संवाद स्वतःशी स्वतःचा

तुला रोग नाही तुला लोभ नाही
तुझा वेदनेशी न संबंध काही

शरीरास तू आपले मानतो रे
खरा कोण तू हे कुठे जाणतो रे

तुला मोह माया न मत्सर असावा
तुला मोक्ष इतुकाच हेतू दिसावा

तुझे दुःख तू दुःख मानू नको रे
सूखे शोधण्या व्यर्थ भटकू नको रे

स्वभावास अपुल्या खरे मान मित्रा
तुझ्या आत आनंद तू जाण मित्रा

तुला जन्म नाही तुला अंत नाही
कशाचाच आनंद वा खंत नाही

तुझा अंत ही कल्पना आज मिथ्या
व्यथा वंचना यातना सर्व मिथ्या

कधी ना घडावी मनी भाव हिंसा
सदा आठवावी जगी तू अहिंसा

तुझे भाव मित्रा तुला तू घडवती
तुला कर्मबंधातुनी मुक्त करती

तुझा कोण तू हे स्वतः जाण आता
खरे देव शास्त्रे गुरू मान आता
                           -----स्नेहदर्शन ,१०/०९/२०१५