कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते.

तुझ्या डोळ्यात माझे जग असावे वाटले होते;
कधीकाळी तुझ्यासाठी जगावे वाटले होते.
जरी भात्यात होती राख ओली साचली माझ्या;
निखार्‍याला पुन्हा या का फुलावे वाटले होते.
तुझ्या माझ्या क्षणांच्या आठवांनी मोडले जेव्हा;
मला तू अन् तुला मी पांघरावे वाटले होते.
कशाला भावनांचे खेळ सारे मांडले वेडे;
जरा स्पर्श तुला माझे कळावे वाटले होते.
कुणाला दोष द्यावा आज येथे ना कळे आता;
तुझ्या माझ्यातले अंतर मिटावे वाटले होते.