राजे तुम्ही पुन्हा जन्माला आलात तर.... !!!

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या..!!  अशा आणि अनेक घोषणा महाराष्ट्रात घुमत असतात.. पण खरंच राजे जन्माला आले तर राजेंना काय काय पाहायला मिळेल याची कल्पना आपण करू शकत नाही..  आज महाराष्ट्रात असे अनेक जण आहेत जे स्वतःला "रायगडचा हुजऱ्या","शिवबाचा वाघ"," स्वराज्याचा मावळा" इ. इ. विशेषणे लावून घेतात.. पण त्यांचे आचरण पाहिले तर त्यांना राजे काय शिक्षा देतील हे इतिहासात डोकावून पाहिले की कळेल.. 
मी आज या विषयावर लिहिण्याचे कारण की, १९ फेबु. ला मला आलेला वाट्स अप वरचा फिरता संदेश.. 
"घरातले गणपती चौका चौकात गेले, पण चौकातले महाराज अजून घरा पर्यंत आले नाही.. चला संकल्प करूया, शिवजयंती घरोघरी साजरी करूया आपल्या घरीच महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजयंती साजरी करा, शिवबाचा गजर घरोघरी पोचवा अन सुरुवात स्वतःपासून करा..! कळू द्या साऱ्या जगाला, शिव छत्रपती म्हणतात या वाघाला... "
आता हा संदेश पाठवणारा माझा मित्र इतर वेळी काय करतो ते मला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे मी त्याला रिप्लाय केला की, "रोज शिवचरित्र वाचून शिवाजी महाराजांचे गुण अंगी बाणवा..."
खरंच शिवाजींचे हे मावळे शिवाजी महाराजांचे गुण घेऊन फिरतात का? मी कित्येक मुलं अशी पाहिले आहेत की राजमुद्रा गळ्यात घालून फिरतात आणि तोंडात गुटख्याची बुकनि भरतात. किल्ल्यावर जाऊन दारू पिऊन धिंगाणा घालतात.. शिव जयंतीच्या आदल्या रात्री जोरजोरात हॉर्न वाजवत फिरत असतात.. हा प्रकार पाहायला राजे खरंच पुन्हा जन्म घेतील का?

आता शिव जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती यात काही फरक राहिलेला नाही. त्यात बाबासाहेब तरी खूप नशीबवान आहेत की त्यांची जयंती एकदाच साजरी होते.. पण महाराजांच्या नशिबी इथे पण घरच्या भेदीन मुळे दोन बाजूला विभागणी झाली  आहे. हा प्रकार पाहायला राजे खरंच पुन्हा जन्म घेतील का?

राजेंनी पूर्णं आयुष्य खर्च करून, जिवाच रान करून जे हिंदवी स्वराज्य उभारलं, त्या स्वराज्याची अभेद्य भिंत म्हणजे सह्याद्री...!!
सह्याद्रीवर स्वकष्टाने बांधलेले गड, किल्ले... आज या गड किल्ल्याची अवस्था काय आहे..? आपण तिथे जाऊन काय काय करतो ? 
हा प्रकार पाहायला राजे खरंच पुन्हा जन्म घेतील का ?

माझा एक लहानपणीचा खूप चांगला मित्र १२ वी (शास्त्र शाखा) दोनदा दिली, ते झेपले नाही म्हणून डिप्लोमा केला (इथे उलट आहे, बहुधा बरेच जण झेपत नाही म्हणून डिप्लोमा सोडून १२ वी करतात) , डिप्लोमा पण कसाबसा सोडवत आता शेवटच्या वर्षाला आला आहे. आणि याचे एकमेव कारण म्हणजे महाराजांचा लागलेला नाद.. (हो मी इथे नाद हा शब्द जाणीव पूर्वक वापरत आहे. ) त्याला खूप वेळा समजावून सांगितले की अरे शिवाजी महाराजांना तरी आवडले असते का? की तू तुझे शिक्षण सोडून इतर गोष्टी करत असतो. रायगड वर वर्षातून ३-४ वेळा जात असतो. अनेक शिव व्याख्यानांना उपस्थिती लावतो.  संभाजी महाराजांसाठी हा बलिदान मास सुद्धा पाळतो. या गोष्टी करण्यात गैर काहीच नाही पण हा पट्ट्या अभ्यास सोडून हे सर्व करत असतो. त्याचे वडील आणि आई अक्षरशः हतबल झाले आहेत. मी त्यांच्या घरी गेलो की त्याची आई मला काकुळतीने सांगत असते की याला तू काहीतरी सांग, याचा शिवाजी चा नाद कधी सुटणार?  त्याचे वडील तर कामाला सुट्टी असेल तेव्हा याचे तोंड पाहायचे नाही म्हणून गावाला जातात.. इतके हतबल झाले आहेत ते.. बरं हा पट्ट्या एवढंच नाही करत तर व्यसनं पण करतो.. आता हे सर्व शिवाजी महाराजांना पाहवले असते का?

अशी अनेक उदाहरणे देता येतील आपल्या आजू बाजूची.. आता काळ बदलला आहे, आता तलवार आणि वाघ नखं काही उपयोगाची नाहीत..
शिक्षण हे खूप मोठे शस्त्र आता तुम्हाला जगवेल आणि प्रतिष्ठा मिळवून देईल..  आणि याच शिक्षणाच्या जोरावर आज आपल्या कडे अण्वस्त्र आहेत की ज्या मुळे आपले शत्रू आपल्या पासून दूर आहेत..
 आज महाराज खरंच असते तर त्यांनी पण उच्च शिक्षण घेतले असते, महाराजांनी पण आय फोन, आय पॅड वर सोशल मिडिया वापरले असते..

खरंच राजे पुन्हा जन्माला यावे अस वाटत असेल तर आपण नक्की काय केले पाहिजे याचा विचार करणे गरजेचे आहे... तो तरुण पिढीला करायला लावणे गरजेचे आहे... !!!!