असे कसे झाले ?

       मी नेहमी माझ्या प्रवासात काही तरी घडत असलेले अनुभव अनिलला लिहून पाठवतो व त्याला ते आवडते (असे तो म्हणतो) यावेळी योगायोगाने आम्ही अमेरिकेत होतो त्यावेळी तोही होता.आणि तो आमच्या थोडा अगोदर भारतात परत गेला (की आला ?) होता.   
  " आम्ही कालच पोचलो.प्रवास अगदी सरळ आणि विशेष सांगण्यासारखे न घडता म्हणजे त्याला अन्इव्हेन्टफुल म्हणावे असा झाला."  असा त्याचा मेलही आला होता. 
"अरे आपणच काहीतरी घडवावे लागते प्रवास इव्हेन्टफुल होण्यासाठी " मी गमतीने उत्तर दिले.  बहुधा नियति हे  ऐकत (वाचत?) असावी. 
              आम्ही २५ ऑक्टोबरला भारतात परत येण्यासाठी निघालो तो दिवस अगदी सर्वसामान्य  प्रकारचा होता.म्हणजे न्यू जर्सीच्या चंचल हवेनुसार  अगोदर एकदम थण्ड वारे ,मध्येच पावसाची सर येऊन जाणे किंवा तपमान एकदम खाली जाणे यापैकी काहीही त्या दिवशी घडले नाही. मागील वेळी आम्ही आलो होतो त्यावेळी याच सुमारास अगदी अचानक हिमवृष्टी झाली होती,त्यावेळी आम्हाला परतायला बराच अवधी होता ते अलाहिदा ! उलट यावेळी अमेरिकन लोकांच्या दृष्टीने हवा एकदम गरम म्हणजे आमच्या दृष्टीने अगदी योग्य होती. आमच्या जेट एअर वेजच्या परतीच्या उड्डाणाची वेळ सायंकाळी ७-३० होती व तीही सोयीची त्यामुळे आम्ही सकाळपासूनचे सर्व व्यवहार सुरळीत आटॉपून आमच्या चार बॅगा अगदी तेवीस किलोची मर्यादा सांभाळून व्यवस्थित बन्द करून,वर नावाच्या मोठमोठ्या चिठ्ठ्या चिकटवून  इतकेच काय त्यावर दोरीच्या नाड्याही दोन्ही बाजूंनी घट्ट आवळून बांधून  तयार ठेवण्यात  जास्तीत जास्त वेळ घालवून सुद्धा दुपारी दीडपर्यंत जेवण आटोपून बसलो.  नेहमी इतरांच्या बऱ्याचश्या सारख्या रंगाच्या व बनावटीच्या बॅगा असल्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता असते पण आता तसे होणार नाही अशी आता आम्हाला खात्री होती.मी थट्टेने म्हणालो सुद्धा "आपल्या बॅगा अश्या तयार आहेत की आंधळ्यालासुद्धा पट्ट्यावरून काढायला  येतील ."
     चाकखुर्चीचा पूर्वीचा अनुभव ध्यानात घेता नेवार्क विमानतळावर आम्हाला सोडायला येणारे चिरंजीव,सूनबाई व नातू यांच्याबरोबर जाण्यापूर्वीच्या गप्पा मारता येण्यासाठी चाकखुर्ची न घेणे योग्य ठरते.कारण चाकखुर्ची घेतली तर बोर्डींग पास मिळाल्यावर  लगेच खुर्चीवरच आरूढ व्हावे लागते व वाहकाबरोबर रहावे लागते आणि त्याच्या उपस्थितीत एकत्र बसून चहा कॉफीचा आस्वाद घेणे तर दूरच पण धड बोलणेही शक्य होणार नाही शिवाय तेथून आमच्या उडाणाचे प्रवेशद्वार फार अंतरावरही नसते या कारणाने जेट एअर वेज च्या कौंटरपर्यंत ट्रॉली वरून आमच्या चार बॅगा नेऊन  त्यांच्या ताब्यात देऊन व  बोर्डिंग पास घेऊन आम्ही मोकळे झालो व चाकखुर्ची आता नकॉ मात्र ब्रसेल्सला व मुंबईला मात्र घेऊ असे सांगितले कारण एकदा न घेतल्याच्या कारणावरून पुढेही चाकखुर्ची नाकारण्याचा अनुभव येताना आला होता (त्यावेळी जरा मनधरणी केल्यावर मिळाली होती म्हणा !) या बेतास चाकखुर्चीच्या आग्रही सौ.चीही सम्मती मिळाली.तसा पूर्वीसारखा चाकखुर्चीचा आग्रह आता होतही नाही शिवाय ती आणायला बरे अंतर चालून जावे लागते त्यापेक्षा प्रवेशद्वारापर्यंत चालतच गेलेले बरे असा विचार आम्ही केला .खरे तर मला चाकखुर्ची घेण्याचा मुळीच उत्साह नाही कारण चांगले चालता येत असून एकाद्या पांगळ्यासारखे चाकखुर्चीवर बसून रहाणे मला तरी अगदी सिक्षा दिल्यासारखे  वाटते शिवाय त्या वाहकाची जरा कीवही येते (नंतर त्याला पैसे दिल्यावर तो माझी कीव करत असेल)
        सामानाचे ओझे नसल्यामुळे मोकळेपणे आम्ही चहापान व गप्पा मारत बसलो पण सव्वापाचला चिरंजीवांस काय वाटले कोणास ठाऊक पण तो म्हणाला ,"उगीच वेळ घालवायला नकॉ कारण बोर्डिंग पास मिळताना अगदीच थोडे लोक होते त्यामुळे जरी वेळ लागला नाही तरी आता एकादेवेळी बरेच लोक आले असतील म्हणून सुरक्षा चाचणीसाठी गेलेले बरे." मागील वेळी आमची सुरक्षा चाचणी होऊन  आम्ही ती आटॉपून आत शिरत असल्याचे पाहूनच त्याना निघताही आले होते तसेच आता होईल असे वाटून द्वार क्रमांक ५५ कडे जाण्यासाठी थोडे पुढे जाऊन आत शिरावे म्हटले तर अल्लाउद्दिनच्या गोष्टीत धावत जाता जाता मध्येच एकदम जमिनीतून भिंत वर किंवा छतातून खाली यावी तसेच होऊन आमच्या पुढे जाण्याला खीळ बसली कारण  पट्टे आडवे लावून रांगा तयार केलेल्या व द्वार क्र.५१ ते ६० या सर्वांसाठी  एकच रांग लागली होती व ती प्रवेशद्वारापासून बरीच वळणावळणाची होत बाहेर आली होती व तीत आमच्या पुढे निदान पन्नासएक तरी प्रवासी असावेत. आता चाकखुर्ची न घेतल्याचा पश्चाताप झाला कारण  चाकखुर्चीचे दोन तीनच प्रवासी होते व महत्त्वाची गोष्ट म्हणजे तासभर आम्ही उभे रहाणार होतॉ तर ते जरी अर्धा तास लागला तरी बसून रहाणार होते. प्रत्येक वेळा शहाणपण उशीराच सुचण्याचा योग असावा पण  त्यावर आपल्याला विमानात पंध्रा सोळा तास बसायचेच आहे . आत्तापासूनच बसून बसून कंटाळाच येईल  म्हणून उभे रहाणेच बरे असे मनाला समजावले.
         जवळ्जवळ दीड तास रांगेत उभे राहिल्यावर मग सुरक्षा चाचणीसाठी आमचा नंबर आला. त्यात यावेळी चिरंजिवानी आय पॅड दिले होते ते बॅगेत ठेवायचे की नाही या शंकेचे एका सुरक्षा सेवकाने उत्तर देऊन तो बाहेर काढण्याचे आमचे काम वाचवले तरी बूट वगैरे न काढण्याची मुभा फक्त १२ वर्षाखालील व ७५ वर्षावरील प्रवाशांना असल्याचा फलक दिसत होता त्या दोन्हीही सदरात आम्ही बसत नसल्यामुळे आता कमरेचा बेल्ट,बूट,खिश्यातील वस्तू,घड्याळ काढून म्हणजे फक्त कपडेच अंगावर ठेऊन  या सर्व वस्तू व केबिन बॅगा,सौ.ची पर्स इ.गोष्टी प्लस्टिक ट्रेमध्ये ठेऊन त्या पट्ट्यावरून सुरक्षा चाळणीखालून जाऊ द्यायच्या ठिकाणी आम्ही आलो. नेहमीप्रमाणे सौ.च्या पर्समध्ये नाणी असल्यामुळे ती उघडून अमेरिकेतून काही हजारॉ डॉलर्स आम्ही पळवून नेत नाही याची खात्री करून दिल्यावर मग सुरक्षा चाचणीतून बाहेर पडून आमच्या वस्तू जमा करून आपले बूट, घड्याळ वगैरे मागे ठेवलेल्या बाकांवर बसून चढवू लागलो,रांग मोठी असली तरी स्त्रीपुरुषांसाठी एकच होती त्यामुळे यावेळी बायकॉ (अथवा नवरा) हरवण्याची संधी मिळाली नाही व आम्ही द्वार क्रमांक ५५ वर गेलो तेव्हां विमानात प्रवाश्यांना चढवण्यास सुरवातही झाली होती.
     अर्थातच तेथेही खुर्चीत बसण्याची फुरसत न मिळता एकदम विमानातच चढावे लागले व आसनावर स्थानापन्न झाल्यावरच अमेरिकेत आम्ही चुकलो तर आमचा ठावठिकाणा लागावा म्ह्णून घेतलेल्या मोबाइल फोनवर "आम्ही विमानात बसलो" हे  शेवटचे संभाषण करून तो फोन पूर्णपणे बंद केला.नाहीतरी आता तो फेकून देण्याच्याच लायकीचा उरला होता कारण भारतात ते कार्ड चालणार नव्हते.
     विमानात आजूबाजूला बहुतेक ५०% केम छो वालेच होते.आणि मराठी बोलण्याची क्षमता असलेले कटाक्षाने इंग्रजीतच बातचीत करत असल्याने त्यांच्या मराठी पणाचा पत्ता जर एकादे भांडण उपस्थित झाले तरच कदाचित लागणार होता .
      साडेसातला नेवार्क विमानतळ सोडल्यावर सहा तासाने ब्रसेल्सच्या विमानतळावर थांबायचे होते.माझी झोपायची वेळ अजून आली नव्हती व जेटचे कर्मचारी इतक्या लवकर कोणालाच झोपू देणार नव्हते.प्रथम प्रथेनुसार आम्हाला पोटावरील पेटी (सीट बेल्ट) कशी बांधायची व सोडायची,त्याचबरोबर विमानातील प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्यास वरून येणारा  मुखवटा तोंडावर कसा लावायचा किंवा विमान पाण्यावर उतरवावे लागले तर आसनाखाली ठेवलेले संरक्षक कवच अंगावर चढवून ते कसे फुगवायचे याची प्रात्यक्षिकासह माहिती प्रथम हिंदी व नंतर इंग्रजीतून देण्यात आली. त्यासाठी विडिओ टेपचा वापर करतात. पण अंदमानला जाताना माहितीची सी डी लावून त्या पार्श्वभूमीवर हवाई सुंदरीला फक्त हालचाली करून दाखवाव्या लागत होत्या त्या पाहताना  त्यांचे भरत नृत्यम् चे प्रॅक्टिस चालू आहे असे वाटत होते आणि त्यामुळे जरा करमणूक झाल्यासारखेही वाटत होते.या माहितीचा कितपत उपयोग होतो हे कळण्याचा योग सुदैवाने मला अजून प्राप्त झाला नाही.त्यानंतर लगेचच शीतपेय व एक शेव चिवड्याचे पॅकेट देण्यात आले हे अर्थात आम्हा शाकाहारी लोकांसाठी होते .ते संपते न संपते तोच जेवणाची वेळ (म्हणजे विमानातली) झालीच.माझ्या शेवेचा पुडाही अजून संपला नव्हता तरी आलेल्या अर्थात शाकाहारी जेवणाचा स्वीकार केला व त्याचबरोबर सफरचंदाचा रस-- त्याला पर्याय कोक,डाएट कोक ऑरेंज ज्यूस—घेतला.
     यानंतर पाच तासात ब्रसेल्स तेणार होते त्यामुळे बऱ्याच जणांनी घोरायला सुरवात केली तेवढे भाग्य माझ्या नशिबात नाही.सौ.ने तर विमानात शिरताच समोरील खुर्चीमागील पडद्यावरील निरनिराळ्या मनोरंजन स्थळांची पहाणी सुरू केली होती तिच्या सहवासाचा मलाही आता गुण लागल्यामुळे मीही त्या पडद्यावरील मनोरंजनाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न चालू केला कारण झोप येण्यासाठी वाचावयास घेतलेले पुस्तक माझ्या परंपरेला जागून मी डोक्यावरील सामान ठेवण्याच्या जागेत ठेवलेल्या केबिन बॅगेतच राहू दिले होते.ते काढून वाचणे शक्य नव्हते.सुदैवाने पुण्यात असताना चित्रपटगृहात जाऊन तर राहोच पण घरबसल्या दूरदर्शनवर दिसणारे चित्रपटही त्यातील जाहिरातींच्या माऱ्यामुळे पहात नसल्याचा फायदा आत्ता मिळाला कारण जेट एअरवेजच्या पटलावर उपलब्ध असणारे सगळे चित्रपट मला नवेच होते.
      मागील प्रवासात "एलिझाबेथ एकादशी " पाहिला होता तसाच एक मराठी चित्रपट "कोर्ट" पाहिला.व त्यानंतर "हॅपी जर्नी" हा आणखी एक मराठी चित्रपट पाहिला.तोवर ब्रसेल्स आल्याची घोषणा झालीच.यावेळी निघताना नेवार्कला हवामान चांगले होते तरी प्रवास सुरू झाल्यापासून मात्र मौसम खराब होनेसे पेटपर पेटी बांधनेकी सूचना सारखी होत होती त्यामुळे जागेवरून हालणे फारसे शक्य होत नव्हते.त्यात मध्ये प्रवाश्यांना झोप लागावी म्हणून अंधार केल्यामुळे एकदा स्वच्छतागृहात जाऊन परत येताना दुसऱ्याच एका ललनेच्या शेजारच्या खुर्चीवर जाऊन बसण्याची माझी चूक तिच्या जागरुकतेमुळे टळली व माझी मोठ्या संकटातून सुटका झाली. ती झोपेत असती तर मग माझी खैर नव्हती.कारण मग तिचा नवरा माझ्या सीटवर जाऊन बसला असता.आणि त्याबद्दल सौंने मला धारेवर धरले असते.अर्थात अशा काल्पनिक संकटामुळे भयभीत होण्यात काही  अर्थ नव्हता कारण  खरे संकट शेवटीच उपस्थित होणार होते.
        ब्रसेल्सला पोचलो तेव्हां तेथील घड्याळात सकाळचे ७/३० वाजले होते व तेथे तीन तास थांबायचे होते.केबिन बॅगा घेऊन खाली उतरल्यावर यावेळी मी ठामपणे चाकखुर्चीला नकार दिला कारण माझ्या मते इतका वेळ नुसते बसून राहिल्यावर आता पाय मोकळे करणेच आवश्यक होते सुदैवाने आमच्या वरिष्ठांनी त्यावर नकाराधिकार वापरला नाही व आम्ही शहाणपणाच केला असे दिसले कारण आम्हाला ज्या बी ४४ या प्रवेशद्वारावर जायचे होते ते फक्त एका चढावाच्या अर्धा कि.मि.अंतरावर म्हणजे अगदी काही पावलांच्या अंतरावरच होते त्यामुळे चाकखुर्चीसाठी वाट पहाण्यात जो वेळ गेला असता तेवढ्यात आम्ही ते अंतर चालून त्या द्वारापाशी पोचलोसुद्धा.यावेळी माझ्या सुचनेमागील दूरदर्शित्वाला मान्यता मिळण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. तरीही चाकखुर्चीवालेही आमच्या पाठोपाठ आलेच याची मला जाणीव करून देण्यात आलीच पण उशीर लागला असता तर होणारा पाणउतारा तरी टळला.
      ब्रसेल्सचा  विश्रामकाल विमानतळावर थोडे फिरण्यात गेला तोच विमानात शिरण्याची सूचनाही झाली व आत शिरून पुन्हा आपल्या जागांवर आम्ही स्थानापन्न झालो..पुढचा टप्पा नऊ तासांचा होता त्यात एकदा पेयपान एकदा चहा व एकदा भोजन यात काही काळ व नंतर बरेच सांगीतिक कार्यक्रम व "पिकू" हा बराच गाजलेला चित्रपट पहाण्यात  वेळ बऱ्यापैकी गेला.या प्रवासातही मौसम खराबची सूचना एकदोनदा झाली व पोटावरील पेटी बांधण्याचे कौशल्य आणखी वाढले पण सुदैवाने इतर काही न घडता मुंबई विमानतळावर भारतीय वेळेनुसार ११ वा. पोचलो. मागील एका वेळी विमान उतरवण्यास जागा नसल्यामुळे बराच वेळ मुंबईवरचआमचे  विमान फिरत होते त्यावेळी चिं.वि. जोश्यांच्या चिमणरावाची गाडी देवळाभोवती कशी फिरत होती आणि चिमणची आई , "बाळा प्रदक्षिणा गाडीतून नको घालायला! " म्हणते  त्याची आठवण झाली. तसे यावेळी झाले नाही व तसे का झाले नाही हे उतरताना कळले कारण विमान नेहमीच्या मार्गिकेला जोडलेले नव्हते विमानाला शिडी लावलेली होती व आम्ही धावपट्टीशेजारील जमिनीवर उतरलो व तेथून बसने विमानतळाच्या आत अगदी इमिग्रेशन कौंटरजवळच पोचलो.  बसने गेल्यामुळे मार्गिकेतील लांबलचक चालणे तर वाचलेच पण आम्ही अगदी इमिग्रेशनच्या जवळ पाच मिनिटांच्या अंतरावरच पोचलो त्यामुळे येथेही चाकखुर्ची न घेण्याचा माझा आग्रह मान्य झाला किंवा तसा आग्रहही धरावा लागला नाही कारण चाकखुर्चीधारकच आमच्यानंतर पोचणार होते.इमिग्रेशनमध्येही बऱ्याच खिडक्या उपलब्ध असल्यामुळे तेथूनही लवकर सुटका झाली व आमच्या मोठ्या बॅगा ज्या पट्ट्यावरून येणार होत्या त्या भागातच आम्ही शिरलो.   
       समोर जेट एअर वेजचाच बॅगेज क्लिअरन्स  विभाग होता व त्यात पट्ट्यावर सामान ह्ळूहळू प्रवेश करताना दिसत होते.आता हा प्रवासाचा शेवटचाच टप्पा असल्यामुळे व तसे आम्ही अगदीच वेळेत पोचल्यामुळे घाई करण्याची आवश्यकता नव्हती.जरा शान्त चित्ताने स्वच्छतागृहास भेट देऊन सामान काढून बाहेर पडावे या विचाराने आम्ही मोर्चा तिकडे वळवला.स्वच्छतागृहातून मी बाहेर पडल्यावर सौ.ची वाट पाहिली हो पुन्हा विमानतळावर बायको हरवली असे व्हायला नको.बराच वेळ वाट पाहिल्यावर माझ्या नावाचा पुकारा सामानवाहक पट्ट्याच्या भागाकडून येऊ लागल्यावर पहातो तो सौ.पट्ट्यासमोरच उभी राहून ट्रॉली आणण्याचा मला इशारा करत होती.सामान उतरवायला मदत करण्यासाठी एक जवान माझ्या पुढे पुढे करत होता (त्याच्या मदतीचा मोबदला अर्थातच मला चुकवावा लागणार होता) पण बॅगा काढताना त्रास होतो  असे मला बजावण्यात (कोणाकडून हे उघडच आहे) आलेले असल्यामुळे ट्रॉली व त्या जवानाला घेऊन तिच्यापर्यंत कसाबसा पोचलो कारण प्रवाश्यांची बरीच गर्दी ट्रॉल्यांसह मध्ये होती .तिच्यापर्यंत पोचेपर्यंत तिने आपल्या बॅगा झपाट्याने काढूनही ठेवल्या होत्या त्यामुळे माझ्या समवेत आलेल्या जवानास त्या बॅगा ट्रॉलीवर चढवणे एवढेच काम उरले.ते त्याने इमानेइतबारे करून आमच्या केबिन बॅगाही ट्रॉलीवर लादून आम्ही बाहेर पडल्यास सुरवात केली.
        त्यानंतर हरित मार्गा(ग्रीन पॅसेज) कडून म्हणजे ज्या प्रवाश्यांना परदेशातून म्ह.आमच्या बाबतीत अमेरिकेतून काही सामान आणल्याचे जाहीर करायचे नसते (म्ह.तसे काही सामान आणलेले नसते म्हणून) त्यांच्यासाठी नियुक्त केलेला मार्ग तेथून चाळणीतून सामान जाऊ देऊन बाहेर पडायचे हा शेवटचा टप्पाही पार पडला.तेथे आमच्या केबिन बॅगाच चाळणीतून नेण्यात आल्या आणि मोठ्या बॅगा मात्र तश्याच गेल्या आणि कस्टम क्लिअरन्सचे मी अगदी काळजीपूर्वक भरलेले फॉर्म्स हातात फडकवत मी बाहेर पडलो पण ते पाहण्यासही कोणी  तयार नाही तेव्हां त्यांना जरुरी नसेल तर मी का काळजी करू असे म्हणत अगदी कसलाच अडथळा न होता आम्ही बाहेर पडलो तो समॉरच "के के ट्रॅव्हल्स"चा प्रतिनिधी हातात फलक घेऊन उभा! त्याच्याशी संपर्क साधताच त्याने नाव विचारले.आम्ही निघतानाच पुण्यातल्या चिरंजीवांनी त्याना  मुंबई विमानपट्टणाहून आम्हास पुण्यास आणण्याची कामगिरी सोपवली होती.त्यामुळे त्याच्या यादीत आमचे नाव होतेच त्याने लगेच आम्हास त्याच्याजवळील खुर्च्यावर स्थानापन्न केले व आमचे सामानही के के च्या गाडीकडे नेण्यास त्यांच्या सेवकास सांगितले.आमची ट्रॉली आणणाऱ्या जवानास आम्ही खूष केले नाहीतरी चाकखुर्चीचा आमचा खर्च अगदी प्रवासाला निघाल्यापासून वाचला होताच.            
       आमच्या मागच्या प्रवासाला चार वर्षे झाली होती या काळात मुंबई विमानतळ खूपच सुधारला आहे असे दिसले.त्याला मनमोहन कारणीभूत होते की नरेंद्र हे समजले नाही,पण यापूर्वी बाहेर पडताना आम्हाला ज्या गर्दीस तोंड द्यावे लागले होते त्याचा अनुभव यावेळी आला नाही.आम्ही उतरलो होतो तो विमानतळाचा सहावा मजला होता.तळ मजल्यावरून आणखी दोन प्रवासी घ्यायचे असे के के च्या प्रतिनिधीने सांगितले व उद्वाहकात सामानासह आम्हाला चढवले.खालच्या तळावर गाडीत आम्ही बसलो.चढणाऱ्या दोन प्रवाश्यांपैकी एक पुरुष असेल तर तो पुढे बसेल व स्त्री असेल ती मागे सौ.जवळ बसेल असा आमचा होरा होता. आणखी खरेच   त्या दोन प्रवाश्यांत एक स्त्री व एक पुरुष होता पण ते नवरा बायको किंवा कोणताच नातेसंबंध नसलेले दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले प्रवासी होते. त्यामुळे तो पुरूष ड्रायव्हरशेजारी बसेल व स्त्री मागे सौ.जवळ बसेल असे आम्हाला वाटले म्हणून मी खाली उतरून तशी तिला विनंतीही केली पण तिला पुढे चालकाशेजारीच बसायचे असे तिने जाहीर केल्यावर माझा नाईलाज झाला म्हणजे आता तो दुसरा प्रवासी एका खिडकीजवळील बैठकीवर दुसया खिडकीजवळील बैठकीवर सौ.व मध्ये मी अशी बसण्याची व्यवस्था करणे हे ओघानेच आले.
        मधल्या बैठकीचा सीट बेल्ट तुटून त्या जागी भले मोठे टेंगूळ आलेले मला रुतू लागल्यावर त्या बैठकीचा बराच त्रास मला होऊ लागल्यावर आता हा प्रवासाचा शेवटचाच टप्पा आहे असा विचार मी केला पण  चालकाशेजारील मुलीलाच जणु फारच त्रास होत असल्याप्रमाणे ती चालकाला सूचना करत होती.तिला मगरप्ट्ट्यात जायचे होते .माझ्या शेजारील मुलगा बिचारा शांत होता.तिच्या सुचनेप्रमाणे पाय आवरून बसला व आपली बैठक शक्य तितकी कलती करून झोपण्याचा प्रयत्न ती करू लागली.तिला लगेच दुस़या दिवशी कामावर जायचे होते त्यामुळे तिला विश्रांतीची आवश्यकता होती हे ती पुन्हा पुन्हा चालकाला बजावत होती.चालकाने तिला मगरपट्ट्यातच  जाणाऱ्या आणखी तीन प्रवासी असलेल्या के के ट्रॅव्हल्सच्याच दुसऱ्या गाडीत बसवून देण्याचा विचार व्यक्त केला पण तिला तो पटत नव्हता कारण त्या गाडीत एकाच कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्यांची पटर पटर चालू असल्यामुळे तिला झोप आली नसती.हा ताशेरा मारून तिने मी माझ्याशेजारच्या मुलाची चौकशी करून तो  कोठे गेला होता व पुण्यात कोठे उतरणार ही चौकशी करून तो आंध्राइट असून मराठी चांगले बोलत होता त्याबद्दल त्याचे कौतुक करण्याचा जो प्रयत्न करत होतॉ त्याला लगाम लावला.ही पोरगी आपल्याला भारी ठरणार असे मलाच काय पण चालकालाही वाटू लागले त्यामुळे पुण्यात उतरताना आमचे उतरावयाचे ठिकाण सर्वात अगोदर आणि त्यानंतर त्या मुलाचे असल्यामुळे प्रथम उतरण्याचा तिचा आग्रह मोडून त्याने तिला शेवटी उतरावे लागेल याची कल्पना   दिली.त्यामुळे तिला त्याच्या दुसऱ्या गाडीतील मगरपट्ट्याच्या प्रवाशांबरोबर जाण्याचा पर्याय मान्य करावा लागला,शिवाय त्या गाडीतही तिला चालकाशेजारील बैठक देण्याचे आमच्या चालकाने त्या गाडीच्या चालकाशी भ्रमणध्वनीवर संभाषण करून निश्चित केल्यामुळे तिला त्या गाडीत न जाण्याचे कारण उरले नाही आणि खोपोलीला तिची रवानगी दुसऱ्या गाडीत करायचे ठरले आणि त्यामुळे आमच्या गाडीच्या चालकाने सुटकेचा निश्वास सोडला कारण सगळ्यात शेवटी तिला सोडायचे आणि वाटेत ती काय उपद्व्याप करेल या भीतीने त्याला ग्रासले होते असे नंतर त्यानेच आम्हाला सांगितले(म्हणजे उपद्व्यापाचा मक्ता फक्त चालकांनीच घेतला असतो असे नाही)..मीही माझ्या बैठकीत मला होणाऱ्या त्रासाची कल्पना दिल्यावर खोपोलीला दुसरा प्रवासी न घेतल्यामुळे तसा त्रास होणार नाही असेही त्याने सांगितल्यावर आम्ही पण थोडे निश्चिंत झालो असतानाच आमचा मोबाइल वाजला. 
        त्यावेळी पहाटेचे चार वाजले होते आणि इतक्या पहाटे आमच्या स्वागतासाठी कोणी स्वत:ची झोपमोड करून आम्हाला फोन करेल अशी शक्यता नव्हती. फोन के.के‌. शी  संपर्क साधण्यासाठी  बाहेर काढून माझ्या खिश्यात ठेवल्यामुळे लगेच बाहेर  काढून नेहमीच्या संवयीनुसार मी सौ.कडे सोपवला कारण सौ. कुलकर्णीच त्या बोलणाऱ्या व्यक्तीस पाहिजे होती त्यामुळे तिच्या मैत्रिणीलाच तिच्या आगमनाचा आनंद अगदी पहाटे पहाटे व्यक्त करायचा असेल असा मी अंदाज बांधला पण तो फोन जेट एअरवेजच्या प्रतिनिधीचा होता.आमचा प्रवास कसा झाला हे विचारण्याचा त्याचा उद्देश असावा असे मला वाटले. यापूर्वी केसरी ट्रॅव्हल्सच्या सहलीत हा अनुभव आला होता.   व त्याबद्दल जेट एअरवेजचे कौतुकही वाटले,पण प्रत्यक्षात तसे काही नसून त्याने आमच्या बॅगविषयी विचारणा सुरू केली व ती मुंबई विमानतळावरच राहिली आहे असे तो आम्हाला सांगू लागला पण आम्ही आमची बॅग आणली आहे असे आम्ही त्याला सांगू लागलो पण आमची बॅग विमानतळावरच राहिली असल्याची खात्रिपूर्वक ग्वाही त्याने दिल्यावर मात्र आमच्या बॅगेविषयी आम्ही इतके दक्ष असताना आणि शिवाय आमची कोणतीही बॅग सुमारे दहा फूट अंतरावरून ओळ्खता यावी अशी सोय आम्ही केलेली असल्यामुळे असे कसे झाले कळेना पण आमच्या त्या खबरदारीचा जेट एअरवेजलाच  उपयोग झालेला दिसला आणि ती बॅग आमचीच हे त्यांनी ओळ्खली व त्यावर भ्रमणध्वनिक्रमांकही असल्यामुळे त्याना आमच्याशी लगेचच संपर्क साधता आला.त्याच्या वर्णनावरून  ती बॅग आमचीच होती हे उघडच होते आणि त्यावरून निघणारा निष्कर्ष धक्कादायक होता तो म्हणजे आम्ही तशीच दिसणारी दुसऱ्या कोणाची तरी बॅग घेऊन आलो होतो.सुदैवाने आम्ही आमची बॅग तेथेच ठेवल्यामुळे त्याची बॅग पळवली असा आरोप तरी आमच्यावर होऊ शकत नव्हता एवढेच आमचे भाग्य !.
      बॅगा पट्ट्यावरून काढण्यात माझा काहीच सहभाग नसल्यामुळे बॅगेचे काही का होईना पण त्यामुळे माझ्यावर बंदूक रोखण्याची संधी हेच काम नेहमी करणाऱ्या व्यक्तीला मिळणार नाही याबद्दल मी देवाचे आभार मानले इतकेच काय पण या चुकीला सर्वस्वी तीच जबाबदार असल्यामुळे मी "असे कसे झाले " इतकेच उद्गार काढणे पसंत केले व तिने माझ्या हाती फोन दिल्यावर जेट एअरवेजच्या प्रतिनिधीशी मी बोलू लागलो.आता आम्ही खोपोलीच्या जवळ आल्यामुळे परत मुंबई विमानतळावर बॅग घेऊन येता येणार नाही हे त्याला सांगितल्यावर त्याने आमची बॅग पुणे विमानतळावर पाठवतो व पटेलची बॅग घेऊन आम्ही पुणे विमानतळावर यावे असे सुचवले.अर्थात या सूचनेला नकार देणे मला शक्यच नव्हते व तसे मान्य करून मी गप्प बसलो.
        आम्ही आणलेली बॅग पटेल नावाच्या व्यक्तीची होती व तो अहमदाबादला जाणार होता,म्हणजे तो आता गेलाही होता पण जाताना त्याने आपली बॅग न मिळाल्याची तक्रार जेट एअरवेजकडे केली होती असे दिसते.पण प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने पहाणाऱ्या म्हणजे माझ्या हातातून बडिशेपेचा एकादा दाणा फरशीवर पडला तरी तो वेचून माझी सोन्याची आंगठी पडली असावी अश्या आविर्भावात माझ्या हातात ठेवून "पहा काय पडले हे तुमच्या हातून" हे बजावणाऱ्या सौ.ला वीस पंचवीस किलोच्या बॅगेतील फरक न जाणवणे ही गोष्ट मला तरी अशक्य कोटीतीलच वाटली पण तसे झाले होते हे मात्र खरे.मला वेगळीच शंका आली त्या बॅगेमध्ये काही संशयास्पद वस्तू असल्यामुळे आणि ती आमच्या बॅगसारखी दिसत असल्याने सौ.ची नजर चुकवून ट्रॉलीवर चढवून आमच्या सामानातून बाहेर येऊ द्यायची आणि मग तक्रार करून ती पुन्हा हस्तगत करायची असा विचार तर त्या जो कोणी पटेल होता त्याने केला नसावा ?कारण बरेच वेळा असे दुसऱ्या प्रवाश्याचे सामान नेऊन अडचणीत आलेल्या लोकांचे अनुभव मी वाचले होते त्यामुळे विमानतळावरही तुम्ही दुसऱ्या कोणाचे सामन आणले नाही ना असे विचारले जाते. खोपोलीला प्रवासी हस्तांतरण करताना सामानाची पडताळणी केल्यावर बदललेली बॅग जरी आमच्या बॅगेसारखी दिसत होती तरी त्यावर कुठलीच नावाची पट्टी चिकटवलेली दिसत नव्हती.नंतर पुण्याला गेल्यावर बारकाईने पाहिल्यावर ती दिसली व हा मयांक पटेल अहमदाबादलाही नाही तर तेथूनही अजून दूर असणाऱ्या खेडा जिल्ह्यातील ठस्रा या गावी रहात होता आणि त्याचा पत्ताही चोरावाला फलिया  होता.  
       आजपर्यंत मी आयुष्यात शेकडो चुका केल्या त्या पोटात घालणाऱ्या (अर्थात प्रत्येक वेळेला तशी जाणीव मला देऊनच) सौ.ने ही प्रचंड चूक करून सौ सुनारकी आणि एक लुहारकी" ही म्हण खरी केल्याचे दिसत होते.अर्थात त्यावर तीच स्वत:ला इतका दोष देत होती आणि त्रागा करत होती की मी त्यावर गप्प रहाणेच इष्ट होते.नेहमी मी तिला रडवतो हा तिचा दावा मला सिद्ध करण्यास आता वावच उरला नव्हता.
      आम्ही पुण्यात पहाटे साडेचारला पोचलो. दोन दिवसाचा जागरणयुक्त प्रवास  संपल्यावर मुक्ततेचा जो आनंद मिळायला हवा तो त्या बॅगेत बंद केल्यासारखा झाला होता.त्यामुळे थोडीफार झोप घेण्याचा प्रयत्नही सफल झाला नाही.पुणे विमानतळावर कोणाला भेटायचे बॅग कोणाकडे द्यायची आणि आमची बॅग कोणाकडून घ्यायची हा प्रश्न मनात डाचतच होता.त्यात पुन्हा मयांक पटेलची बॅग आपण उचलून आणल्यामुळे त्याला त्याची बॅग घरपोच करणे आपली नैतिक जबाबदारी आहे असे मला वाटत होते कारण जेट एअरवेजतर्फे ती फारतर अहमदाबाद विमानतळापर्यंत गेली असती व तेथून मयांक पटेललाच न्यावी लागली असती.शिवाय यापूर्वीचा आपली बॅग विमानतळावर राहिली असता ती मिळवण्याचा इतरेजनांचा अनुभव फारसा आनंददायक नव्हता.
           यापूर्वी एकदा माझ्या मुलाचेच काही सामान त्याच्या फ्लाइटने  मुंबईस आले नव्हते ते पुढील फ्लाइटने येईल असे सांगण्यात आले आणि त्याला पुढे बंगळुरूला जायचे असल्यामुळे त्यावेळी मयांक पटेलसारखे ते सोडूनच त्याला पुढे जावे लागले होते. ते त्यानी बंगळुरू विमानतळावर पाठवण्याचे कष्टही घेतले नाहीत. परत  मुंबईस गेल्यावर ते घेण्यासाठी त्याला विमानतळावर असे सामान ठेवलेल्या कक्षात जाऊन आपलेच सामान मिळवण्यासाठी जणू काही त्याने चोरीचाच माल आणला असावा अश्या पद्धतीने त्याला वागवण्यात येऊन बरेच सव्यापसव्य करावे लागले होते. त्यात त्याचा काही दोषही  नव्हता आता येथे तर आम्ही पटेलची बॅग उचलून आणली होती त्यामुळे आमचे सामान पुणे विमानतळावर येईल याविषयीच मी साशंक होतो आणि पुन्हा त्यासाठी मुंबईस जाऊन ते मिळवणे माझ्या दृष्टीने कठीणच काम होते शिवाय ते सौ.च्या नावावर असल्याने दोघांनाही जाणे आवश्यक होते    त्यामुळे आपली बॅग गेली असेच मी समजून चाललो पण मयांक पटेलला बॅग कशी पोचवावी याचाच घोर मला पडला.ती कुरियरने त्याच्या पत्त्यावर पाठवावी जो काही खर्च होईल तो अर्थातच अक्कलखाती खर्च या सदरात टाकण्याचे मी केव्हाच ठरवले होते.        
      दुसऱ्या दिवशी मी जेट एअरवेजच्या ज्या फोन नंबरवरून मला गाडीतून परत येताना जो फोन आला होता त्या क्रमांकावरच  फोन करण्याचा  व पुणे विमानतळावर कोणाशी संपर्क साधायचा हे विचारण्याचा प्रयत्न केला.त्याने मलाच  बॅगचा विशिष्ट क्रमांक जो बॅग चढवताना मिळतो तो विचारला व तो लगेच हाताशी नसल्यामुळे त्याला तो पाहून सांगतो असे म्हणालो.त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधता आला नाही.संध्याकाळी एका स्त्रीचा फोन आला तिचे उच्चार अमेरिकन वाटत होते.इंग्रजीतच तिने बॅग पुणे विमानतळावर पोचवली का हे विचारले अर्थात ती मयांक पटेलची आमेरिकास्थित मुलगी असावी.त्यावर मी जेट एअरवेजच्या प्रतिनिधीशी बोलत आहे व तसे न जमल्यास कूरियरने बॅग पाठवत आहे असे तिला सांगितल्यावर "कृपया लवकर पाठवा"असे सांगून तिने फोन बंद केला. 
        माझ्या नेहमीचा एक कुरिअर व्यावसायिकाचा क्रमांक मला माहीत होता त्याला फोन करून मी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील ठसरा या गावी कुरिअर जाते का याची विचारणा केली त्याने चौकशी करून सांगतो असे सांगितले त्याचबरोबर आणखी एक जवळच असणारा दुसरा कुरिअर व्यावसायिक होता .मी प्रत्यक्ष जाऊन त्याच्याशी बातचीत केली . त्याने डी टी डी सी व मारुति कुरियर या दोन्हींची शक्यता वर्तवली व तीन ते चार हजार रु.पडतील असे सांगितले कारण  पटेलच्या बॅगेचे जास्तीत जास्त वजन तेवीस किलो असेल असा माझा अंदाज होता . त्या बॅगेकडे पहाण्याचेही मी टाळत होतो.आणि तिच्याकडे पाहून सौ.ला परत परत आपल्या  बॅगेच्या आठवणीने उमाळा येत होता आणि असे कसे झालेचा मंत्र ती जपत होती त्यामुळे  घरात वजन काटा उपलब्ध असतानाही त्या बॅगेचे वजन करावे हे आमच्या दोघांच्याही ध्यानात आले नव्हते.दुसऱ्या दिवशी सूनबाई आली असताना तिला रिक्षा घेऊन येण्यास सांगितले व रिक्षात घालून ती बॅग कुरिअरकडे नेण्याचे ठरवले.
            त्यावेळी ती बॅग बारकाईने पाहिली तर तिला अगदी छोटे कुलूपही लावलेले नव्हते  कारण जर काही संशय आला व कस्टम अधिकाऱ्यांना बॅग उघडावी लागली तर कुलूप तोडावे लागू नये म्हणून  हल्ली विमानप्रवासात कुलूप न लावताच बॅगा ठेवाव्यात असा सल्ला दिला जातो,आम्हीही या आदेशाचे पालन केलेच होते पण आम्ही आमच्या बॅगांवर दोऱ्या तरी  गुंडाळल्या होत्या.पण ही बॅग अगदी गच्च भरलेली होती आणि झिप फक्त ओढून ठेवलेले होते म्हणजे ती बॅग उघडून पहाणेसुद्धा मला शक्य होते अर्थात तसे करण्याची मला आवश्यकता आणि इच्छाही नव्हती पण आता त्या बॅगेवर  लेबल अगदी छोटे असलेले दिसले ते मात्र काढून टाकून त्यावरील पत्ता मोठ्या अक्षरात लिहून एका बाजूला ते व दुसऱ्या बाजूला प्रेषक म्हणून आमच्या नाव व पत्त्याचे लेबल लावले .अधिक सुरक्षितता म्हणून मयांक पटेलला संदेश पाठवून त्याचा पत्ता मी मागवला होता व त्या पत्त्यावर कुरियर पाठवतो असे आश्वासन दिले.आणि झिपच्या दोन्ही बाजूंना तारा टाकून ती बंदिस्त केली ज्यामुळे कुरियर वाल्याला ती उघडण्याचा मोह न व्हावा व ती बॅग घेऊन कुरिअरकडे गेलो.त्याने त्या दोनपैकी एका पद्धतीने शक्यतो डी टी डी सी कुरियरकडूनच ठसऱ्याला बॅग पाठवू अस्र आश्वासन दिले.आता तो पावती देईल व आपली सुटका होईल असे मला वाटले पण तसे न होता माझ्या अंदाजानुसार जास्तीत जास्त   वजनाचे  होतील म्हणून तेवढे पैसे घेऊन कोथरूडच्या ऑफिसात ही बॅग पोचवतो असे तो म्हणाला.
           आता मी जरा धास्तावलो कारण कोथरूडच्या ऑफिसातच डॉकेट नंबर व पावती मिळेल असे त्याने सांगितले.म्हणजे आता बॅग त्याच्याकडे दिल्याचा काहीच पुरावा माझ्याकडे उरणार नव्हता. तसा सूनबाईने त्या बॅगचा फोटो घेऊन ठेवला होता. कुरिअरवाल्याने त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगितले व मी तसा विश्वास ठेऊन घरी आलो. कारण दुसरा पर्यायच नव्हता .घरी आल्यावर थोड्यावेळाने त्याचा फोन आला व बॅगेचे वजन तीन किलो ज्यादाच आहे,शिवाय डी टी डी सी चे कार्यालय ठ्सरा येथे नाही त्यामुळे मारुती कुरियरने पाटवावे कागेल व त्याचे सेवाशुल्क आणखी जास्त .होईल असे  सांगितले शिवाय त्याला बॅगेत घरगुती वापराचेच साहित्य आहे असे प्रमाणपत्र पण हवे होते.बॅगेत काय होते ते मला माहीत नव्हते पण तसे प्रमाणित करायला माझी काही हरकत नव्हती आणि दुसरा पर्यायही नव्हता कारण तसे प्रमाणित करूनच बॅग विमानतळाबाहेर काढली होती.त्यामुळे उरलेले पैसे व ते प्रमाणपत्र न्यायला तो धापा टाकीत सायकलवरून आला.व त्या दोन गोष्टी त्याच्या मी स्वाधीन केल्या.  
      दुपारी या घटना घडल्यावर मयांक पटेलचा फोन आला व मी त्याला कुरिअरने बॅग पाठवतो असे तोंडी सांगितले व तसा संदेशही पाठवला हो लेखी पुरावा असलेला बरा.त्याने डॉकेट नंबर मागितला पण तो मला मिळाला नाही पण मिळताच पाठवतो.असे त्याला सांगितले.बहुतांश वेळा मयांक पटेलची मुलगी म्हणजे कोणीतरी स्त्री अमेरिकन उच्चारात बोलत असे आणि कौतुकाचा भाग म्हणजे दोघांपैकी कोणीही त्रासिक उद्गार काढत नव्हते.मी त्यांची बॅग आणून त्यांचा खोळंबा केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यावरही त्यानी "असे होऊ शकते"अशी अगदी सौम्य प्रतिक्रिया दिली,किंवा बॅग पाठवण्यास जरी थोडा वेळ लागत होता तरी "अजून कशी पाठवली नाही बॅग " असा तक्रारीचा सूरही काढला नाही.खरे तर त्यात मयांक पटेलच्या बायको की आई च्या औषधाच्या गोळ्या होत्या.ती चाक खुर्चीवरून आल्यामुळे त्यांना सामानाच्या पट्ट्यापर्यंत यायला उशीर झाला आणि तोवर आम्ही त्यांची बॅग नेली होती असा खुलासाही त्यानी नंतर केला.थोडक्यात आम्ही चाकखुर्चीचा वापर करण्याचा आग्रह धरला असता तर कदाचित हा अनवस्थाप्रसंग टळला असता.चाकखुर्ची न घेण्याच्या माझ्या आग्रहामुळेच हे सगळे घडले असा दोषारोप माझ्यावर आता ठेवला जाण्याची शक्यता होती पण बराच काळ मध्यंतरी लोटल्यामुळे त्या संकटातून मी वाचलो. !
            त्याच दिवशी मला जेट एअर्वेजचा फोन आला ,"मयांक पटेलची बॅग पुणे विमानतळावर पोचवली का ?" मी ती कुरियरने पाठवली असे सांगितले आणि त्यानी फोन बंद करण्यापूर्वी चपळाई करून माझ्या बॅगचे काय झाले असे विचारले"त्यावर त्यांनी "तुमची बॅग पुणे विमानतळावर पाठवली आहे व तेथे तुम्हास मिळेल"असे सांगितले. हा मला आश्चर्याचा झटकाच होता त्यामुळे माझ्या बॅगेवर मी पाणी सोडून दिलेले असताना एकदम ती मिळण्याची माझी आशा पल्लवित झाली.लगेच मी आंतरजालावरून विमानतळाचे काही फोन क्रमांक शोधून तेथे फोन लावायला सुरवात केली. कारण जेट एअरवेजने दिलेला फोन कोणी उचलत नव्हते.विमानतळावरील फोन लागले तरी आमच्या बॅगचा पत्ता जेट एअरवेजच्या पुणे विमानतळावरील  कार्यालयातच लागेल असे समजले त्यामुळे दुसऱ्या दिवशी चिरंजीवाच्या गाडीतून -- त्याचे ऑफिस कल्याणीनगरला म्हणजे पुणे विमानतळाजवळच असल्याने --- जावे असे ठरवले.
      दुसऱ्या दिवशी सकाळी  बॅगेजच्या पट्ट्या चिकटवलेले  आमचे बोर्डिंग पासेस व  आमचे पासपोर्ट वगैरे घेऊन आम्ही तयार झालो पण चिरंजीव येण्याच्या सुमारास फोन केला असता जेट एअरवेजचे ऑफिस अर्ध्या तासातच बंद होणार असे कळले. उड्डाणाच्या वेळीच ते उघडते असे कळले व ते संध्याकाळी पाच वाजता उघडणार असे कळले त्यामुळे चिरंजीवापाशी आमचे बोर्डिंग पासेस व आम्हाला मिळालेले फोन क्रमांक देऊन चौकशी करण्यास सांगितले.
         त्यानंतर कुरियर ऒफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन डॉकेट क्रमांक आणावेत म्हणून गेलो पण अजून मिळाले नाहीत असे त्याने सांगितले आणि जरा नाराज होऊनच मी घरी आलॉ आणि वाटेतच मयांक पटेलचा फोन आल्यावर त्याला पाठवतो म्हणून सांगितले.घरी आल्यावर मी कुरिअरवाल्याला फोन केला, माझ्या घाई करण्याचा त्याला जरा राग आलेला दिसला आणि तो त्याने व्यक्त केल्यावर मी मयांक पटेलची गैरसोय समजाऊन सांगितली.नंतर थोड्याच वेळात त्याने मेसेज करून तो क्रमांक कळवला. तो मी मयांक पटेलला ताबडतोब  कळवला.
           त्या दिवशी संध्याकाळी चिरंजीवांचा बॅग मिळाली असा फोन आला.त्याला कुठलीच कटकट न करता बॅग मिळाली असे तो म्हणत होता.  आता या प्रकरणातून काही अंशी मुक्त झालो असा थोडासा सुस्कारा मी टाकला कारण  अजून मयांक पटेलला बॅग मिळाल्याचे कळले नव्हते.नंतर रात्री फोनवर थॅंक्स  असा त्याचा संदेश दिसला म्हणजे त्याची बॅग त्याला मिळाली असे समजून त्या रात्री जरा सुखाने झोप लागली.पण तेवढ्यावर समाधान न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी मयांक पटेलला फोन केला असता त्याने बॅग तर अजून मिळाली नाही असे सांगितले. मी डॉकेट क्रमांक कळवल्याबद्दल त्याने तो मेसेज पाठवला होता. त्यावर कूरिअरवाल्याला फोन केल्यावर उद्या निश्चित मिळेल असे त्याने सांगितले.आणि त्याच दिवशी रात्री पुन्हा त्याचा संदेश आला त्यात बॅग पटेलचा माणूस  घेऊन गेला असे त्याने कळवले.त्याचे नावही त्याने सांगितले.दुसऱ्या दिवशी पटेलला फोन केल्यावर त्याने बॅग मिळाली हे सांगून आभार मानले इतकेच काय ठसऱ्याला या आणि जमवानू माटे (खाना खानेको जरूर आना) असा आग्रहही केला.ठसऱ्याचा ठसका विसरणे शक्य नाही असे त्याला सांगून त्याच्या निमंत्रणाबद्दल आभार मानून मी या प्रकरणाचा एकदाचा समाधानकारक शेवट झाला असा सुस्कारा टाकला. 
  अलीकडे माझ्या बऱ्याच चुका माफ केल्या जातात  हेही नसे थोडके !