"इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी" - खिळवून ठेवणारे पुस्तक

चार दशकांहून अधिक काळ कूमी कपूर या दिल्लीमध्ये पत्रकारिता करीत आहेत. त्यांच्या पत्रकारितेची धाटणी विद्वत्ताप्रचुर, जडजंबाल असे काही लिहिण्यापेक्षा गप्पा छाटण्याकडे जास्ती झुकते. आणि हे कुणीही मान्य करील की गप्पा छाटणे ही मानवाची मूलभूत गरज आहे!
काहींना चित्रपटातील तारे-तारका यांच्या वैयक्तिक बाबींबद्दलच्या गप्पा भावतात, काहींना खेळाडूंच्या म्हणजे, अर्थातच क्रिकेट खेळाडूंच्या. काहींना राजकारण्यांच्या अनेकानेक बाबी भुरळ घालतात. मी त्यांतला एक.
कूमी कपूर यांचे जाळे विस्तृत आणि भक्कम आहे. त्यांचे वडील आयसीएस अधिकारी होते. त्यांच्या बहिणीने सुब्रमण्यम स्वामींशी लग्न केले. कूमी कपूर यांनी पत्रकार वीरेंद्र कपूर यांच्याशी लग्न केले. वीरेंद्र आणि कूमी ही जोडगोळी दिल्लीतल्या सगळ्या हालचालींवर डोळे आणि कुजबुजीवर कान रोखून बसलेली असते.
या पुस्तकाच्या नावातच 'पर्सनल' आहे. त्यामुळे स्वतःबद्दल बरेचसे लिखाण आहे हे शीर्षकातूनच स्वच्छ केले आहे.
पण या पुस्तकात केवळ स्वतःचे कडवट अनुभव आणि त्या अनुषंगाने खलमंडळावर यथायोग्य टीका एवढेच नाही. किंबहुना तेवढेही नाही. जून १९७५ ते मार्च १९७७ हा पट उलगडताना स्वतःचे अनुभव त्यांनी निश्चितच मांडले आहेत.
वीरेंद्र कपूर यांना 'मिसा'खाली अटक झाली. अंबिका सोनी या बाई उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात आणीबाणीविरोधी काही पत्रके वाटण्यात आली. ती वाटणाऱ्या एक बारापंधरा वर्षांच्या मुलाला तुडवून काढावे असे आदेश अंबिकादेवींनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नि पोलिसांना दिले. वीरेंद्र कपूर यांनी त्यात नाक खुपसले. पोलिसांनी उचलले नि 'मिसा'खाली घेतले.
'मिसा' बद्दल माहिती नसणाऱ्यांसाठी - त्या काळात 'मिसा'खाली अटक म्हणजे शुद्ध वन-वे-स्ट्रीट होता. कारण 'मिसा'खाली अटक झालेल्या व्यक्तीला कुठलाही हक्क नसे. अगदी घटनेने बहाल केलेले मूलभूत हक्कही.
झाले. पोटाशी काही महिन्यांची तान्ही मुलगी आणि बहिणीच्या मागे पोलीसांचा वेगळा ससेमिरा. वडिलांना कर्करोग झाल्याचे निदान नुकतेच झालेले. एवढ्या मसाल्यावर एक चारपाचशे पानांची आत्मचरित्रात्मक कादंबरी सहज पाडता आली असती. 'स्टिल आय डिडंट ऍक्सेप्ट डिफीट', 'अँड यट आय फॉट ऑन' 'सर्व्हायव्हर ऑफ अ फाईट विथ अ डेमन' या किंवा अशा प्रेरणादायी नावांची.
पण कूमी कपूर यांच्या पुस्तकात तेरा प्रकरणांपैकी वीरेंद्र कपूर यांच्या तुरुंगवासाच्या कहाणीसाठी फक्त एक प्रकरण ठेवलेले आहे.
आणीबाणी हा अद्यापि बराचसा अनभ्यासित विषय आहे. त्याची कारणे बरीच आहेत. मुख्य कारण म्हणजे केंद्रातल्या राजकारणाची 'काँग्रेसविरोध' ही मूलभूत विचारधारा बदलून १९९२ पासून 'भाजपविरोध' ही विचारधारा प्रमाण झालेली आहे. त्यात गंमत म्हणजे आणीबाणीमध्ये विरुद्ध बाजूंना असलेली इतकी मंडळी कोलांट्या उड्या मारून इतर दिशांना गेली आहेत की आणीबाणीबद्दल वा आणीबाणीविरुद्ध बोलायचे म्हटले की बहुतांश जणांना अडचणीचे होते.
 उदाहरणेच पाहू. आणीबाणीत ज्या सोनिया गांधींच्या सासूबाईंनी ज्या सगळ्यांच्या डोक्यावरून आसुरी वरवंटा फिरवला होता, अशी नितीशकुमार, लालूप्रसाद आणि बाकीची समाजवादी मंडळी आता मुकाट त्याच सोनियाजींना आपल्या टीममध्ये घ्यायला तयार आहेत. आसुरी वरवंट्याची दुसरी बाजू समर्थपणे सांभाळणाऱ्या संजय गांधींचे वारस मनेका नि वरुण खुद्द भाजपमध्ये. आणीबाणीत काँग्रेसची साथ देणारे कम्युनिस्ट आणि आणीबाणीला विरोध करणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट एकत्र येऊन कधी काँग्रेसला पाठिंबा तर कधी विरोध अशा कोलांट्या मारत आहेत. आणीबाणीच्या काळात काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले शरद पवार आता काँग्रेसच्या बाजूने आहेत की विरुद्ध हे त्यांनाच ठाऊक नाही. युवक काँग्रेसमधून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केलेल्या ममता बॅनर्जी आता काँग्रेसला तिरक्या जायला तत्पर. संजय गांधींच्या कृपाप्रसादाने राजकारणाची सुरुवात केलेले मिस्टर क्लीन ऊर्फ विश्वनाथ प्रताप सिंह नंतर काँग्रेसविरोध, मग मंडलवाद आणि शेवटी अदखलपात्र नि दयनीय या चक्रातून फिरले. ज्यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध जयप्रकाश नारायणांचे नवनिर्माण आंदोलन आणि त्यातून जनता पक्ष आकाराला आला ते चिमणभाई पटेल (गुजराती जनतेत प्रसिद्ध नाव 'चिमणचोर') थेट जनता पक्षातच घुसून मुख्यमंत्री झाले आणि शेवटी काँग्रेसमध्ये परतले.
हा झाला वानवळा. त्यामुळे 'आणिबाणीमध्ये तुमची भूमिका काय होती' हा प्रश्न सगळ्यांनाच अडचणीचा. त्यापेक्षा भाजपला जातीयवादी म्हणणे इतरांना आणि भाजपलाही फायदेशीर.
असो.
कूमी कपूर यांनी पुस्तकामध्ये आणिबाणीच्या थोड्या आधीच्या काळापासून मोरारजी आणि चरणसिंग यांची सरकारे कोसळेपर्यंतचा पट विस्ताराने मांडला आहे. शेवटच्या 'एपिलॉग'मध्ये मुख्य पात्रांचा प्रवास त्यांच्या शेवटापर्यंत वा २०१५ पर्यंत मांडला आहे.
आणिबाणीमधली आणि आणीबाणीबद्दलची स्वतःची भूमिका बदलायची पाळी कधी न आलेल्या अरुण जेटली यांची समतोल प्रस्तावना पुस्तकाला आहे. जेटलींना पुस्तकाची प्रस्तावना आणि दूरचित्रवाणीवरचे कंठाळी वादविवाद यातला फरक व्यवस्थित उमगला आहे.
'मोदी सरकारचे हेतू' हा बागुलबुवा उभा करून गळे काढणे हे सध्या फ्याशनेबल आहे. असा गळा काढण्याबद्दल मला राग वा प्रेम काहीच नाही. गळा काढणाऱ्यांच्या फुप्फुसांना व्यायाम होतो. गळा न काढणाऱ्यांचा वेळ वाचतो. आपापले काय ते पाहावे.
एकच जाणवलेली गोष्ट म्हणजे मोदींइतक्याच (वा त्याहून जास्त) हुकूमशाही प्रवृत्तीचे एक सरकार आपण चाळीस वर्षांपूर्वी सोसले आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो. तो काळ फेसबुक-ट्विटर सोडाच, इंटरनेट वा एसटीडी फोनचाही नव्हता. पोस्टाने पत्रे वा तारा पाठवणे आणि ट्रंक कॉल बुक करून दिवसेंदिवस बसणे ही त्या काळी 'मेडिया आणि कम्युनिकेशन'ची व्याख्या होती. त्या काळातही आपण एक देश म्हणून त्यातून बाहेर पडलो.
गळे काढणाऱ्यांमुळे माझ्या मनात भीती उमटत नाही. माझ्या मनातली आशा ठणठणीत आहे.

द इमर्जन्सी - अ पर्सनल हिस्टरी
कूमी कपूर
पेंग्विन प्रकाशन
प्रथमावृत्ती जून २०१५
किंमत ५९९ रुपये