ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
असुरअसुर म्हणजे दैत्य, राक्षस, सुर म्हणजे देव. सुर आणि असुर या दोन्ही शब्दांत सला पहिला उकार आहे. उच्चारताना 'असूर' अशी चूक होऊ शकते व त्यामुळे लिहितानाही ती होते; ती टाळावी. आसुरी म्हणजे राक्षसी. (उदाहरणार्थ आसुरी आनंद, आसुरी उपाय इत्यादी). त्याही शब्दात सला पहिला उकार आहे. सूर (सू दीर्घ) हा शब्द संगीतातील स्वर या अर्थी रूढ आहे.
अस्थिपंजरअस्थि म्हणजे हाड. पंजर म्हणजे पिंजरा, सापळा. अस्थिपंजर या शब्दांची फोड अस्थि+ पंजर अशी होते. हा मूळ शब्द संस्कृत आहे. म्हणून सामासिक शब्दात तो ऱ्हस्वान्तच लिहावा. अस्थीपंजर असे लिहू नये. अस्थिपंजरचा अर्थ हाडांचा सापळा.
अहल्याअहल्या हे नाव पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. गौतम ऋषींच्या पत्नीचे नाव अहल्या होते. अ + हल्या अशी याची फोड आहे. हल्य या शब्दाचा अर्थ निंद्य. जी निंद्य नाही, ती अहल्या. या शब्दाऐवजी अहिल्या असा शब्द वापरल्याचेही तुम्हाला आढळेल. तो अपभ्रंश आहे. अहल्या हा शब्द वापरणे योग्य कसे, हे त्याच्या अर्थावरून स्पष्ट होते.
आकस्मिकअचानक, अकल्पित, एकाएकी, अनपेक्षित हे आकस्मिक या शब्दाचे अर्थ आहेत. अकस्मात हादेखील शब्द त्याच अर्थांनी वापरला जातो. त्यात पहिले अक्षर अ आहे; मात्र आकस्मिकमध्ये पहिले अक्षर 'आ' आहे, हे ध्यानात ठेवावे. आकस्मिकमध्ये स्मवर पहिली वेलांटी आहे. (आकस्मीक असे लिहिणे चूक.) आकस्मिक ऐवजी आकस्मित असे लिहिण्याची चूक होऊ शकते, तीही टाळावी.
आख्यायिकाआख्यायिका म्हणजे दंतकथा; परंपरेने चालत आलेली गोष्ट. साधारणत: ऐतिहासिक आधार नसलेल्या गोष्टीला आख्यायिका म्हटले जाते. या शब्दात पहिले अक्षर अ नसून आ आहे, हे ध्यानात ठेवावे. (अख्यायिका असे लिहिणे चूक.) यातील तिसर्‍या अक्षराच्या बाबतीत चूक होऊन यिऐवजी इ हे अक्षर वापरले जाऊ शकते. (आख्याइका असे लिहिणे चूक आहे, हेही लक्षात ठेवावे.)
आगंतुकअचानक आलेल्या, विशेषत: भोजनाच्या वेळी न बोलावता आलेल्या पाहुण्याच्या बाबतीत आगंतुक हा शब्द वापरला जातो. बाहेरचा, वाट चुकलेला, आकस्मिक असेही य शब्दाचे अर्थ आहेत. या शब्दातील पहिली तिन्ही अक्षरे नीट लक्षात ठेवावीत; म्हणजे हा शब्द अगांतुक, आगांतूक, आगंतूक असा लिहिण्याची चूक होणार नाही. आगंतुक खर्च म्हणजे अनपेक्षित खर्च. आगंतुक लाभ म्हणजे अचानक झालेला लाभ.
आगाऊआगाऊ हे विशेषण व क्रियाविशेषण म्हणून वापरले जाते. विशेषण म्हणून ते वापरले, तर आधीचा असा त्याचा एक अर्थ होतो आणि प्रौढी मिरविणारा वा दुढ्ढाचार्य असाही अर्थ होतो. क्रियाविशेषण म्हणून ते वापरले, तर आधी, प्रथम हे अर्थ होतात. आगाऊ हा शब्द अगाऊ असाही लिहिला जातो. अगावू वा आगावू असा तो लिहिणे मात्र चुकीचे आहे.
आग्नेयआग्नेय हे एका दिशेचे नाव. पूर्व व दक्षिण या दिशांच्या मधील दिशा आग्नेय. या शब्दाचे पहिले अक्षर चुकून अ असे उच्चारले जाते व लिहितानाही ती चूक (अग्नेय) होऊ शकते. ती टाळण्याची काळजी घ्यावी. आग्नेय या संस्कृत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अग्निपूजक, अग्निवंशज, ज्वालाग्राही आदींचा त्यात समावेश आहे. आग्नेयी या संस्कृत शब्दाचा अर्थ आग्नेय दिशा व प्रतिपदा असाही होतो.
आजीवआजीव या शब्दाची फोड 'आ + जीव' अशी आहे. 'आ' या उपसर्गाचा 'पर्यंत' हा एक अर्थ आहे. आजीव म्हणजे जिवंत असेपर्यंत; म्हणजेच आयुष्यभर. आजीव सदस्य म्हणजे तहहयात सदस्य. आजीव या शब्दात पहिले अक्षर 'आ आहे; 'अ' नव्हे. हा शब्द चुकून 'अजीव' असा लिहिला गेला, तर त्याचा अर्थ 'निर्जीव' असा होईल. आजीव या शब्दात 'ज'वर दुसरी वेलांटी आहे, हेही लक्षात ठेवावे.
आतुरआतुर या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. उत्सुक, उतावीळ , उद्युक्त, व्यथित आदींचा त्यांत समावेश आहे. या शब्दात तला पहिला उकार आहे. (आतूर असे लिहिणे चूक.) आतुरता म्हणजे उत्सुकता . आतुरतामध्येही तु र्‍हस्व आहे. चिंतातुर (चिंता + आतुर) म्हणजे चिंताग्रस्त; चिंतेने व्यथित झालेला. अर्थातुर (अर्थ + आतुर) म्हणजे पैशासाठी उत्सुक असलेला. याही शब्दांत तच्या उकारात बदल होत नाही.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide