शोध राजीव हत्येचा

                      मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते, अंगातून घाम सतत पाझरत होता. मनाने तर संपच पुकारला होता, कशातच मन लागत नव्हते. २ महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता. तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती. शरीर आता आराम मागत होते. तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला. मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले. बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच, मोहन ताडकन उठून बसत म्हणाला, " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं. "   साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली. साहेबांचे शब्द कानी पडताच मरगळ गळून पडली. लागलीच त्याने आपली वर्दीची टोपी उचलून, घराबाहेर पडला. " तुम्ही जेवून घ्या, माझी तातडीची बैठक आहे. " एवढेच त्याने अंगणातून ओरडून बायकोला सांगितले. गाडीची किक मारताच त्याचे विचारचक्र सुरू झाले. साहेबांनी सांगितल्यानुसार २१ मे ला राजीव गांधी यांची प्रचार सभा होती. ते विशाखापट्टणम वरून पेरुंबुदुर येथे रात्री १०. ०० च्या सुमारास येणार होते. या सभेच्या संरक्षणासाठी साहेबांनी एक कमिटी स्थापन केली होती. त्याच्या प्रमुखपदी मोहनची नियुक्ती करण्यात आली होती. आपल्यावर सोपवलेल्या कामगिरीकडे तो एक संधी म्हणून बघत होता. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलवून साहेबांची शाबासकी मिळविण्याचा निर्धार त्याने केला. गाडी पार्क करताच त्याची विचारांची माला खंडित झाली. बैठकीत कार्यक्रमाची   रूपरेषा ठरवण्यात आली. सर्वांना आपापली कामगिरी वाटून देण्यात आली. बंदोबस्तात कुठेही दिरंगाई होता कामा नये अशी साहेबांनी सर्वांना तंबी दिली. या प्रचार सभेला आठवडा अवधी असला तरी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक होते. असामी मोठी होती. सभेला जनसागर उसळणार ही भविष्यवाणी करण्याची गरज नव्हती, त्यासाठी नियोजनही तगडे लागणार होते.  
                                  -×-×-

                    बंदोबस्त एकदम चोख होता. कुठेही गडबड, गोंधळ होवू नये म्हणून जागोजागी पोलिस तैनात केले होते. गेटपासून ते मंचकापर्यंतचा रस्ता बराच अरुंद होता. कुणीही मध्येच रस्त्यात घुसू नये याची खबरदारी घेण्यात आली होती. एवढी सगळी तयारी करूनही मोहनला कुठेतरी चुकल्यासारखे वाटत होते. त्यामुळे   त्याने पुन्हा एकदा खातरजमा करून घेतली. सर्व काही व्यवस्थित आहे कळल्यावर कुठे त्याला हायसं वाटलं.  
                    मंचकाच्या डाव्या बाजूला पेरुंबुदुरचे प्रसिद्ध छायाचित्रकार हरिबाबू सुद्धा कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी आले होते. ते शालेय गणवेशात उभ्या असलेल्या कोकीळावाणीशी गप्पा मारत होते. कोकीळावाणीच्या आईच्याच प्रचार सभेसाठी राजीव गांधी येणार होते. राजीव गांधींना, कोकीळा आपण बनवलेली कविता ऐकवणार होती. हरिबाबूंनी मोहनला हात उंचावून ओळख दाखवली, मोहनने सुद्धा प्रतिसाद दिला. हरिबाबूंच्याच मागे एक पुरूष, पांढरा सदरा व पायजमा घातलेला. दोन स्त्रिया - एक साडी नेसलेली तर एक पंजाबी ड्रेस. पंजाबी ड्रेस वालीच्या हातात चंदनाचा हार होता, चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते, केसांमध्ये फुलांचा गजरा माळलेला होता. हे सर्व मोहनच्या चाणाक्ष नजरेने टिपले होते पण, असेल कुणी हरिबाबू किंवा कोकीळावाणीच्या ओळखीचे म्हणून त्याने त्यांच्याकडे काणाडोळा केला. पण वास्तविक पाहता हरिबाबूंच्या मागचे तिघेही कुणाच्याच ओळखीचे नव्हते.  
                    रात्री १० वाजून १० मिनिटांच्या सुमारास सात - आठ गाड्यांचा ताफा आला. अग्रस्थानी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या ambassdor गाडीतून भारताचे भावी नायक राजीव गांधी पायउतार झाले. ते मंचकाकडे येत असतानाच ठरल्याप्रमाणे कोकीळावाणी आपली कविता ऐकविण्यास पुढे सरसावली. त्याचबरोबर हरिबाबूंच्या मागे उभी असलेली पंजाबी ड्रेसवाली महिलासुद्धा कोकीळाच्या मागे - मागे हाती चंदनाचा हार घेऊन चालू लागली. ती कोकीळावाणीच्या सोबत आहे असा गैरसमज तेथील पोलिस यंत्रणेचा झाला. म्हणून त्यांनी तिला राजीव गांधीजवळ जाण्यास मज्जाव केला नाही. कविता ऐकत असताना २ - ४ शाळकरी मुले पोलिसांचा बंदोबस्त भेदण्याचा प्रयत्न करताना राजीवजींना दिसली, त्यांनी मुलांना येऊ देण्याचा इशारा केला. त्यांच्याबरोबर अजून २ - ४ मुलं शिल्लक घुसली. असा ८ - १० जणांचा घोळका आता राजीव गांधी यांच्या अवती भवती जमा झाला. त्यांना जनतेशी जवळून संवाद साधायचा होता. म्हणून पोलिसांनाही लोकांना हटकता येत नव्हते. याचा फायदा घेऊन लोक आपल्या लाडक्या नेत्याला जवळून बघण्याचा लाभ उठवत होते. राजीवजींना जवळून बघण्याचा मोह मोहनलाही न आवरल्यामुळे, तोही आता त्यांना जवळून निरखता येईल इतक्याच अंतरावर उभा होता.  
                            या आधीच्या सभाही त्यांनी अशाच पार पडल्या होत्या, जनतेत मिसळून. संरक्षणाचे सर्व नियम त्यांनी धुडकावून लावले होते. कविता संपल्यानंतर, पंजाबी ड्रेसवाली मुलगी राजीव गांधींच्या समोर उभी ठाकली. तिने त्यांना चंदनाचा हार घातला आणि नमस्कारासाठी खाली वाकली, काही कळायच्या आतच मोठा कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. स्फोटात मोहनचा डावा पाय जायबंदी झाला. अति रक्तस्त्रावामुळे त्याला ग्लानी येऊ लागली. घटनास्थळी सैरावैरा धावपळ सुरू झाली. आजूबाजूला प्रेतांचा सडा पडला. मोहनला उचलण्यासाठी दोन शिपाई धावत आले. त्याने शिपायांना विचारले, " राजीवजी कुठे आहेत? " शिपाई काहीच बोलले नाहीत. जो नाही तो जीवाच्या आकांताने धावत होता, या घाई गडबडीत कुणाच्या लक्षात येणार? राजीवजी कुठे आहेत ते. तो परत शिपायांवर जोरात खेकसला, " अरे राजीवजी कुठे आहेत? " शिपायांना राजीव गांधींना शोधायला पाठवून तो सुद्धा जायबंदी पायांनिशी उठणार तोच त्याचे लक्ष त्याच्या उजवीकडे पडलेल्या बुटांकडे गेले. ते त्याला ओळखीचे वाटले म्हणून खातरजमा करून घेण्यासाठी सरपटत तो त्या बुटांजवळ जाताच त्याने जोरात हंबरडा फोडला. आता मात्र बुटांची ओळख पक्की पटली होती. ते बूट होते भारताच्या सुपुत्राचे, ते बूट होते भारताच्या पहिल्या पंतप्रधानाच्या नातवाचे, ते बूट होते एका कर्तृत्ववान आईच्या मुलाचे, ते बूट होते देशाच्या सर्वात तरुण पंतप्रधानाचे, ते बूट होते भारतीय राजकारणाचे,    ते बूट होते भारतीय समाजमनाचे. ती एकमात्र निशाणी मागे ठेवून तो लोकनायक परलोकवासी निघाला होता. पुढील काही दशके तरी या नेत्याची, या राष्ट्राला गरज भासणार होती त्याच्या अशा अकाली जाण्याने राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण होणार होती. या घडी नंतर संपूर्ण देश दुःखाच्या खाईत लोटला जाणार होता.  
                    या घटनेचा मोहनवर इतका गंभीर परिणाम झाला की, त्या दिवसापासून त्याची वाचा गेली. तो कुणालाही प्रतिसाद देत नाही. त्याचे नैसर्गिक विधींवर पण नियंत्रण राहिले नाही. एकूणच त्याचा संपूर्ण शरीरावरचा ताबा सुटला आहे. नियंत्रणात आहेत ते फक्त डोळे, त्यांना खूप काही सांगायचंय, त्यांची व्यथा मांडायचीय, त्यांनी काय काय अनुभवलंय सर्व काही सांगायचंय, पण तूर्तास आसवे गाळण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत.....

                                       क्रमशः........

टीप : - या घटनेतील   " मोहन " नावाचे पात्र काल्पनिक असून वास्तव घटनेशी त्याचा कुठलाही संबंध नाही. कथा मनोरंजक व्हावी एवढीच त्या पात्राकडून अपेक्षा आहे. बाकीची पात्रे, ठिकाणे व घटनाक्रम वास्तविक आहेत.