पाहण्याची दृष्टी

                                              आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता. राजा कलाप्रेमी आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध होता. 

सर्व प्रकारचे कलाकार आणि तत्त्वज्ञ त्याच्या पदरी होते. तो त्यांची अतिशय काळजी घेई.  तसेच तो स्वतः पण उत्तम चित्रकार होता. त्याच्याकडे  दूरदुरून कलाकार येत, त्यांचा आणि त्यांच्या कलेचा राजा यथोचित सत्कार करून तो त्यांना संतुष्ट करी. अशा  रितीने ते राज्य प्रगतीशील 
म्हणून प्रसिद्ध होते. प्रजाही फार सुखी होती. सर्व प्रकारच्या तत्त्वज्ञ्यांच्या सल्ल्याने राजा वागत असल्याने त्या राज्याला परचक्राचा धोकाही नव्हता.   एक दिवस एक शिल्पी फार दुरून आला. त्याने सोबत त्याची अप्रतिम शिल्पे आणली होती. ती राजांना त्याने नजराणा म्हणून पेश केली. त्या शिल्पांतील जिवंतपणा पाहून राजेसाहेब मोहून गेले. त्यांनी त्या शिल्पकाराचा  यथोचित सत्कार केला. त्याला काही धनही देऊ केले. पण त्या  स्वाभिमानी शिल्पकाराने नम्रपणे घेण्याचे नाकारले. मात्र  त्याने एक विनंती केली की त्याला त्याची कला दाखवण्याची संधी द्यावी. त्यावर महाराज त्याला आपल्या चित्रशाळेमध्ये घेऊन जाऊन म्हणाले, " हे बघ, वर असलेले उंच छत मला नक्षिकामाने सजवून पाहिजे, ते तू करावेस असे मला वाटते. " शिल्पकाराने ते आनंदाने मान्य केले. 
                                          मग रोज तो शिल्पकार छताला पाळणा लावून घेऊन छताचे नक्षिकाम करू लागला. त्याने वेगवेगळ्या लहान लहान मूर्तींच्या मिलापाने सर्व छत भरून काढले. जवळ जवळ पाच सहा महिने लागले. काम काही पुरे होईना. रोज दरबारी आणि प्रजाजन येऊन पाहून जात. पण ते आपसात म्हणत , "एवढ्या उंचीवरचे इतके बारीक काम कोण पाहणार आणि कोण त्याचे कौतुक करणार ? " पण एकालाही त्या शिल्पकाराला असा प्रश्न विचारण्याचे धाडस झाले नाही. हळू हळू ती चर्चा राजेसाहेबांच्या  कानावर गेली व काही दरबारींनी त्या शिल्पकाराला  उगाचच महत्त्व दिले जात असल्याचेही सुचवले. राजे साहेबांनी मग वेष पालटून चित्रशाळेत जायचे ठरवले. ते आले तेव्हाही तो शिल्पकार छताला टांगून घेऊन रंग रंगोटी करताना दिसला. त्याने राजेसाहेबांना ओळखले नाही. इतर लोकांच्या उपस्थितीत राजेसाहेब मात्र मोठ्याने म्हणाले, " अरे इतक्या उंचीवरची ही नक्षी चांगली असली तरी ती बारकाईने पाह्णार  कोण आणि तिचे कौतुक करणार तरी कोण ? "   असे  म्हटल्यावर तो रागारागाने खाली आला आणि म्हणाला, "भल्या गृहस्था, कोणी नाही पाहिले तर मी पाहीन आणि कोणी नाही कौतुक केले तर मी करीन माझ्या कामाचे कौतुक. " इतके बोलून तो पुन्हा कामाला लागला. राजेसाहेनिघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी खास दरबार भरवला.  सगळे दरबारी आणि काही प्रतिष्ठीत प्रजाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी शिल्पकाराला बोलावले. सगळ्यांनाच वाटले आता राजेसाहेब शिल्पकाराची खरडपट्टी काढतील आणि कालाचा अपव्यय केल्याबद्दल त्याला हाकलूनही देतील. पण राजे साहेब , शिल्पकाराचा सत्कार करून म्हणाले, " आपल्या  कामाची किंमत आपणच ठेवली पाहिजे आणि त्याचे कौतुकही आपण केले पाहिजे , जरी कोणी केले नाही तरी. आपल्या कामाकडे पाह्ण्याची आपली दृष्टी अशीच असावी , म्हणजे कामात सातत्य राहते आणि यशप्राप्तीही होते. 
हा राज्यातल्य प्रजेला आणि दरबारी जनांना धडाच आहे हे लक्षात घ्यावे. " असे म्हणून त्यांनी शिल्पकाराची जबाबदारी कायमची घेतली असल्याचे जाहीर केले आणि त्याला कोठेही जाण्याची मुभाही दिली.