ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
अनिलअनिल म्हणजे वारा. विष्णू असाही त्याचा एक अर्थ आहे. मराठीत अनिल हे विशेषनाम म्हणून प्रसिद्ध आहे. उच्चारणात चूक होऊन हा शब्द 'अनील' असा चुकीचा लिहीला जाण्याचीही शक्यता असते. अनिल आणि सुनील ही नावे अनेक जण जोडीसारखी वापरतात; पण 'सुनीलमध्ये' नवर दुसरी वेलांटी आहे. 'सुनील'चा संबध नीलवर्णाशी आहे. 'नील'मध्ये पहिले अक्षर दीर्घच असते.
अनिष्टअनिष्ट या विशेषणाच्या अर्थांमध्ये अप्रिय, अहितकारक, अयोग्य आदींचा समावेश आहे. अनिष्ट हा शब्द चुकून अनिष्ठ असा लिहिला जाण्याची शक्यता असते. या शब्दात ठ नसून ट आहे, हे लक्षात ठेवावे. इष्ट च्या विरुद्ध अनिष्ट असेही लक्षात ठेवावे. (इच्छिलेले,योग्य,हितकारक हे इष्ट चे अर्थ आहेत.) अनिष्ट हे नामदेखील आहे. त्याचा अर्थ संकट, नुकसान असा होतो.
अपरअपर हा संस्कृतमधून आलेला शब्द आहे. अधिक, दुसरा, नंतरचा इत्यादी अर्थांनी तो वापरला जातो.पश्चिमेकडीलअसाही त्याचा एक अर्थ आहे. त्यावरूनच अपरांत (कोकण) हा शब्द बनला आहे. सरकारी अधिकार्यांच्या काही पदांमध्ये अतिरिक्त या अर्थी अपर हा शब्द वापरला जातो. ( उदाहरणार्थ अपर जिल्हाधिकारी). 'अप्पर' या इंग्रजी शब्दाचा अपरशी काहीही सबंध नाही, हे ध्यानात घ्यावे.
अपरिमितअपरिमित म्हणजे अमर्यादित; अतोनात. परिमित म्हणजे मर्यादित. त्यामागे अ हा नकारार्थी उपसर्ग लागून अपरिमित हा शब्द तयार झाला आहे. त्यातील र व म या दोन्ही अक्षरांवर पहिली वेलांटी आहे. हा शब्द अपरिमीत असा लिहिण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी. मित या शब्दाचाही अर्थ मर्यादित असा होतो. परिमिती (मूळ संस्कृत शब्द परिमिति) म्हणजे मर्यादा.
अपूर्वाईनवलाई, अपूर्वता,असाधारणपणा या अर्थांनी अपूर्वाई हा शब्द वापरला जातो. अपूर्व या शब्दापासून तो बनला आहे. पूर्वी न घडलेले हा अपूर्वचा अर्थ आहे. विलक्षण, असाधारण, अद्भुत हेही त्याचे अन्य अर्थ आहेत. अपूर्वाई या शब्दात पला दुसरा उकार आहे. तो पहिला देण्याची चूक (अपुर्वाई) अनेकांकडू न होते; ती टाळावी. त्यासाठी अपूर्व हा शब्द लक्षात ठेवावा.
अमानुषअमानुषचा अर्थ मनुष्याच्या शक्तीबाहेरचे , मनुष्याला न शोभणारे, मानवी गुण नसलेले, अद्भुत असा आहे. यातील नला पहिला उकार व शेवटचे अक्षर शहामृगातला श नसून षट्कोनातला ष आहे हे लक्षात ठेवावे . अमानूश असे लिहिणे चूक. हा शब्द संस्कृत (तत्सम) आहे.
अरिष्टअरिष्ट या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. आपत्ती या अर्थी तो मराठीत वापरला जातो. 'अरिष्ट' कोसळणे असा शब्दप्रयोग केला जातो, विशिष्ट प्रक्रियेनंतर जे औषध तयार केले जाते, त्यालाही अरिष्ट असे म्हणतात. या शब्दात 'अ' ऐवजी 'आ' लिहिला जाण्याची चूक संभवते, तसेच 'र'ला चुकून दुसरी वेलांटी दिली जाण्याचीही शक्यता असते. या दोन्ही चुका होणार नाहीत, असे पाहावे.
अर्धोन्मीलितहा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ अर्धे उघडलेले, अर्धे उमललेले. हा शब्द लिहिताना जोडाक्षराकडे व र्‍हस्व-दीर्घाकडे विशेष लक्ष द्यावे. ('अर्धोन्मिलित', 'अर्धोन्मीलीत' असे लिहू नये.)
अलीकडे व पलीकडेअलीकडे व पलीकडे हे परस्परविरोधी अर्थाचे शब्द आहेत. आपल्या बोलण्या-लिहिण्यात ते नेहमी येतात. अलीकडे म्हणजे या बाजूला, पुढील बाजूला. काळासंदर्भात अलीकडेचा अर्थ हल्ली. पलीकडे म्हणजे दुसऱ्या बाजूला, मागील बाजूला. अलीकडे व पलीकडे हे शब्द अलिकडे व पलिकडे असे लिहिण्याची चूक अनेकांकडून होते. दोन्ही शब्दांत ल वर दुसरी वेलांटी द्यायची, हे लक्षात ठेवावे.
अल्पसंख्याकज्यांची संख्या अल्प आहे, म्हणजेच तुलनेने कमी आहे, ते अल्पसंख्याक. हा शब्द अनेकांकडून चुकून अल्पसंख्यांक असा लिहिला जातो. अल्पसंख्याक या शब्दाची फोड अल्प +संख्या +क अशी आहे. या शब्दात फक्त सवर अनुस्वार आहे, हे लक्षात घ्यावे. (अल्प +संख्या + अंक अशी फोड नाही). बहुसंख्याक हा शब्द अल्पसंख्याकच्या विरुद्ध अर्थी आहे. ज्यांची संख्या तुलनेने अधिक , ते बहुसंख्याक.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide