चंदनी

पुन्हा पुन्हा उगाळते मी,तेच खोड चंदनाचे...
चंदनाचे हात माझे श्वास होती चंदनाचे...
एक एक चांदणी मी, जड हातानेच पुसते.
तरी पुन्हा पुन्हा नव्याने,तीच आकाशात दिसते.
काळोखाच्या गोधडीने बनवलेले एक पोते,
चंदनी चांदणे मग, ठासुनी मी त्यात भरते
तटतटून एक धागा,पुन्हा उसवतोच नेहमी,
प्रकाश चंदेरी पुन्हा मग,विखरुनी मनात भरतो.
वास येतो चंदनाचा,या अनोख्या चांदण्याला
पुन्हा पुन्हा उगाळते मी, आठवांच्या चंदनाला.