तिकिटे खपवा

     सुमारे वीस वर्षांपूर्वीची हकीगत आहे. '"मेरी आवाज सुनो"", ""आवाज की दुनिया"" हे कार्यक्रम तेव्हा नवीन  होते. नवीन होते म्हणून लोकांचे आकर्षण होते. लोकांकडून कॅसेट मागवणे, ती तपासून आवाज  योग्य वाटला तर स्पर्धकाला बोलावणे हे प्रकार  अनोखेच होते. त्याच सुमारास विविध  क्लब, सामाजिक संस्था स्वतःच्या गायन स्पर्धा प्रचंड संख्येने आयोजित करू लागल्या होत्या.  परीक्षक , हॉल व  वाद्यवृंद या तीन गोष्टी मिळवल्या की झाली आयोजित स्पर्धा, अशी समजूत  वाऱ्याच्या वेगाने पसरलेली होती. अशातच एका संस्थेने एक स्पर्धा आयोजित केली. मी त्यात भाग घेतला. स्पर्धा चांगली रंगली. खूप जणांनी भाग घेतला होता.  निवेदक हाच स्पर्धेचा आयोजक होता. स्पर्धा सुरु असताना  "'माझा एक मित्र स्पर्धक नाही पण हौस म्हणून एक गीत सादर करतोय"',असे निवेदकाने सांगितले. त्याप्रमाणे तो मित्र आला व एक गीत बऱ्यापैकी आवाजात सादर करून गेला. गाताना तो मोकळेपणाने गात नव्हता असे वाटले.  त्याच दिवशी निकाल जाहीर झाले. मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. पारितोषिक मिळविलेल्या सर्वांनी एकमेकांशी ओळखी करून घेतल्या.  
    स्पर्धा संपली. स्पर्धकांची पांगापांग  होत असताना निवेदकाने फक्त पारितोषिक मिळविलेल्या सर्वांना जवळ बोलावले व सांगितले की, तुम्हा सर्वांची एक मीटिंग मी ठेवलेली आहे. अमुक दिवशी संध्याकाळी आपण  सगळे याच हॉलमधे पुन्हा भेटूयात."
   पारितोषिक मिळविणाऱ्यांमधे गायन क्षेत्रात  पुढे जाऊ इच्छिणारे बरेच होते. या मीटिंगमधून काहीतरी लाभ  होईल, या आशेने सगळे जमले. मी केवळ छंद म्हणूनच गात होतो पण उत्सुकता म्हणून मीही त्या दिवशी तेथे  गेलो.निवेदक हजर होता. तो मोकळेपणाने न गाणाराही हजर होता. त्याच्या चेहऱ्यावर दडपण होते.  निवेदकाने पुन्हा सगळ्यांकडून गाणी गाऊन घेतली. '"तुम्ही सगळे चांगले गाता. पण जीवनात पुढे जायचे असेल तर काहीतरी गमवावे लागते."" असे म्हणून निवेदकाने काही तिकिटांची बंडले काढली व म्हणाला," हा माझा मित्र कार्यक्रम आयोजित करतो. तुम्हाला आम्ही संधी देऊ शकतो. तुम्हाला आमच्या कार्यक्रमात गायचे असेल तर ही तिकिटे आधी खपवावी लागतील. काहीतरी मिळवायचे असेल तर थोडे कष्ट घ्यावे लागतात." 
  तो  मित्रही काही सांगू लागला.
  निवेदक कम आयोजक पुढे बोलत राहिला. ""मीही गातो. आमच्या वेळी आम्ही खूप कष्ट केले आहेत. तुम्हीही करा. आधी पैसे भरले तरच पुढे पैसे मिळतात" इत्यादी इत्यादी. 
  उपस्थित  पारितोषिक विजेत्यांनी एकमेकांकडे पाहिले. कोणाला काहीच कळत नव्हते. कुजबूज सुरु झाली.
   विजेत्यांपैकी एक जण म्हणाला, "मला उशीर होत आहे. मी जातो." 
   त्या पाठोपाठ आणखीही दोघे तिघे निघाले. हळुहळू सगळेच निघाले आणि हॉलबाहेर पडले.
   निवेदक मागून  ओरडत होता, "थांबा. इतक्यात  जाऊ नका. आपण बोलू." 

  कोणीही तेथे थांबले नाही. रात्र पडत चालली होती. एकंदर  तो सगळाच प्रकार संशयास्पद वाटला. निवेदक व मित्र या दोघांनीही                      "गाण्याचा कार्यक्रम कसला आहे, त्यामागील हेतू व्यावसायिक आहे की सार्वजनिक" याबद्दल काहीही पारदर्शक रीतीने सांगितले नाही. फक्त    "तिकिटे खपवा" या एकाच मुद्यावर ते बोलत राहिले. त्या हॉलच्या बाहेर आल्यावर कुजबुजीचा आवाज मोठा झाला. '"हा कोण माणूस आहे, कसली योजना मांडत होता " इत्यादी सवाल उपस्थित झाले." संगीताबाबत काही चर्चा होईल असे वाटले होते पण भलतेच काहीतरी पुढे आले.  बरे झाले, आपण  त्याच्या बोलण्यात अडकलो नाही. आपली दिशाभूल झाली असती"  यावर सगळ्यांचे एकमत झाले आणि प्रत्येकाने आपापल्या घराचा रस्ता धरला.