अघटित

                                    पावसाळी रात्र. ..... रस्त्यावर दिवे नाहीत. तसा तो मोठा रस्ता होता. पालिकेला , वाहन चालवायला रस्त्यांवर  दिव्यांची गरज काय असं वाटत असावं. आधीच अमावास्या , त्यात पाऊस आणि लगतच्या खाडीवरून येणारा वेगवान थंडगार वारा. तोंडावर पाण्याचे फटकारे बसत होते. वाहनांच्या दिव्यांनी जे दिसेल तेवढेच आणि तितकाच वेळ दिसत होते आणि समोरचं जग मुळी अंधारात गुडुप होतंय असं  वाटत होतं. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याच्या हातात छत्री नव्हती की अंगावर रेनकोट नव्हता. विश्वास ....एक भक्कबांध्याचा, चाळिशीकडे  झुकलेला , पाच साडेपाच फूट उंचीचा  प्रौढ तरूण होता. कंपनीतला त्याचा आजचा  दिवस शेवटचा ठरेल असे  त्यालाही वाटलं नव्हतं..... त्याचं असं झालं की शॉपफ्लोअरच्या  मॅनेजर मेनन कडे त्याने एक लाख रुपयांचं कर्ज मागितलं होतं . आणि अर्थातच त्याने ते देता त्याला चार  शब्द सुनावले होते.  त्याची सर्व्हिस सात आठ वर्ष झाली होती. मेननच म्हणणं " इतने छोटे सर्व्हिसमे इतना बडा कर्जा मिल नही सकता. पीएफ मे से मांगा तो  क्या हुवा ? कंपनी पर कोई जबरदस्ती थोडीही है . "   खरंतर मेनन चुकत होता. एक लाख नाही तरी निदान पन्नास एक हजाराचं कर्ज मंजूर करायला काहीच हरकत  नव्हती . पण मुळातच मेननला विश्वास आवडत नव्हता.  मेननच्या वरच्या बॉसशी विश्वासचे असलेले चांगले संबंध  त्याला पाहवत नव्हते. वरचा बॉसही केरळी होता, पण विश्वास बद्दल थोडी माया  असलेला होता. नाही म्हटल्यावर विश्वासचं डोकं फिरलं. आतापर्यंतचं सगळा राग त्याच्या डोक्यात सणसणू लागला.  आणि तो मेननच्या अंगावर धावून गेला. त्याला बरोबरच्या सहकाऱ्यांनी अडवला नसता तर त्याने कदाचित मेननचा गळाच धरला असता. पण मेनननी  दहशत खाल्ली आणि घाबरून रिपोर्ट करणार असल्याचे सांगितले. त्याबरोबर रागारागात विश्वासने त्याच्या तोंडावर राजीनामा फेकला. आणि  तो तिथून निघाला. अशा रितीने त्याने स्वतःचा तो शेवटचा दिवस ठरवला. उद्यापासून कामावर जायचे नाही सं ठरवूनच तो गरम डोक्याने बाहेर पडला. डबल ड्यूटी करून डोकं फिरलं होतं. त्यात हे असं. रात्रीच्या वेळेला एकही रिक्षा यायला तयार नव्हती. म्हणजे चालतच जावं लागणार. 

                                      त्या दिवशी सकाळपासूनच त्याचं डोकं फिरलं होतं. घरमालकाने उरलेले दीड लाख रुपयांची अनामत रक्कम 
ताबडतोब मागितली होती. गेले सहा सात महिने विश्वासने तसेच काढले होते. पण मालकाने सज्जड दम दिला, की उद्या सकाळपर्यंत जर 
उरलेले पैसे दिले नाहीत तर तो सामान बाहेर काढील आणि जागेचा ताबा घेईल. असला "अल्टिमम " अजून पर्यंत विश्वासला कोणीही दिला नव्हता. निदान पन्नास हजार रुपये जरी तोंडावर फ़ेकले तरी राहता येईल. त्याने ते कसे तरी मॅनेज केलं असतं. पण मेनन हरामखोर ,
आखडला स्साला. चालताना विश्वासचं लक्ष नव्हतंच. तसा पायाखालचा रस्ता होता. पण गेले काही दिवसांपासून त्याचा मूड खराब होता . आत्ता पर्यंतच्या एकाकी जीवनाची त्याला उबग आली. कशा करता जगायचं , कोणासाठी जगायचं. असे विचार आजकाल त्याच्या मनात येत. तो  अधून मधून नशापाणी पण करीत असे. पण त्याने कधी तमाशा केला नव्हता. ...... तेवढ्यात समोरून येणाऱ्या गाडीने त्याच्या तोंडावर फोकस मारला आणि ती वळली. तो थोडा बावचळला. पण लगेचच त्याचा चेहरा अंधारात गुडुप झाला. अंगावर रस्त्यातील डबक्यातलं चिखलाचं पाणी उडल्याने त्याने गाडी चालकाला गलिच्छ शिवी हासडली. त्याला एबढ्या ओलाव्यात त्यामुळे थोडे कोरडे समाधान मिळाले. 
अजून बरच चालायचं होतं. पोटातली भूक , अस्थिर आणि अनिश्चित  पोकळ आयुष्याची त्याला घृणा वाटू लागली. . हे असं लहानपणापासूनच होतं  असं त्याला वाटू लागलं. रागाने घेरल्यामुळे त्याला आजूबाजूच्या वातावरणाची तमा वाटेनाशी झाली. त्याला गावची आठवण झाली.  अचानक आई  गेल्याचा दिवस  आठवला. वडील तर त्याला समजण्याच्या  आधीच गेले होते. चार घरची कामं करून आईने त्याला वाढवला होता. होती  नव्हती ती आईही गेल्यानंतर   शेजारच्या सॅली आंटीने त्याचा सांभाळ  केला होता. देव , धर्म , जात पात माहीत नसल्याने तो अजूनही अविवाहित होता. त्याला जी काही स्थळं आली (म्हणजे त्याच्या लग्नाबाबत नुसतीच विचारणा झाली ) ती त्याचा आगापिछा माहीत नसल्याने पुन्हा त्याच्या वाटेला गेली नाहीत. सॅली आंटीला पाहिल्यावर लग्न हा विषयच बारगळत असे. तरीही वयाच्या तिशीपर्यंत त्याला लग्नाबद्दल काहीतरी वाटायचे तरी . आंटीच्या बाजूला राहणारी फिलोमिना तंग कपडे घालून फिरे तेव्हा ती त्याला फारच आकर्षक वाटे. तिलाही तो आवडायचा, पण  काहीच झालं नाही. एकदा तरी तिला भरगच्च मिठी मारावी असं त्याला वाटे. पण  सगळे नुसते मनातले मांडे.                                                           एक दिवस   मुंबईहून पीटर नावाचा केरळी ख्रिश्चन आला. तो तिला घेऊन फिरायचा.  संध्याकाळी नदीजवळच्या भागात तो फिरायला गेलेला असताना, त्याला एका झाडाखाली फिलोमिना पीटरच्या मिठीत असलेली दिसली तो तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करीत होता आणि तिची छाती कुरवाळीत होता.   ती पण सारखी त्याला 'आय लव्ह यू " म्हणत पुन्हा पुन्हा बिलगत होती. त्यांची सलगी पाहून त्याचं डोकं फिरू लागलं. आपण हे का नाही केलं.......?? ? असं म्हणून त्याचं मन त्याला करतडू लागलं. मग त्याने सॅली आंटीला हे सांगण्याचं ठरवलं. पण रात्रीत फिलोमिना आणि पीटर मुंबईला पळून गेले असं त्याला दुसऱ्या दिवशी समजल्यावर तो फक्त फिलोमिनाच्या बापाचा दारू पिऊन गावभर केलेला धिंगाणा मात्र पाहत राहिला. स्त्रीशी आलेला त्याचा संबंध एवढाच होता. पुढच्या आयुष्यात सुंदर , आकर्षक मुलीही दिसायच्या , पण आपल्याला स्टेटस नाही आणि जाती धर्माच पत्ता नसल्याने आपलं लग्न कसं होणार असं समजून त्याने तो नाद सोडून दिला. ..........
                                                    अचानक त्याला चालता चालता मागून कोणातरी स्त्रीच्या चपलांचा चटक फटक असा आवाज आला. पण 
मागे वळून काहीच दिसणार नाही म्हणून त्याने लक्ष दिले नाही . हळू हळू रस्त्याचा चढावाचा भाग लागला. आता निदान  पायाखालचं पाणी तरी कमी झालं , म्हणून त्याला जरा बरं वाटलं. चपलांचा आवाज आता जास्त जवळून येऊ लागला. ........अधून मधून एखाद दुसरी गाडी येतच होती. तिच्या प्रकाशात  त्याने परत एकदा मागे  पाहण्याचा प्रयत्न केला. तरीही काही दिसले नाही. ...... मागून येणारी व्यक्ती म्हणजे एक सत्तरीला पोहोचलेली वृद्ध स्त्री होती. हातातलं ओझं सांभाळून तिला आता कंटाळा आला होता. कधी एकदा खाडी वर जाऊन  ते फेकते आणि सुनीताकडे जाते असे तिला झाले होते.  पण पाऊस आणि काळोख यांनी ती हैराण झाली होती. सुनिता तिची मुलगी. पूल ओलांडला की उजव्या बाजूच्या पायवाटेने गेल्यावर खाडीच्या शेवटी असलेल्या गावात राहत होती. जनार्दन तिचा मुलगा . त्याने नसती ब्याद कशाला आपल्या मागे लावली असं तिला वाटून , आपण उगाचच त्याला साथ दिली असं वाटल्याने ती फारच उद्विग्न झाली होती. त्यात आणखी हे ओझं त्याने तिच्यामागे लावले होते. तशी म्हातारीलाही एवढ्या वैराण रस्त्यावरून चालायला भीती वाटतच होती. पैशाची सोयही तितकीशी झाली नव्हती.   जनार्दनने असला  धोका का पत्करला होता , हेच तिला कळेना. त्याला पैसेही फार मिळाले नव्हते. हातातली पिशवी आता जड लागू लागली. त्या पिशवीतलं पैशाचं बंडल तेवढं काढून  घेऊन ती खाडीत फेकायची होती. खरंतर हे काम तिच्याच्यानं होणार नसल्याचं तिने जनूला सांगितलं होतं. पण तो ऐकायला तयार नव्हता.  भीतीपोटी आपल्या पुढून जाणाऱ्या माणसाची निदान थोडीतरी सोबत होईल  म्हणून ती त्याला गाठण्याच्या  प्रयत्नात होती. आता ती काही पावलंच दूर होती.  त्याला हाक मारावी की काय याची चलबिचल तिच्या मनात चालू होती. अनोळखी माणूस ..... काही केलन तर ? मग तिच्या लक्षात आलं .    आपण काही तरूण नाही. पण पुरषाच्या जातीचा भरवसा काय ? सोबतीसाठी ती त्याला हाक मारणार तेवढ्यात समोरून येणाऱ्या गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात विश्वासने मान वळवली.   अचानक पडलेल्या प्रकाश झोतामुळे म्हातारीने आपले डोळे बंद केले. विश्वासला स्त्री असल्याचे कळले. पण तिचा चेहरा दिसला नाही. तेवढा वेळ मुळी प्रकाशच पडला नाही. मग तोच थांबला. काळोखातच त्याने विचारले, " कुठे निघालात , रात्रीच्या ? " त्याच्या अनपेक्षित प्रश्नाने ती बावचळली पण स्वतःला सावरून म्हणाली, " पोरीकडं निघाले बाबा. तेवढे पैशे पोचवायचे ना , न्हाई तर उद्या जावयाला आणि तिला घरमालक भायेर  काढील की. "       तिला विश्वासचा चेहरा अजून दिसला नव्हता. कारण मागून येणाऱ्या गाड्याच नव्हत्या. एवढा मोठा रस्ता पण वन वे होता. तो काहीच बोलला नाही. मग त्याच्या मनाने विचार केला. 
                                           आपल्यासारखीच हिलाही अडचण आहे. " बिच्चारी ! " तो स्वतःशीच पुटपुटला. आणि चालू लागला. आता ते दोघेही सोबतीने चालत होते. तरीही एकामागे एक. पावसाने परत एकदा फेर धरला. म्हातारीच्या डोक्यावर निदान पदर तरी होता. विश्वासला 
परत उद्याच्या अस्थिरतेची जाणीव मन करून देऊ लागलं.  निदान मेननने पन्नास साठ हजार तरी द्यायला काहीच हरकत नव्हती. पण तो भडवा आहे असा त्याच्या रागीट मनाने केला. साल्याची बायकापोरं अशीच रस्त्यावर येतील. आपलं चुकलंच आपण त्याला निदान दोन तीन तरी कानफटात भडकवायला पाहिजे होत्या. हा साला नाईक आणि शेख मध्ये पडला. यांना काय लागतंय " सबुरीनं घे विश्वास " असं शेख म्हणाला होता. त्याच्यावरही तो डाफरू लागला. मध्येच मनाने एक मार्ग बुडबुड्यासारखा वर पाठवला. म्हातारी जवळ पैशे असणार. विश्वासने 
मनाला ताडकन उत्तर दिले, "असले तर काय झालं. आपल्याला काय करायचंय ? " मन जणू विकट हास्य करीत म्हणालं. "विचार कर, 
म्हातारी जवळ पैशे आहेत. ....... " तो स्वतःवरच करवादला. उत्तरादाखल  थोडा मोठ्यानेच म्हणाला, " मग मी काय करू ? ? " मागून चालणाऱ्या म्हातारीला  नीट  ऐकू न आल्याने ती म्हणाली, " काही बोललास काय रं बाबा ... "? ..            मग त्याच्या लक्षात आलं आपण 
उगाचच मोठयाने बोललो. त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. असाच काही वेळ गेल्यावर म्हातारी काही तरी विचारायचं म्हणून म्हणाली, "
तू कुटं  ऱ्हातोस बाबा ? "       त्याने अनिच्छेनेच उत्तर दिले, " अजून एखाद किलोमीटर तरी लांब आहे. तिला वाटलं आपल्या बाजूलाच राहत असलं तर होईल शेवट पर्यंत सोबत. मनाने परत टोचायला सुरुवात केली. म्हातारी कडे पैशे आहेत. तिची पिशवी हिसकावून घे आणि पळ . आता मनाने घाईघाईने  पूर्ण प्लानच  पुढे रेटला. नुसत्या प्लाननेच तो हिंदकळला. छे, छे ,  हे असलं आपण कधी केलं नाही. तिने बोंबाबोंब केली तर ?  लगेच उत्तर आलं. आहे कोण इथे , ऐकायला. नाहीतर सरळ मारूनच टाक आणि दे खाडीत फेकून. तिची  पण जागेची अडचण आहे, पैशे असणारच , त्याने विचार केला. पिशवीत पैशे आहेत म्हटल्यावर तो डगमगू लागला. आपल्या आईच्या वयाची बाई . किंबहूना आईच 
ती. पण मन त्याला सोडायला  तयार नव्हतं. हळू हळू विचार मूळ धरू लागला. विचार जाण्याचं नाव घेईना मग त्याने धीर करून म्हातारीला 
आपली  अडचण सांगितली. जरा वेळ म्हातारी काहीच बोलली नाही. ती बोलत नाही असं पाहून त्याने तिला विचारलं. " आजी मला अर्धे पैसे देतेस का ? म्हणजे बघ , माझी पण जागा जात नाही आणि तुझ्या मुलीची पण, विचार कर. तुझा मुलगाच माझ्या जागी असता तर ? "  उजव्या 
हाताचं वळण आलं. आता म्हातारी जाणार हे नक्की होतं. त्याच्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं नव्हतं. त्याने पाच दहा मिनिटं वाट पाहिली. पण उत्तरच आलं नाही. उजवं वळण मागे पडलं. अंधार गुडुप्प होता. त्यामुळे दिसत काहीच नव्हतं. अचानक मागे कोणीच न दिसल्याने त्याने तिला 
हाक मारली. " म्हातारे , ए म्हातारे , (न दिसताच तो म्हणाला) अगं कुठे चाललीस. नको देऊ पैसे पण सांगून तरी जायला नको का ? "   .......
पण तिच्याकडून काहीच उत्तर आलं नाही खाडीवरचा वारा मात्र उत्तरादाखल पावसासहित अंगावर ओरडला. त्याने तोंडावरचं पाणी पुसलं. 
तेवढ्यात समोरच्या बाजूने एक गाडी आली. तिच्या दिव्याच्या प्रकाशात त्याला रस्त्यात काहीतरी दगडासारखं पडलेलं दिसलं. ती म्हातारीची 
पिशवी होती. त्याने पिशवी उचलली. ती चांगलीच जड होती. अशी कशी म्हातारी पिशवी टाकून पळाली . तो आश्चर्य चकीत झाला. मग मनाने त्याला समजावले, अरे तुझं काम झालंय. म्हातारीशी तुला काय करायचंय. घेऊन चल ती पिशवी. त्यातले पैसे उद्या मालकाला दे आणि निश्चिंत हो.......... त्याला नशिबाचं आश्चर्य वाटलं. ती जड पिशवी घेऊन तो उत्साहात रस्ता कापू लागला. त्याला अचानक हलकं वाटू लागलं. .... इतकं हलकं त्याला कित्येक दिवसात वाटलं नव्हतं. आत किती पैसे असतील ?  कोण जाणे . घरी  गेल्यावरच पाहावं. उगाचच नोटा पावसात भिजायच्या. पिशवी भिजलेली होतीच. 
                                                        चला एक प्रश्न सुटला किंवा थोडा तरी लांबला. परमेश्वरी मनात काय असेल काही सांगता येत नाही. 
आतमध्ये  दीडेक लाख रुपये सुद्धा असू शकतात. त्याला अचानक आईची आठवण झाली. आई नेहमी म्हणायची, "विश्वास बाळा  थोडक्यात
समाधान मानायला शीक. थोडक्यात गोडी फारात लबाडी . "    कोणाला तरी आपली काळजी आहे हे नक्की. देवावर त्याचा फारसा विश्वास नव्हता. पण असं काही घडलं तर माणूस असल्या अघटितामुळे विश्वास ठेवायला बळी पडणारच  . नक्की देव आहे का , असलं द्वंद्व त्याच्या मनात चालू झालं. पण ते त्याने थांबवलं. काही मिनिटांनंतर त्याच्या मनात आलं. तरी आपल्याला वाटलंच होतं . पिशवीत पैसे आहेत. लवकरच चढ संपला आणि उतरण लागली. पावसालाही  जरा विश्रांती घ्यावीशी वाटत असावी. वारा मात्र आपलं काम चोख करीत होता. कमी होणारा पाऊस आणि अचानक सुटलेला प्रश्न याने विश्वास पुढच्या विचारांमध्ये गुंतला.  मालकाला आता चार शिव्या द्यायला हरकत नाही. समोरून येणारी गाडी अगदी त्याच्या अंगावरच आली. त्यालाही आश्चर्य वाटले. मोठमोठे  दिवे आणि त्यांचा झोंबणारा उजेड याने त्याला सुचेनासे झाले . गाडी अंगावर येता त्याच्यासमोर अचानकपणे गचकन  थांबली.तो शिवी देणार होताच. .... ती पोलिसांची गाडी होती. आतून दोन इन्स्पेक्टर्स , दोन कॉन्स्टेबल उतरले. गस्त घालणाऱ्या पोलिसांची ती गाडी होती. दिवे तसेच  ठेवून त्यातल्या  एका इन्स्पेक्टर पुढे होऊन दरडावला, " काय रे एवढ्या  रात्री कुठून आलास , आणि चाललास तरी कुठे ? काय  आहे काय त्या पिशवीत. "     ...... त्याला काय बोलायचे सुचेना. पण थोडे घाबरून तो म्हणाला, " पैशे, घरमालकाला द्यायचेत, नाहीतर तो उद्या घर ताब्यात घेईल. " त्याने कसे तरी पटकन बोलून 
टाकले. त्यातल्या एका कॉन्स्टेबलला " घ्या ती पिशवी ताब्यात घ्या आणि पाहा आत काय आहे ते . ह्यालाही ताब्यात घ्या. " असे म्हटल्याबरोबर एका कॉन्स्टेबलने त्याचे बकोट धरले आणि दुसऱ्याने त्याची पिशवी हिसकावून घेतली. गाडीच्या उजेडात एकाने त्याच्या पिशवीत हात घातला. आतून एक सुरा बाहेर आला आणि हजाराचे एक बंडल. त्याने ते गाडीच्या बॉनेटवर ठेवले.  त्या तिघांचे आणि विश्वासचेही डोळे विस्फारले गेले. पण त्या पिशवीत आणखीनही काही होते. कॉन्स्टेबलने आत हात घालून काही पळसाची पाने बाहेर काढली. ती रक्ताळलेली होती. मग हात आणखी आत घातला. त्याच्या हाताला मानवी केस लागले. ते त्याने खसकन  ओढल्यावर एका मृत स्त्रीचे शीर बाहेर आले. त्या काळोख्या रात्रीत हातातल्या स्त्री शिराला पाहून सगळेच थरारले. घाबरून जाऊन कॉन्स्टेबलने ते परत आत ठेवले. ते पाहून विश्वासची तर बोबडीच वळली. त्याच्या मनात आलं. प्रश्न सुटला कसला भलताच प्रश्न उभा राहिला . आता काय स्पष्टीकरण देणार आहोत आपण .....???   बाप रे .
आता त्याचं मन कुठे अदृश्य झालं कोण जाणे.   म्हातारी अशी निघेल असे वाटले नव्हते. ही पण देवाचीच करणी ना ? विश्वासच्या जिभेला 
एवढ्या  ओलसर वातावरणातही चांगलीच कोरड पडली. 
                                                            मग काय विश्वासला बेड्या ठोकून पोलिस पार्टी  गाडीत बसली. कॉन्स्टेबल्सच्या मनात आलं या पैशांचं आता हे साहेब लोक काय करणार ? इन्स्पेक्टर मात्र विचार करू लागले, हे नक्की काय आहे आणि उरलेली बॉडी कुठे आहे ? लवकरच इतर लोकांना मृत देह शोधण्यास पाठवून , जवळच असलेल्या पो. स्टेशनला पोहोचल्यावर विश्वासाला कोठडीत ढकललं गेलं. पुढे काय ?   ........ मोठेच प्रश्नचिन्ह विश्वासच्या मनात निर्माण झालं.  सकाळ पासून कावलेला त्याचा जीव तडफडू लागला. त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला हवालदाराने पाणी दिले.  त्याने जिवाच्या आकांताने इन्स्पेक्टर साहेबांना हाक मारली. " अहो साहेब , माझं जरा ऐकाल का ? "     इन्स्पेक्टर साहेब खुर्ची सोडून कोठडीशी आले आणि म्हणाले, " आता तुझंच ऐकायचंय. फक्त शेंबडं  पोरही विश्वास ठेवणार नाही असली स्टोरी सांगू नकोस. " कोठडीत शिरून  इन्स्पेक्टर खुर्चीवर बसत म्हणाले, " बोल , भाऊ काय बोलायचंय. मुद्देमालासहित पुराव्यासहित पकडला गेलायस हे लक्षात ठेव. "   मग विश्वासने सगळी कहाणी सांगितली. पण विश्वास ठेवणार कोण ? दुसऱ्या दिवशी सकाळी  त्याच्याच वयाचा एक माणूस पोलिसांनी पकडून आणला . पोलिसांनी आपलं काम फारच जलद केलं होतं.  तो होता "जनार्दन.   " म्हातारीचा मुलगा." त्याने स्वत; च्या बायकोचा म्हणजे उर्मिलाचा खून केला होता.  आता सगळी स्टोरी अगदी स्पष्ट झाली. म्हातारीलाही ताब्यात घेतली. ........ विश्वास  फारसा गुंतलेला नसल्याने यथावकाश जामिनावर सुटला. त्याला घर नव्हतंच. त्याला फक्त त्याचा सहकारी नाईक याचं घर माहीत होतं. त्याच्या मदतीने त्याने लहान पण एक खोली पाहिली.  छोटीशी नोकरीही पाहिली.  आजही  सुटकेसाठी त्याच्या कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. ........
                                                        
                                                                                                                            (संपूर्ण)