किल्ला - एक नितांतसुंदर अनुभव

गेले दोन तीन महिने मराठी चित्रपट बघण्याचे माझे प्रमाण चिंताजनक होते. आणि त्यात वाट्याला बहुतांश गदळ आल्याने मनस्ताप साहजिक होता. 'संदूक' पाहिल्यावर तर प्रेक्षक म्हणून मराठी चित्रपटसंन्यास घ्यावा अशी तीव्र इच्छा झाली. पण ती इच्छा पूर्णांशाने प्रत्यक्षात उतरण्याआधीच 'किल्ला' पाहिला नि कृतकृत्य झालो.
अर्थात असेही असण्याची शक्यता आहे की आधीच्या चित्रपटांनी जो ऊतमात केलेला होता त्याच्या तुलनेमुळे हा चित्रपट जास्तीच भावला. पण तसे असले तरी या चित्रपटात मुळापासून वेगळे असे काहीतरी आहे हे निश्चित.
त्या दृष्टीने हा चित्रपट 'कोर्ट'च्या श्रेणीत जातो. पण 'कोर्ट'हून नक्कीच वरचढ.
नोकरदार आईची बदली पुण्याहून थेट गुहागरला होते. वडील निवर्तलेले. मुलगा सातवीत. भाऊबहीण नाही. नव्या जागी जुळवून घेताना त्या मुलाच्या आयुष्यात कोणकोण व्यक्ती येतात नि कायकाय घटना घडतात त्याचे चित्रण म्हणजे हा चित्रपट.
यात विषयाखेरी वेगळे असे काय आहे?
 पहिले म्हणजे चित्रीकरण. दिग्दर्शक नि छायालेखक एकच असण्याचे जे फायदे असतात ते इथे लख्ख दिसतात. फ्रेम - शॉट - सीन - सीक्वेन्स - स्ट्रक्चर या उतरंडीमध्ये कुठेही आस्वाद घेताना अडथळा येऊ नये अशी रीतीचे चित्रीकरण, आणि तेही काही गिमिक्स न करता. एखाददोन ठिकाणी छायालेखक दिग्दर्शकावर रुबाब गाजवतो आहे असा भास होतो. पण एखाददोनच ठिकाणी (डोणीतल्या पाण्यात मुलाचे प्रतिबिंब दिसणे). आणि भासच होतो, खात्री पटत नाही.
दुसरे म्हणजे लोकेशनची निवड अत्यंत नेमकी आहे. सर्वच स्थळे इतकी अचूक निवडलेली आहेत की पूर्णपणे सेटसवरती चित्रीकरण केले असते तरी इतके चपखल सेटस उभे करणे अशक्य ठरले असते.
तिसरे म्हणजे पात्रयोजना. चिन्मय, बंड्या, युवराज, ओंकार, उमेश यांची निवड तर बिनतोड आहेच. पण त्यामानाने तिय्यम असलेले पात्र - निवते - याकरता निवडलेला नटही या पात्रासाठी जन्माला आलेला असावा इतका 'फिट्ट' बसतो. सगळीच पात्रयोजना अशी नेटकी आहे. त्यातल्या त्यात मग दामलेआजीच थोड्या कॅमेरा कॉन्शस झाल्यागत वाटतात.
चौथे म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांना केंद्रस्थानी ठेवून काढलेला चित्रपट म्हणजे धडकी भरवणारे प्रकरण. मुलांच्यामधली हिंसा, लैंगिकता, क्रौर्य इ पाहणे म्हणजे शिक्षाच. गेलाबाजार मानसिक विश्लेषण तरी. या चित्रपटात ते जवळपास टाळले आहे. 'स्वराली' हे पात्र पडद्यावर उमटल्यावर धास्तावलो होतो, पण दिग्दर्शक त्या वाटेला गेला नाही. सुटलो.
नि पाचवे म्हणजे सर्व गोष्टींचा समुच्चय म्हणजे चित्रपट. त्यामुळे नुसतेच चित्रीकरण सुखद वा नट/नटी उत्तम असे असून चालत नाही. हे मूलभूत सत्य दिग्दर्शकाने अगदी घोकून घोकून पाठ केलेले दिसते. त्यामुळे अख्खा चित्रपटच कसा नेटका झाला आहे.
  काम करणारी नटमंडळी अगदी दुधात मध मिसळावा तशी त्या त्या पात्रांत विरघळून गेली आहेत. कोणी 'अभिनय' करतोय असे जाणवत नाही. त्यातल्या त्यात अर्चित देवधरच जरा बावचळल्यासारखा वाटतो. पण तो आता 'अभिनया'च्या भयावह गुहेत शिरतोय की काय अशी भीती वाटायला लागते न लागते तोच कार्टा झकास हसतो नि माणसात येतो. पार्थ भालेराव नि गौरीश गावडे या दोघांच्यावर नजर ठेवून राहिले पाहिजे. दोघांनाही तशी भावखाऊ कामे मिळाली आहेत. आणि दोघांनीही ती दृष्ट लागावी इतक्या व्यवस्थितपणे पेलली आहेत.  अमृता सुभाषच्या नावाने ज्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या त्या तर तिने चोख पूर्ण केल्याघ. शिवाय अनेक ठिकाणी त्या अपेक्षांना भेदून तिने तिचे सामर्थ्य दाखवून दिले आहे.
या चित्रपटात काही त्रुटी जरूर आहेत.
अकरा वर्षांचा मुलगा सातवीत कसा?
युवराजची एंट्री होते तो भाग जरा अतिरंजित नि भडक जाणवतो.
बंड्याची भाषा गुहागरातल्या सातवीतल्या मुलाच्या भाषेशी काही नाते राखून आहे असे वाटत नाही (तुलना करायला 'निवते'ची वा तहसीलदाराची भाषा ऐकली की काय ते कळेल).
चित्रपटाचे पार्श्वसंगीत कुठकुठल्या संगीताची भेळ करून केलेले आहे.
चित्रपटाचा शेवट कुठे करावा याबद्दल दिग्दर्शकालाच प्रश्न पडलेला दिसतो. मग एक तिहाई चुकली तर दुसरी घेऊन सम गाठायची धडपड जसे नवशिके गायक/वादक करतात तसे काहीसे शेवट गाठल्यावर वाटते.
पण पदार्पणातला चित्रपट म्हणून या सगळ्या त्रुटी माफ करण्यातल्या आहेत.
आनंदाची गोष्ट की हा चित्रपट बऱ्यापैकी चांगल्या गर्दीत चालू आहे. तळेगांवसारख्या पिटुकल्या गावातही एक शो हाऊसफुल झाला म्हणून लोकाग्रहास्तव दुसरा शो लावावा इतक्या गर्दीत चालू आहे.
या चित्रपटाला मिळालेले राष्ट्रीय पारितोषिक अगदी सुयोग्य चित्रपटाला मिळाले आहे. हे वाक्य लिहिण्याचा योग येईलसे वाटले नव्हते!