाळीत राहणारा माणूस रोज सकाळी पळायला जॉगिंग ट्रॅकवर जातो. याच्या घरात नाही पाणी. मुंबईत जॉगिंग करून आल्यावर तो आंघोळ बिंघोळ करतो की नाही?
बंगल्यात राहणारी मुलगी चाळीत राहणाऱ्या मुलावर मरते. तिचे आईबाप तिला कानफटवायच्या ऐवजी तिला प्रोत्साहन देतात.
चाळीतली घरे दोनखोल्यांची आणि खोल्या साधारणपणे दहा-बाय-दहा वा फार तर पंधरा-बाय-पंधरा अशा असतात. चित्रपटात दिसणारी चाळ (आणि त्यातली बेडरूम) प्रत्यक्षात तशीच असेल तर कुणीही फ्लॅट विकून चाळीत रहायला जातील.
भुते मरत नाहीत तर त्यांचा पुनर्जन्म होतो. एकबोटे फॅमिलीतल्या दोनतीन मुलींचा पुनर्जन्म झालेला आहे. तरीही पाचातल्या एकीचा पुनर्जन्म होण्याची वेळ आल्यावर गामिनी (सौ. भूत) एवढा का कल्लोळ करते?
पात्रांपैकी पुष्कर श्रोत्रीला सतत छगन भुजबळांसारखा मफलर गुंडाळून का ठेवले आहे नकळे. उमेश कामत आणि स्पृहा जोशी यथायोग्य दिसतात. अतुल परचुरे, शर्वाणी पिल्ले आदी मंडळीही ठीक. एकूण पोटापाण्यासाठी सगळ्यांनी या सिनेमात काम केलेले दिसते.
शर्वाणी पिल्ले एका गुन्ह्यात मात्र दोषी आहे. कथाविस्तार तिने आणि दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी केल्याची नोंद आहे. विस्तार म्हणजे फणसाच्या झाडाला नारळाची झावळी चिकटवणे नव्हे ग बाई.
संजय मोनेंची पटकथा संवाद ठीकठाक. पोटापाण्यासाठी...
संगीतकार म्हणून नरेंद्र भिडेंचे नाव आहे. 'ओ माय गॉड'मधल्या गाण्याने प्रेरित होऊन या चित्रपटात एक गोविंदा गाणे आहे. त्यातल्या नाचणाऱ्या नटाचे नाव विसरलो. लक्षात राहिले ते एवढेच की प्रभुदेवाची अठ्ठाविसावी कार्बन कॉपी दाखवण्याचा अट्टाहास केविलवाणा आहे. आणि हिमेश रेशमिया संगीतकार म्हणून किती थोर आहे हे इथले गाणे ऐकल्यावर कळते.
प्रश्नच पडायचे असले तर असंख्य पडतील. मुद्द्याचा प्रश्न एकच - वारंवार खड्ड्यात पडूनही मी नवीन खड्डे का शोधतो??
ता. क. : 'संदूक'च्या निर्मात्याला लवकरच देणगी देणार आहे. तो खड्डा  आहे की टेकाड आहे कळेलच.