आठवणींची शाळा

जेव्हा जेव्हा मनामध्ये आठवणींची शाळा भरते 
कोवळ्या कोवळ्या सोनपावलांनी दुपार अलगद संध्याकाळ होते.
संध्याकाळी दरवळतो मग मनात एक हळवा सूर
प्रयत्नपूर्वक थोपवतो मी उधाणलेला अश्रूंचा पूर .
उठून जेव्हा दिवा लावतो अवघ्या घराचे सोने होते
अंधाराचे काळे राज्य तेवढ्यापुरते मागे होते.
कपाटातून हळूच मग मी माझी जुनी वही काढतो
प्रत्येक पानापानामधून हरवलेला भूतकाळ पुन्हा चाळतो..
वहीतलं सुकलेलं गुलाबाच फुल
बांधत त्या दिवसांशी एक रेशमी पूल.
सुचत नाही काहीच मग मी उगाच कावरा बावरा होतो
बेधुंद उडत जाणारा मदमस्त पारवा होतो.
आता मनाचे सारे बांध पुरते फुटून वाहू लागतात 
डोळ्यांचा कडा  नकळतच आर्द्र होऊन जातात .
निर्धाराने आठवणींना मग मी परत धाडतो
आणि वेड्यासारखा पुन्हा त्यांची शाळा भरण्याची  वाट पाहतो.