संदूक - साष्टांग नमस्कार

'संदूक' ही चित्रपटांच्या परिभाषेत एक 'पीरियड फिल्म' आहे. पण 'पीरियड' हे फिल्मचे विशेषण आहे. मुळात फिल्म चांगली असेल तरच विशेषणांकडे लक्ष देता येते. हा घोळ सगळीकडेच दिसून येतो. 'शेतकऱ्यांवरची कविता' म्हणून ती चांगली कविता. 'स्त्रियांच्या समस्यांबद्दलचे नाटक' म्हणून ते चांगले नाटक. 'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दलचा लेख' म्हणून तो चांगला लेख. असो.
तर ही स्वातंत्र्यपूर्व कालातली फिल्म. म्हणजे काय, तर वेषभूषा, केशभूषा आदी त्या काळातले वाटण्यासारखे आहे.
एक कोकणातले खेडे. नाव? संबळगड.
तिथे राहणाऱ्या माणसांची नावे अष्टपुत्रे, भातखंडे अशी. तिथेच बिलिमोरिया नावाचा पारशीसुद्धा राहतो.
तिथल्या एका चौकात कुणा विल्यम नावाच्या गोऱ्याचा पुस्तक वाचतानाच्या पोजमधला पुतळा. हा विल्यम एकदा चेहरा वेडावाकडा करून दाखवतो. मग त्याला काम नाही. चित्रपट संपताना The End ही अक्षरे त्याच्या हातातल्या पुस्तकावर दिसतात एवढेच.
सुमीत राघवन हा वामनराव अष्टपुत्रे. त्याची बायको रुक्मिणी. मुलगा भारत.
अष्टपुत्र्यांचे घर अगदी कोकणातले आहे. पण त्याला अगदी लगटून दुसरे घर आहे त्याचा भूगोल/नकाशा मात्र काही केल्या उमजत नाही. एकाद्या नाटकाचा सेट अर्धवटच लावावा तसे काहीतरी वाटत राहते.
अष्टपुत्र्यांचा मुलगा बापाला चित्रपटभर 'वडील' असे संबोधतो (अहो वडील, पण वडील इ इ).
वामनरावांना आपल्या पूर्वजांचा जाज्वल्य वगैरे अभिमान. पण बायको नि मुलीला त्याचे काही सोयरसुतक नाही. म्हणून वामनरावांची चिडचीड. त्याकडेही मायलेकांचे दुर्लक्ष.
वामनरावांचे शेजारी श्यामराव. ते ज्योतिषी. त्यांचे नि अष्टपुत्र्यांचे संबंध सलोख्याचे आहेत की तेढीचे हे त्या बिचाऱ्या दोघांनाही धड कळत नाही. त्यामुळे घटकेत खटकेबाज तणातणी आणि घटकेत मित्रमित्र अशी गंमतजंमत चालू असते.
दापोलीत एक बाँबस्फोट होतो नि वामनराव मोहरून जातात. कारण ते मनातल्या मनात क्रांतीकारक असतात.
मग गावात एक संगीत नाटक येते. त्या नाटकाला "मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही इतकी गर्दी" असते म्हणून वामनरावांना तिकीटे मिळत नाहीत आणि बायकोमुलाच्या रड्याला तोंड देत मुकाट घरी यावे लागते. इतकी गर्दी म्हणजे काय, तर पन्नासेक माणसे असतात.
नाटक पहायला गेलेल्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून होतो.
तपासासाठी स्कॉट नामक इंग्रज अधिकारी पोहोचतो.
येऊन तो तत्परतेने तिथल्या स्थानिक भोसलेसरकारांना हाकलून देतो नि वाडा ताब्यात घेतो. त्यांना धक्का देऊन खाली पाडल्यावर त्यांच्या हातातली पानाच्या पेटीच्या आकाराची संदूक काढून घेतो नि मेजावर ठेवून देतो.
मग राणा नामक हिंदी पोलिस अधिकाऱ्याच्या साथीने तो जुलूम करण्याच्या कामाला धूमधडाक्याने सुरुवात करतो. म्हणजे काय, तर धडाधड लोकांना नुसतेच वा जिवानिशी मारत सुटतो.
या स्कॉटशी मराठीत बोलले तर त्याला अर्धेअधिक नीट समजते. मग मध्येच गुरगुरून "व्हॉट डिड ही से? " असे विचारतो. कधीकधी हिंदीच्या वस्त्रालाही हात घालतो. राणाला मराठी समजते पण तो हिंदीत भुंकत राहतो.
'माधवराव संझगिरी' नामक कुणी क्रांतीकारक नेता आहे. तो कुणाला दिसत नाही. फक्त त्याचे निरोप/हुकूम पोहोचतात. त्यांच्या क्रांतीकारक संघटनेसाठी काम करण्याची वामनरावांना इच्छा आहे. शिवाय त्यांना मधून-अधून स्वप्ने पडतात (इंग्रज पोलिस अधिकाऱ्याचा खून त्यांनीच केला इ इ) आणि मध्येच एकदा मीटरभर लांबीची मोठी शेंडी ठेवलेले नि चुना लावल्यागत पांढरे झालेले आपले दिवंगत वडील दिसल्याचा भास होतो.
भोसलेसरकार जी संदूक इतक्या किरकोळीत मिरवत गावभर हिंडत असत ती आता एकदम महत्त्व पावते. ती संदूक स्कॉटच्या ताब्यातून पळवण्यात येते आणि वामनरावांच्या ताब्यात येते. ती नीट जपून ठेवण्याच्या कामगिरीसकट.
मग यथायोग्य वेळेस (म्हणजे प्रेक्षक आता चित्रपटगृहाचा पडदा, खुर्च्या आदी जाळायला पंधरा सेकंदच बाकी आहेत अशी दिग्दर्शकाची खात्री पटल्यावर) माधवराव कोण, त्या संदुकीत काय आदी उलगडा होतो नि आपण घरी जायला मोकळे होतो.
सुमीत राघवन हा एक ठीकठाक नट आहे. दिसायला सहजसोपा. फार 'अभिनय अभिनय' खेळत बसत नाही. 'साराभाई v/s साराभाई' मध्ये वाट्याला आलेली भूमिका त्याने नीटसपणे निभावली होती. त्याने मराठी चित्रपटांत आजवर भूमिका केली नव्हती. पण तो उपास सोडायला हा चित्रपट?
थोडे अवांतर - वाजपेयींचे तेरा दिवसांचे सरकार कोसळायला आले असता लोकसभेतल्या चर्चेत शरद पवारांनी 'डायलॉग' मारला होता - "वाजपेयीजीने उस बारात के लिये अपना ब्रह्मचर्य क्यूं तोडा जिसमे दुल्हनका पताही नही है? "? इथे तो आठवला.
थोडक्यात, सोनाली कुलकर्णीने 'अगंबाई अरेच्चा भाग २' मध्ये जो अपेक्षाभंग केला होता तो अपेक्षाभंग नसून अपेक्षापूर्ती ठरावी असे काम राघवनबुवांनी इथे केले आहे.
भार्गवी चिरमुलेने तिचे काम बरे केले आहे. शरद पोंक्षे (दिग्दर्शकाच्या) अपेक्षेइतके नाकात बोलतात. राणाचे काम करणारा माणूस मख्ख दिसतो. आणि स्कॉट मठ्ठ. किती मठ्ठ? तर याच्या तुलनेत भारतभूषण नि प्रदीपकुमारला ऑस्कर द्यावा इतका मठ्ठ.
दिग्दर्शक अतुल काळे या गृहस्थांची कारकीर्द पाहिली तर 'मातीच्या चुली' पासून झालेली सुरुवात मग 'दे धक्का'पाशी उतरली. मग 'त्याचा बाप तिचा बाप'. मग 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' चा भाग २, 'बाळकडू' नावाने. इथे शिवाजीराजांऐवजी बाळ ठाकरे. आणि आता हा. आधीच्या चित्रपटांपैकी मातीच्या चुली पाहिला होता. दे धक्का थोडासा.
पण आधी काहीही केले असले तरी या चित्रपटात या साहेबांनी जी पातळी गाठली आहे तिला तोड नाही. पटकथेतली मोठमोठी भोके, संकलन करताना बाजूला ठेवलेले डोके, गाणी मध्येच कुठून नि कशी अवतरतात याचा कुणाच्या बापाला पत्ता लागणार नाही अशी जिंकलेली पैज, अनेक अतर्क्य घटना (एक उदाहरणः समुद्राकाठी राणा नि पोलीस. समुद्राच्या काठापासून शंभरेक मीटरवर छोटी होडी. छोटी म्हणजे किनाऱ्याकिनाऱ्याने हिंडायची तीनचार माणसे बसतील एवढीच. त्यात भातखंडे नि अजून दोघेजण बसलेले. किनाऱ्यावरून गोळी मारून राणा भातखंडेला उडवतो. उरलेले दोघे होडी किनाऱ्यावर आणून राणाच्या नजरेसमोरून पळून जातात).
गेल्या तीन महिन्यांत चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट पहायचा मी जोरदार प्रयत्न केला. व्हॉट अबाऊट सावरकर, कोर्ट, अगंबाई अरेच्चा भाग २, धुरंधर भाटवडेकर, अ पेईंग घोस्ट नि हा. त्यापैकी सर्वात निरर्थक, निर्बुद्ध आणि भिकार चित्रपटाचा निर्विवाद मान मी साष्टांग नमस्कार घालून या चित्रपटाला देतो.