कुडाळ डायरी

"चला कुडाळ! कुडाळ! कुडाळ, क्लीनरच्या आवाजाने  डोळ्यावरची झोप   उडाली.  ब्रेकचा आचका देऊन  गाडी डेपोच्या कडेला लागली.सामान बायको आणी  मुलगी  या  तिघांना  सांभाळण्याची  कसरत  करत  खाली  उतरलो. लाल  मातीचा  धुरळा  उडवत  बस  निघून  गेली. आईच्या  कुशीत शिरल्यावर  मायेचा  एक  उबदार  स्पर्श  होतो  तसा   उबदार  स्पर्श  मनाला   चाटून  गेला. 
                  तसा   मी  मूळचा  कुडाळकर पण पोटापाण्यासाठी  मुंबईकर  रूढार्थाने  चाकरमानी . सणासुदीला  हमखास  गावाची  वारी  करणारा . मुंबईच्या  घड्याळ  पोटाला  बांधलेल्या  जगण्यात  तेवढाच  विरंगुळा.  इथे  आल्यावर  दिवस  कसा  मोठा  वाटतो.  बघता बघता  दिवस  कापरासारखे  उडून  गेले. परतण्याच्या दिवशी  सकाळीच  वाटलं  आज  शाळेत  जाऊन  येऊ. कॅमेरा  उचलून  निघणारच इतक्यात माझी  चार  वर्षांची  चिमुरडी  म्हणाली "बाबा   मला पण  बघायचाय  तुझा  स्कूल "   मी म्हणालो  "चल दाखवतो  तुला  माझी  शाळा. "
                     रविवार  होता  त्यामुळे  थोडी  धाकधूक  वाटत  होती.  शाळा उघडी  असेल  का? असली  तरी  कोणी  ओळखीच  भेटेल  का ?   फोटो  काढायला  देतील  का?  हजारो  प्रश्न  मनात  रुंजी  घालत  होते. 
रिक्शा  थांबली  आणि  मनालाही  ब्रेक  लागला. सामोरं  आलं कुडाळ  हायस्कूलच प्रवेशद्वार. लोखंडी  गेट ओलांडताना  काळ भर्रकन  सफेद शर्ट  आणी  खाकी  शार्टस्  मध्ये  गेला. मोठी  विलक्षण  होती  ती अनुभूती. "बाबा  किती  मोठं  आहे  तुझं  स्कूल! " मैत्रेयीच्या आवाजाने  मी वर्तमानात  आलो. 
                       शाळेची  मुख्य  इमारत  समोर  होती, आणि  व्हरांड्यात  उभे  होते आणावकर सर सध्याचे  मुख्याध्यापक. "ओळखलंत  का सर मला?" सर म्हणाले " चेहरा  ओळखीचा  वाटतोय " इतक्या  वर्षात  हाताखालून  इतके  विद्यार्थी  जातात  की प्रत्येकजण  लक्षात  राहीलच  याचा  नेम नाही. त्यामुळे जेव्हा  नाव  सांगितल्यावर  सरांनी  ओळखलं  तेव्हा  आश्चर्याचा  सुखद  धक्का  बसला.  मी  भीत भीत विचारलं " सर शाळेचे  काही   फोटोज  घ्यायचेयत " सर  म्हणाले  "अरे  वा!  आपलीच  शाळा  आहे, त्यात  काय  विचारायचं,  ये मी तुला  दाखवतो  शाळा. " तिथून  निघणारच  इतक्यात हातात  पुस्तक , तरतरीत  नाक, धारदार  डोळे  आणि  चालीत  तोच  रुबाब  आणि  दरारा  असणारे  सामंत  सर तिथे आले. त्यांना  पाहताच  मान नकळतपणे  नतमस्तक  झाली.  पुन्हा  एकदा  ओळखीचा  सोपस्कार  पार  पडला आणि  आम्ही  शाळा दर्शनासाठी रवाना  झालो. 
                              एखाद्या  लहान मुलाच्या  उत्साहाने  सर शाळा  दाखवत  होते. त्याचा  उत्साह  जणूकाही   संसर्गजन्य  असल्याप्रमाणे  माझा  कॅमेराही  मोकाट  सुटला  होता. माझी  चिमुरडी  हे  सारं  अप्रूप  डोळ्यात  साठवत  होती.  या  सगळ्या  प्रवासात  जाणवलं  की  शाळा  किती  अद्ययावत  झालीय.  वाचनालय  नवीनं  जागेत  आलंय, प्रयोगशाळा  मोठी  झालीय,  माडांच्या  झापांनी बनणार  रंगभवन  आता  काॅन्क्रीटचं  झालंय, शाळेचे  दोन  व्हर्च्युअल  क्लासरूम्स आहेत,  इंग्रजीचा  शास्त्रशुद्ध  अभ्यास  करण्यासाठी  लँग्वेज  लॅब आहे,  नवीन  बास्केटबॉल  कोर्ट  झालंय,  हे आणि  बरंच  काही . हे सर्व  पाहून  ऊर अभिमानाने भरून आलं. 
            बघता  बघता  चार  तास  कसे  गेले  कळलंच  नाही. त्या  चार तासात  वीस  वर्षांचा  प्रवास  करून  आल्यासारखं  वाटलं. शाळेशी  नात  अजून  दृढ झालं. 
               काही  आठवणींची  वीण इतकी  घट्ट  असते  की कधीही  उसवत नाही. असे  असतात  शाळेचे  मंतरलेले  दिवस,  अत्तरासारखे,  मनाच्या  कुपित  जतन करून ठेवलेले.  जेव्हा जेव्हा ही  कुपी उघडते  तेव्हा  आतला  सुगंध  अवघं  आयुष्य  दरवळून  टाकतो.  मन पुन्हा  एकदा  छोटं होऊन  त्या  प्रांगणात  धावायला  लागत,  वर्गात  जाऊन  बाकांवर  बसत,  दाराबाहेर  अंगठे  धरून  उभं राहत.  आणी  अचानक  डोळ्याच्या  कडा  ओलावून जातात.