बारा (डझना)च्या भावात ---

  "इतक्या  मुलांच्या  ताफ्याला कसा काय बुवा पोसतोस ? " गमतीने फ्रॅंकला आपल्या डझनभर मुलांबरोबर पाहून कुणी विचारलं तर तो तेवढ्याच गमतीत उत्तर देई "डझनाच्या भावात ते स्वस्त पडतं ("Its always cheaper by the dozen")   कुठलीही गोष्ट घाऊक प्रमाणात घेतली की स्वस्त पड़ते   पण म्हणून मुलेही अशी डझनभर अगदी हौस म्हणून सुद्धा होऊ  देणारी नवराबायकोची जोड़ी क्वचितच पहायला मिळते   आता  ज्या काळातली (१८७१)ही गोष्ट आहे त्यावेळी भारतात सुद्धा अनेक जोडप्याना १२-१३ मुले असायचीही अगदी रवीन्द्रनाथ टागोरांनाही १२-१३ भावंडे होती तर सध्याही लालूजीना डझनाच्या जवळपास अपत्ये आहेतच की त्यामुळे डझनभर मुलांचे आईबाप असणे याचे भारतीयांना काही कौतुक वाटायला नको.१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतही बरीच मुले असणारे आईबाप नसतीलच असे नाही पण अगदी ठरवून बारा मुलामुलींचे आईबाप होणे (त्यातही सहा मुलगे आणि सहा मुली) ही गोष्ट नवलकथा होण्याचे कारण त्या मुलांचा बाप फ्रैंक गिलब्रेथ आणि त्याची उच्चशिक्षित बायको  लिलियन   ! "चीपर बाय द डझन " हे  फ्रॅंक (ज्यूनियर ) व अर्न्स्टाइन या त्यांच्या दोन मुलांनी  आपल्या या जगावेगळ्या  कुटुंबाविषयी लिहिलेले  पुस्तक. त्यावर  काही चित्रपटही निघाले. व चांगलेच गाजलेही ,  

      फ्रैंक गिलब्रेथ हा time and motion तद्न्य म्हणून प्रसिद्ध  होता व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात त्याचे काळ व वेळ विषयक नियम त्याच्या स्पेलिंगची अक्षरे (Gilbreth)उलट्या क्रमाने घेतल्यास  होणाऱ्या Therbligsया शब्दाने ओळखले जातात.  लहानपणीच वडील मरण पावल्यावर फ्रॅंकचे  बालपण  गरिबीतच गेले . तरी  त्याला आईने प्रसिद्द M I T  शिक्षणसंस्थेत शिकवण्याचे ठरवले पण  आपल्या परिस्थितीचा विचार करून  गवंडीकाम  करणाऱ्या माणसाकडे तो कामाला राहिला आईने त्याला एकच मन्त्र दिला होता तो म्हणजे " गवंडी  झालास तरी सर्वोत्कृष्ट गवंडी  हो" फ्रैंकने आपले काम करताना हां उपदेश पुरेपूर अमलात आणला व हजर होताच तेथील कामाची पद्धत पाहून त्याने नापसंती व्यक्त केली आणि मालकाला सुनावले "हे काम यापेक्षा कितीतरी कमी वेळेत करता येईल" पण मालकाला या पोराचा हा आगाऊपणा आवडला नाही , "उगीच मला शहाणपणा शिकवू नकोस " त्याने त्या पोरालाच  सुनावले . पण पोरगा असं ऐकणाऱ्यातला नव्हता त्याने विटा  रचून भिंत बांधण्यासाठी एक लाकड़ी ओटा तयार केला त्यामुळे भिंत बांधताना  जमिनीवरील विटा  उचलण्यातील वेळ वांचू लागला व काम कमी वेळात होउ  लागले हे पाहुन त्यालाही ही युक्ति पटली आणि फ्रैंकने  तर त्या  ओट्याचे  पेटेंटच  घेतले आणि नंतर  कामातील वेळ वाचवण्याच्या पद्धतीचा तद्न्य (Time and motion study expert) म्हणूनच तो ओळखला जाऊ  लागला त्याला बायकोही उच्चशिक्षाविभूषित मिळाली आणि त्या दोघांनी संसार थाटला ते आपल्याला बारा मुले पाहिजेत असे ठरवूनच ! कारण काय तर त्याची  पद्धती संसारालाही कशी  उपयुक्त आहे  हे दाखवण्यासाठी ! अर्थात  त्या दोघानाही मुलांची    हौस  होती  हे तर खरेच ! पण या मुलांना व्यवस्थित वाढवण्यासाठी प्रत्येक मुलाला यंत्राच्या हालचालींचा असावा तसा एक तक्ता करून दिलेला असे व त्यात त्याने अथवा तिने उठल्यापासून अगदी दात घासण्यापासून आपल्या कार्यक्रमाची वेळेसकट कशी नोंद ठेवावी लागे ( यातून नुकतीच जन्मलेली व लिहायला न येणारी मुलेच  फक्त सुटत )याचे वर्णन करून तो एक सैनिकी शिस्तीचाच ( regimentation ) प्रकार होता असा मिस्किल शेरा या शिस्तीचाच भाग बनलेल्या या लेखक्द्वयांनी मारला आहे पण  एका मुलाचे पालकच  त्याच्या आपल्या एकाच मुलाच्या दैनंदिन कार्यक्रमाने कसे टेकीला आलेले असतात, तर अश्या बारा मुलांच्या पालकांना  असे सैनिकी शिस्तीचे  पालन करणे आवश्यकच  होते असे प्रतिपादनही केले आहे. 

         घरातील अनेक कामें करून  घेण्यासाठी या मुलांनाच आपण किती पैश्यात हे काम करू शकु याचा अंदाज एका कागदावर एका बंद पाकिटात सादर करावा लागे व् त्यातील कमीतकमी पैश्यात काम करणाऱ्या मुलाला अथवा मुलीला ते काम देण्यात येई एकदा त्याच्या एका मुलीने कमित कमी पैश्यात घराच्या बाहेरील भिंतीला रंग देण्याचे काम पत्करले कारण त्यातून तिला रोलिंग स्केट्स घ्यायचे असतात. त्या मुलीच्या वयाच्या मानाने ते काम खूपच कष्टाचे होते त्यामुळे त्या ठराविक वेळेत ते काम करताना टी अगदी झिट  येऊन पड़ते काय ऎसे वाटून "काम राहु दे " असे सांगायचे तिकया आईच्या मनात येते पण स्वत: गिलबर्थ मात्र "तिने ते तिच्या शब्दाला जागूंन  पार पाडलेच पाहिजे असे म्हणतो व तिलाच काम करू देतो . तिची आई त्यावेळी त्याला "पाषाण हृदयी " म्हणते पण फ्रैंक मात्र शेवटपर्यंत आपला हेका सोडत नाही. शेवटी ती  मुलगी काम संपवून अगदी जवळजवळ बेशुद्धच पड़ते पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर उश्याशी तिला हव्या असणाऱ्या स्केटसाची जोड़ी तिला मिळते तिची किंमत त्या कामाच्या बोलीच्या रकमपेक्षा कितीतरी जास्त  असते।त्यावेळी फ्रैंक म्हणतो,"तिला कळायला हवय की  तिचा डैडी नुसताच शिस्तीचा  भोक्ता नाही तर तिच्यावर प्रेमही तितकाच करतो"

                   वेळ वाचवण्याबाबतीत  फ्रॅंक गिलब्रेथ  किती दक्ष असतो याविषयी त्याच्या दोन मुलांनी लिहिलेल्या या कथेत दाढी करणे, स्नान करणे  अश्या अगदी क्षुल्लक गोष्टींचाही त्यांचा डॅडी कसा विचार करतो याची मजेदार हकीकत येते. साधी शर्टाची बटणॅ लावण्याची क्रियाही 

त्याच्या सूक्ष्म दृष्टीतून सुटत नाही. खालून बटणे लावत वरपर्यंत गेल्यास तीन सेकंदात तर वरून खालती आल्यास सात सेकंदात ही 

क्रिया होते असे त्याचे निरीक्षण. दाढी  करण्याचा वेळ वाचावा म्हणून दोन्ही हातानी दाढी करण्याचाही प्रयत्न तो करतो पण त्यात वाचणारा वेळ 

नंतर होणाऱ्या जखमांची मलमपट्टी करायला लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी असल्याने तो ती पद्धत वापरण्याचे रद्द करतो.शस्त्रक्रिया करताना योग्य 

ते हत्यार अचूकपणे देण्याचे काम परिचारिकेवर सोपवण्याची कल्पना त्याचीच  व तीच शस्त्रवेद्य आजही वापरतात. त्याच्या स्वतःच्या एका मुलाची टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया करताना शस्त्रवैद्याच्या हालचालींचे निरीक्षण करून तीच शस्त्रक्रिया कमी वेळात कशी करता येईल याविषयी सूचना तो शस्त्रवैद्याला देतो व आपले म्हणणे सिद्ध   करण्यासाठी आपल्या  सर्व मुलाच्या   (काहीच्या बाबतीत आवश्यकता  नसतानाही )  टॉन्सिल्स्च्या शस्त्रक्रिया हा पठ्ठ्या करतो.

       याशिवाय कोठेही बाहेर मुलांना घेऊन गेल्यावर हॉटेलमध्ये किंवा इतरत्रही डझनाच्या भावात त्याना काही सवलत मिळते का याची चौकशी करणे  सर्वांना एका मोटारीत कोम्बून भन्नाट गाडी चालवणे  ,शाळेतही प्रवेश घेताना व पुढेही वयाच्या मानाने शहाण्या आपल्या मुलांना वरच्या यत्तांमध्ये चढ़वणे  असे अनेक विनोदी प्रकार फ्रैंक करी व त्याचे वर्णनही तितकेच चटकदार पनणे  पुस्तकात आले आहे.एक  असाच विनोदी किस्सा लेखकद्वयांनी लिहिला आहे तो त्यांच्या शब्दातच असा आहे   

" इतकी मुले असल्यामुळे डैडचा त्याना ओळखण्यात कधी  कधी  गोंधळ  उडे असं काही लोकांच मत .डैड स्वत:च याविषयी एक किस्सा सांगत. एकदा आई ला एका ठिकाणी व्याख्यान द्यायला जायचे होते म्हणून आमची सेना त्यांच्या ताब्यात देऊन ती गेली. ती परत आल्यावर तिने  विचारले," सगळे काही सुरळीत झाले ना ? पोरांनी काही गोंधळ केला नाही ना?"

"नाही नाही मुळीच नाही " डैड म्हणाले आणि आमच्यापैकी एकाकडे बोट  दाखवून पुढे  म्हणाले ,"त्या स्वारीन ज़रा त्रास देण्याचा प्रयत्न केला पण एक रट्टा  दिल्यावर तोही  झाला सरळ " यावर आईचा चेहरा पडला आणि ती  म्हणाली ,"अहो तो आपला नाही आपल्या शेजारयांचा  आहे"  आम्हाला तर हां प्रसंग आठवत नाही। पण डैड ना असे विनोद करणे  आवडत असे. एक गोष्ट  मात्र खरी की आमच्या शेजारी दोन  मुले आमच्यासारखी केसाचा लाल रंग असलेली होती. "

       आपल्या मुलांचा अंघोळ घेतानाचा वेळही वाया जाऊ नये म्हणून जर्मन  आणि  फ्रेंच भाषेतील कॅसेटस तो बाथरूममध्ये लावून त्यांच्या कानावर त्या भाषा आपोआप पडतील असे तो करतो आणि आश्चर्य म्हणजे त्या ऐकून ती मुले खरोखरच त्या भाषा उत्कृष्ट बोलू लागली. तीच गोष्ट टंकलेखनाची व द्रुत आकडेमोडीची ! त्याच्या विशिष्ट पद्धतीने गेल्यामुळे सर्व मुले या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे करू लागली. आपल्या कल्पना अमलात आणण्याची प्रयोगशाळा  म्हणूनच आपल्या डझन अपत्यांचा तो उपयोग करतो . त्याला मुलांची आवड तर होतीच आणि त्यात तो अतिशय रमतो पण तशीच बायकोही त्याला मिळते हे आश्चर्यच  ! अतिशय शांतपणे ती एवढा मोठा कुटुंबाचा व्याप संभाळते . तीही उच्चविद्याविभूषित स्री असते व नवऱ्याच्या प्रत्येक मोहिमेत तीही उत्साहाने हातभार लावते एवढेच नाही तर श्रीयुत गिल्ब्रेथ त्यांच्या वयाच्या ५५व्या वर्षीच मरण पावल्यावर  एवढ्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी तर ती संभाळतेच पण त्याच बरोबर त्याच्या मृत्यूनंतर तो ज्या विषयावर भाषण देण्यासाठी एका विद्वत्सभेत जाणार असतो तेच भाषण अगदी त्याच्याच तयारीने ती देते ही  मोठ्या नवलाचीच गोष्ट. नवऱ्याच्या पश्चात मोठ्या हिमतीने ती त्याचा व्यवसाय सांभाळते आणि आपल्या अपत्यांना अगदी कुशलतेने कसे सांभाळते हा या कथेचा उत्तरार्ध  "बेलेज  ऑन देअर टोज " याच दोन मुलांनी लिहिला आहे "चीपर बाय द डझन " या कथेवरच तीन   चित्रपट निघाले व सर्व तितकेच गाजले. त्याचा उत्तरार्धही  चित्रपट स्वरूपात निघून  गाजला आहे.  या कथेला  एक कारुण्यपूर्ण किनार आहे ती म्हणजे या भावंडांपैकी एक मेरी ही तिच्या वयाच्या पाचव्या वर्षीच घटसर्पाने मरण  पावली आहे  पण "चीपर बाय द डझन" पुस्तकात व चित्रपटातही या गोष्टीचा उल्लेख नाही.तीन वेळा  निघालेल्या चित्रपटापैकी एका चित्रपटात या गोष्टीचा उल्लेख आहे म्हणे ! मात्र प्रत्यक्षात मेरीचे जाणे या कुटुंबाच्या मनास अतिशय लागून राहिले होते हे मात्र तितकेच खरे.

("चीपर बाय द डझन "या पुस्तकाचा मराठी अनुवाद मंगला निगुडकर यांनी अतिशय मनोरंजक  पद्धतीने केला आहे व मेहता प्रकाशन ने तो प्रकाशित केला आहे.)