पद्मा आजींच्या गोष्टी १ : आत्या आणि पाऊस

मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर. हि माझ्या आत्याची -- आवडाबाईची गोष्ट.

तशी
माझी आत्या काही शिकलेली नव्हती फारशी. पण वाचू शकत होती ती. आयुर्वेदाची
तर फार औषधे माहिती होती तिला. तऱ्हेतऱ्हेची औषधे ती सांगायची. वेळोवेळी
आम्हाला बरे करायची औषधे देऊन. औषधाबरोबर काहीतरी मंत्र पठण चालायचे तिचे
-- जरा कोडेच होते आम्हाला. तिच्या अनेक गोष्टी आहेत पण प्रामुख्याने मला
जिने विचार करायला लावला तीही गोष्ट.

एकदा
काय झाले की -- माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होते. आणि नेमका जोरदार पाऊस
सुरू झाला लग्नाच्या आदल्या दिवसापासून. आता प्रश्न पडला लग्न होईल की
नाही. धो-धो पाऊस. कार्यालयात हि कसे जावे असा प्रश्न. कार्यालयात सामान
तरी कसे न्यायचे आता? सगळ्यांना भीती पडली. वरात तरी येईल की नाही आशा
धारेत?

सगळे
डोके धरून बसले. तर माझी आत्या समोर आली. म्हणाली थांबा. मी ऐक उपाय
करते त्याच्यावर. तर तिने काय केले -- परत अंघोळ केली आणि देवापाशी बसली.
देवापाशी तिने काय केले तर आपला पाटा-वरवंटा असतो ना, त्या वरवंट्याला ऐक छान
असे फडके गुंडाळले. आणि एका पटावरती त्याची स्थापना केली.

आणि
मग म्हटले तिने -- काय तिचे मंत्र वगैरे होते -- आम्हाला कल्पना नाही -- पण
होते तिचे फार पठण. पण तिने मंत्र म्हणून पूजा केली त्या वरवंट्याची. हळद
कुंकू अगदी नैवेद्य दाखवून. सगळी व्यवस्थित पूजा केली. आणि सांगितले मी हे
उचले पर्यंत या ठिकाणी पाऊस पडता कामा नये.

तर
आम्हा सगळ्यांना हेच वाटले की असे कसे होऊ शकेल? आमच्या काही गोष्टी
हरवल्या तर मंत्र वगैरे म्हणायची ती पण पाऊस ला पडू नये म्हणणे काय? आम्ही
सगळे चकित होतो. आम्ही ऐकले होते फक्त आशा गोष्टी. पण हे आत्याचे काही आसे
असेल हि कल्पनाच काही डोक्यात आली नव्हती कधी.

तिने
ती पूजा-बिजा केली आणि आश्चर्य म्हणजे काय दहा मिनिटात इतके कोरडे झाले
आभाळ की कुठे पाऊस नाही की पावसाचा थेंब नाही कुठे. पण काही जास्त विचार न
करता आम्ही पळालो कार्यालयात.

झाले
सगळे सामान नेले. सगळे झाले. लग्न झाले, बहीण सासरी गेली. मग दुसऱ्या
दिवशी माझे वडील तिला म्हणाले -- जरा विनोदानेच -- आवडाबाई आता उचला ते
तुमचे नाहीतर लोक आपल्याला म्हणतील आमचा पाऊस तुम्ही बंद केला.

बरे,
आवडाबाई म्हणाली. मग तिने काय केले -- अंघोळ केली आणि आतमधून गूळ आणला.
जवळ जवळ सव्वा किलो गूळ. तिने त्या गुळाचा नैवेद्य दाखविला आणि सांगितले की
मी आता हे उचलते आहे आणि आता तुम्ही पाऊस पडू द्या.

परत आश्चर्याची बाब --  तिने ते नैवेद्य दाखवून, पूजा करून उचलले आणि इतका जोरात पाऊस सुरू झाला लगेच.

सगळ्यांना
फारच नवल वाटले. मीही काही वेळा विचार करते की कसे झाले असेल ते? तेव्हा
ना वेधशाळा होत्या ना काही मार्ग होता पावसा बद्दल माहिती काढण्यास. पण एक
गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितली -- तिने आस्थान मांडले आणि पाऊस बंद.
उठवले आणि पाऊस सुरू. आणि हे सगळे सांगून की मी पावसा चा उपाय करते
ताबडतोब.

तुम्ही योगायोग म्हणा की सिद्धी म्हणा. गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.