शेतकरी

    शेतकरी

शेतात पिवळ्या फुलांची मोहरी

अनिळे झाली कावरी बावरी

पवन शिरला आम्र-मोहोरी

सुगंध पसरला भोवती भारी

डोलती गव्हाच्या ओंब्या सोनेरी

देई संगत वाऱ्याची रागदारी

शीळ सरसरली पानावरी

 मंजुळ गाणे मोटेवरी

गोफण धरली पांखरांवरी

कशी फुर्र उडाली पहातरी

सुखावला शेतकरी, नजर हासरी

मोदभरे आली कारभारीण, घेऊन शिदोरी .......

      शेतकरी (२)

पिकल्या पिकास लावया हवी तीट     

अरे-रे लागली काळी कीट

गोंधळला गंधाळ वारा,सुगंधाचा आला वीट

वेड्यावानी करू लागला गारपीट

सूर्य काळवंडळला,ढग झाले धीट

कोसळले पिकांवरी नेटके नीट

हाय!कसे सांगू? किती घडले वाईट  

धूळ खाई, बळीराजाचा सोनेरी किरीट 

हताश तो टेकता झाडास, आली फीट

नव्हती फळे ,ज्यांची गोडी होती अवीट

दैव!दैव !दैव बनले जणू गिरगीट

उभारी देवो आपसातील प्रेम अमीट......

              विजया केळकर ____