कविता

तू म्हणतेस कवितेतलं, तुला काही कळत नाही
पण म्हणून काही तुझ, कविता होणं टळत नाही

 हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेऊन जाते
मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होऊन जाते
ही बेहोशी सखे, कुठल्या मैफिलीत मिळत नाही,
अन म्हणून काही तुझं, कविता होणं टळत नाही..

मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या ,
तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या,
काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही,
पण म्हणून काही तुझं, कविता होणं टळत नाही..

 कविता म्हणजे काय गं, शहाण्यासारख वागायचं,
थोडं जगात सांगायचं , अन बरच मनात भोगायचं,
आपली कविताही कधी, आपल्यालाच कळत नाही,
पण म्हणून काही आपलं, कविता होणं टळत नाही..

- शैलेंद्र