ऑक्टोबर २८ २००४

नेहमी चुकणारे शब्द

शब्दटीपा
आस्थाआपलेपणा, जिव्हाळा, कळकळ या अर्थांनी आस्था हा शब्द वापरला जातो. आसक्ती, प्रेम, काळजी, आशा हेदेखील त्याचे अर्थ आहेत. हा शब्द अस्था असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी या शब्दाचे पहिले अक्षर लक्षात ठेवावे. आस्थेवाईक म्हणजे आस्था बाळगणारा, कळकळ असणारा, उत्कंठित, उत्सुक, अनास्था हा शब्द आस्था या शब्दाच्या उलट अर्थाचा आहे
इत्थंभूतया शब्दाचा अर्थ आहे तपशीलवार, सविस्तर, घडल्याप्रमाणे. हा संस्कृत शब्द आहे. या शब्दात 'त' ला 'थ' जोडून त्यावर अनुस्वार द्यावा. 'इत्यंभूत' , 'इत्थंभुत' असे लिहिणे चुकीचे आहे.
इत्थंभूतइत्थंभूत हा शब्द तपशीलवार , सविस्तर अशा अर्थी वापरला जातो. इत्थं + भूत अशी या शब्दाची फोड आहे. इत्थं हे संस्कृतमधील एक अव्यय आहे. अशा प्रकारे हा त्याचा अर्थ. भूत शब्दाच्या अर्थांमध्ये एक अर्थ झालेले असा आहे. इत्थंभूतचा शब्दश: अर्थ अशा प्रकारे झालेले. हा शब्द 'इत्यंभूत' वा 'इथ्यंभूत' असा लिहिला जाण्याची चूक होऊ शकते; ती टाळावी.
ईश्वरईश्वर हा शब्द सर्वांना परिचित आहे. 'देव' हा तर त्याच अर्थ आहेच; पण त्याचे समर्थ, श्रेष्ठ, राजा, श्रीमंत, पती इत्यादी अर्थही आहेत. 'ईश्वर' या शब्दात ई दीर्घ आहे. ( 'इश्वर' असे लिहिणे चूक.) ईश् आणि ईश यादेखील शब्दांचा अर्थ देव असा आहे. 'ईश् + वर' अशी 'ईश्वर' शब्दाची फोड आहे. येथे 'वर' या संस्कृत शब्दाचा 'श्रेष्ठ' हा अर्थ अभिप्रेत आहे.
उच्छृंखलबंधने न पाळता स्वैर वर्तणूक करणार्या अविवेकी व्यक्तीला उच्छृंखल म्हटले जाते. उत् + शृंखल अशी या शब्दाची फॊड आहे. उत् हा उपसर्ग उलटपक्षी या अर्थाने तेथे वापरला आहे. शृंखल म्हणजे बंधन. त् आणि श् यांचा संधी होऊन च्छ् हे जोडाक्षर तयार होते. उच्छृंखल हा शब्द असाच संधी होऊन बनला आहे. तो उत्शृंखल असा लिहिणे चुकीचे आहे.
उत्स्फूर्तउत्स्फूर्त या शब्दाचा संबंध स्फूर्ती या शब्दाशी आहे. मनात एकाएकी उत्कटपणे प्रकट होऊन व्यक्त होणारा विचार वा केली जाणारी कृती, यांचे वर्णन उत्स्फूर्त या शब्दाने केले जाते. स्फूर्ती म्हणजे स्फुरण; एकाएकी झालेला प्रादुर्भाव. उत्स्फूर्त या शब्दातील जोडाक्षर नीट लक्षात ठेवावे. हा शब्द चुकून 'उस्फूर्त' असा लिहिला जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी त्याची फोड (उत् + स्फूर्त) लक्षात ठेवावी.
उद्दीपनहा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ प्रज्वलन, पेटवणे, जागृत करणे. या शब्दात 'द'ला 'द' जोडून त्याला दुसरी वेलांटी द्यावी. हा तत्सम शब्द असल्यामुळे याचे सामान्यरूप करतानाही मूळ शब्द जसाच्या तसाच लिहावा.
उद्ध्वस्तसमूळ नष्ट झालेले, वाताहत झालेले, या अर्थी उद्ध्वस्त हे विशेषण वापरले जाते. 'उत् + ध्वस्त' अशी या शब्दाची फोड आहे. संधी होऊन 'उत्' मधील 'त्'चा 'द्' होतो. ध्वस्त म्हणजे नष्ट. 'उत्' या अव्ययाचा 'अत्यंत' हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. उद्ध्वस्त हा शब्द अनेक जण चुकून 'उध्वस्त' असा लिहितात. शब्दाची फोड व संधी लक्षात घेतला, तर ही चूक होणार नाही.
उपजीविकाउपजीविका म्हणजे उदरनिर्वाह. या शब्दात जवर दुसरी आणि ववर पहिली वेलांटी आहे. हा शब्द लिहिताना या वेलांट्यांबाबत गल्लत होण्याची शक्यता असते. उपजिविका, उपजिवीका, उपजीवीका असे लिहिण्याच्या चुका होऊ शकतात; त्या टाळाव्यात. उपजीवी अथवा उपजीवक म्हणजे उपजीविका करणारा. (कृष्योपजीवी म्हणजे शेतीवर उपजीविका करणारा.) उपजीव्य म्हणजे निर्वाहाचे साधन. या सर्व शब्दांत जी दीर्घ आहे, हे ध्यानात ठेवावे.
उपाहारउपाहार (उप + आहार) म्हणजे फराळ. (इंग्रजीत 'रिफ्रेशमेंट'.) उपाहारगृह हा शब्द त्यावरुन बनला आहे. त्यात 'उपाहार'ऐवजी 'उपहार' असे चुकीचे लिहिलेले तुम्ही पाहिले असेल. येथे 'पा' चा 'प' झाला, की अर्थ बदलतो. उपहार हा देखील संस्कृत शब्द आहे. त्याचे अनेक अर्थ (भेट, देणगी, आहुती, आरास, आनंद इत्यादी) आहेत. भेट वा देणगी या अर्थी तो हिंदीत वापरला जातो.
पूर्वी सकाळमध्ये आणि नंतर मराठीवर्ल्ड ह्या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या यादीवर आधारित.

Post to Feedनेहमी चुकणारे शब्द..
नका
क्लृप्तीपेक्षा कॣप्त
फरक कळला नाही...
कॢप्ती
स्वर?
शब्दाची यादी
शुचिभूर्त/शुचिर्भूत?
शुचिर्भूत असे हवे
अभ्यासपूर्ण
आशीर्वाद..
हे दुवे लक्षात ठेवा
उत्तरे
रविउदय
अभिउदय चालेल काय?
अतिउत्तम वापरतात.
रव्युदय
संधी होण्याची शक्यता आहे तेथे त
पुन्हा संधी
हा नियम नाही
क्रमवार

Typing help hide