एप्रिल २६ २०१६

जीवलग

    बॉस्टन मध्ये    ऑफिशिअल  स्प्रिंग  जरी सुरू झाला असला तरी हवेतला गारवा आणि झोंबरा वारा काही कमी झाला नव्हता .  न्यू इंग्लंड च्या हवामानाची हीच गंमत आहे .एकेक दिवसात २०  २० डिग्री चा फरक होणाऱ्या या  हवामानाची   ची जशी सगळ्या न्यू इंग्लंड करांना सवय होती तशीच सुमारे ३० वर्षांपूर्वी आलेल्या साठीच्या  गिरीश ना सुद्धा झाली होती . अंगावर कपड्यांचे अनेक थर चढवून , डोक्याला टोपी, मानेभोवती मफलर असा जामानिमा करून रोजच्या प्रमाणे  गिरीश नी  त्यांच्या मॉर्निंग वॉक   स्पेशल  अशा  बागेला ३ मोठ्या फेऱ्या मारल्या आणि आता पाणी प्यायला म्हणून नेहमी प्रमाणे बाकावर येऊन ते बसले .   
         सवयी प्रमाणे  गिरीशने  खिशातला  फोन  काढला आणि whats app ,  फेसबुक इत्यादी श्रद्धा स्थळांना भेटी द्यायला सुरुवात केली . 
फेसबुक   वर त्यांच्या एका जिवलग  मित्राचे  लग्नाच्या वाढदिवसा  निमित्त चे फोटो पाहिले ,  फेसबुक वरून त्या दोघांचे अभिनंदन केले खरे आणि पुन्हा एकदा रोजच्या प्रमाणे त्यांना आपल्याला आयुष्यात जोडीदार नाही याची खंत वाटू लागली .  आयुष्याच्या या टप्प्यावर एखादा तरी पार्टनर  हवा याची पुन्हा एकदा तीव्रतेने जाणीव झाली .३५ वर्षांपूर्वी मूग गिळून बसल्यामुळे केलेली चूक आता पुन्हा करायची नाही असा निर्धार च  त्यांनी केला होता . आणि त्या  मिशन   प्रमाणे गिरीशने  त्यांच्या मित्राच्या सल्ल्यावरून  companion डॉट कॉम वर  रजिस्टर केले आणि त्यावरून setup केलेल्या  पहिल्या  वाहिल्या  डेट  साठी आता  वॉक  नंतर ते सज्ज होते .  आणि तिचीच वाट पाहत आणि हातातल्या फोन वर बातम्या वाचत  बसले होते . तितक्यात एक चापून  चोपून साडी नेसलेली ,पायात बूट , साडीच्याच रंगाचा पण जरा  फँसी  स्कार्फ डोक्याला , आणि वर लाल चुटुक कोट  असा  पेहराव केलेली एक सुंदर स्त्री त्यांच्या समोरून आली आणि शेजारच्या बाकावर बसली इमेलवर ठरवल्याप्रमाणे ठीक दहा वाजता या बागेत एकमेव मेपल ट्री  जवळचा  बाक ! या सगळ्या गोष्टी तिने अगदी बिन चूक लक्षात ठेवून ती इथे भेटीसाठी हजर आहे , हे पाहताच गिरीश  आतून खूपच खूश झाले . आपल्याला जोडीदार पाहिजे याची मनात असलेली   तीव्र इच्छा आणि पहिल्यांदाच असे कोणाला तरी डेट  वर बोलावले असल्यामुळे   गिरीश चांगलेच  उत्साहात  होते.त्यामुळे त्यांनी लगेचच संवादाला सुरुवात केली . 

गिरीश - ' हेलो  ' !म म ! इथे यायला काही त्रास नाही ना झाला ? नाही म्हणजे इतक्या सकाळी थंडीचं !! पण काय करणार मला हीच वेळ बरी पडते. ( हे आख्खे वाक्य गिरीश नि मफलर तोंडावर गुंडाळून बोलल्या मुळे बरेचसे तोंडातल्या तोंडातच विरले आणि त्या स्त्री च्या कानावर नुसतीच वाफ गेली. 
 त्या स्त्री ला गिरीश च्या येण्याची आणि ते तिच्या शेजारी बसल्याची चाहूल लागताच ती गिरीश कडे मागे वळून न पाहताच जरा लाडे लाडेच बोलली " तुम्ही बोलावलंत आणि मी किती अधीर पणे  आजच्या दिवसाची वाट पाहत होते!  ?पण आधी मला सांगा की माझी साडी कशी वाटली तुम्हाला ? 
 गिरीश  -( मनात विचार करू लागले - अगं  बाई !  आधी तो जाड जुड कोट काढ ना ! ) पण असे काही न म्हणता  गिरीश  काहीच न बोलता   शांत बसून राहिले. 
 स्त्री  - अहो ! मी की नाही तुमच्या साठी एक वस्तू आणली आहे . ओळखा  पाहू ? गिरीश चे काहीही उत्तर येण्याआधी तिचे आणखीन प्रश्न सुरू झाले. 
 गिरीश - ओह ! माझ्या साठी ? ( तिच्या या भडिमाराने संभ्रमित, थोडेसे गोंधळलेले गिरीश तोंडावरचा मफलर आवळून बोलत होते. 
स्त्री   - ओळखा  ना पटकन ?
गिरीशना  जरा अवघडल्या सारखे वाटले . पहिल्याच भेटीला इतकी सलगी ! पण नंतर त्यांनी स्वतः च्या मनाची समजूत काढली . की कदाचित हा असा ट्रेंड  असेल सध्या डेट वर जाण्याच्या पद्धतीचा ! म्हणून ते काहीच न बोलता गप्प बसून राहिले .  त्यांचा तोंडावरचा मफलर अजून आवळून !
ती पाठमोरी स्त्री  आता जराशी वैतागून पुन्हा म्हणाली -  हे काहीतरीच बाई ! इथे असं सकाळी सकाळी बोलवायचं आणि मग नुसतं  येऊन  मूग गिळून बसायचं !
 'मूग गिळून' हा शब्द प्रयोग ऐकताच गिरीश ना  अनेक  वर्षांपूर्वी गिळलेले मूग पुन्हा तोंडात आलेत की काय असा भास झाला आणि खरोखरीच त्यांनी  मफलर च्या आतून तोंडात हात घातला ! मूग शोधायला !! आणि ते घाई घाई ने म्हणाले "जरा माझ्याकडे बघून बोलणार का ?  मला माझं  हळवं , प्रेमानं व्याकूळ झालेलं मन मोकळं करता येईल . प्लीज?
मफलरच्या आतून येणारा तो पुरुषी आवाज आणि मधून मधून प्रेम , व्याकूळ असले रोमँटिक  नाटकी शब्द ऐकताच ती स्त्री एकदम न राहवून आणि गिरीश चे बोलणे मध्येच तोडत म्हणाली "मन मोकळं  नंतर ! आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या .बोला  चटचट!  नाहीतर मी अशीच निघेन हं घरी जायला ! तुम्ही आपले बसा मनाचे एक एक पापुद्रे काढत. गिरीश ना  जरा लाजल्या सारखे झाले . त्यांना आपली बायकांशी बोलण्याची स्टाइल  फारच जुनी वाटायला लागली.  गिरीश ना संभ्रम पडला की हिला तू म्हणावं की तुम्ही ! अशा वेळी ते इंग्लिश मध्ये बोललेलं बरं असतं त्यात एकच "you ! म्हणून संबोधलं की झालं ! जास्त शब्दांचा फापट पसाराच नाही .  कशी बशी शब्दांची जुळवाजुळव करून आणि तोंडावरचा मफलर तसाच कायम ठेवून गिरीश म्हणाले "तू  पाठमोरी च इतकी मोहक आणि  सुंदर  दिसतेस की तुझ्या या सौंदर्यात असंच आकंठ डुंबत उरलेले आयुष्य काढावं  असं आता वाटतंय." असं म्हणून ते तिच्या खांद्यावर हात ठेवून तिची मान आपल्याकडे वळवायला लागणार इतक्यात त्यांच्या पाठीवर  जोरदार  थाप पडली . आणि त्यांचा उजवा हात जो; तिच्या खांद्याकडे निघाला होता , तो ; त्या जोरकस थापेच्या धक्क्याने त्यांच्याच डोळ्यावरचा चष्मा खाली सरकला तो आवरायला सरसावला . खडबडून आणि घाबरून गिरीश  दणदणीत थापेच्या मालकाकडे पाहू लागले . जाडजूड कोट घातलेल्या या मानवाचा हात ही चांगलाच जाडजूड आणि वजनदार होता . गिरीशने  बिचकून  त्याच्या कडे कसनुसं पाहिलं . तर तो त्याच्या जाड भुवया उंच करून प्रश्नार्थक नजरेने  गिरीश कडे  पाहत होता . एक हात  अजूनही गिरीशच्या  पाठीवर दुसऱ्या हाताने ' काय चाललंय ?' या अर्थाची खूण त्याने केली . त्यावर गिरीश  पुन्हा कसनुसं हसले आणि त्यांनी त्या बाकावर बसलेल्या  पाठमोऱ्या आकृतीकडे बोट दाखवून हातांनीच 'आमच्या दोघांचं काहीतरी खाजगी चालू आहे ' अशा अर्थाची खूण केली . ते पाहून त्या माणसाने 'म्हणजेच ' मोहन सबनीस ' यांनी गिरीश ना  ' जरा बाजूला ये !' अशी खूण केली आणि दोघेही बाजूच्या उभ्या असलेल्या  मेपल ट्री  जवळ गेले .  मोहन ने गिरीश ना  स्वत:ची, हळूच आवाजात ओळख करून दिली ' मी मोहन सबनीस ! आपण ?'
 ' मी  गिरीश  ! nice to meet you . पण आपण जरा नंतर बोलूयात का? मी जरा  एका महत्त्वाच्या कामात आहे . ' मोहनचा त्याच्यावर प्रतिप्रश्न .  ' कसलं काम ? ' गिरीश ना  खरंतर या वेळी हा 'मोहन ' नामक प्राणी आलेला अजिबात आवडलं नव्हतं . कधी नव्हे ते त्यांच्या प्रेमाची गाडी डुगडुगत का होईना जरा कुठे रुळावर येत होती आणि नेमका मिठाचा खडा पडावा त्याप्रमाणे हा इसम गिरीश आणि त्या बाकावर बसलेल्या रूपवती  यांच्यात येऊन पडला होता . मोहनने पुन्हा एकदा त्याच्या भुवया उंचावत  बोलण्याच्या स्टाइल  मध्ये विचारले ' काय चालू आहे ?'
आता मात्र न राहवून गिरीश ने  मोहनच्या कानात सांगितले ' हे बघा मोहन ! मी आता डेट  वर आलोय . आपण आपला परिचय  आणि सोशलाइजिंग  नंतर करूयात का ? प्लीज  ?' हे ऐकताच मोहन ने पुन्हा एकदा गिरीश चा   हात पकडला .  गिरीश  पुन्हा 'आता काय ?'अशा चेहऱ्याने बघू लागले . मोहनच्या तोंडावर आलेले शब्द त्याने तसेच परतवून लावले आणि तो  गिरीश ना  बेस्ट असे अंगठा वर दाखवून तिथून निघाला . थोडे पुढे गेल्यावर पुन्हा मागे गिरीश  जवळ येऊन त्याने त्यांच्या  हातात एक फुल दिले  आणि तो तिथून गेला . 
  हुश करत गिरीश  परत त्या बाकाजवळ आले , त्यांना वाटले , इतक्या वेळ नुसते बसून ती बिचारी निघून पण गेली असेल . आता ती जर निघत असेल तर तिला तिच्या  कार पर्यंत सोडून यावे आणि जाता जाता तिच्याशी बोलावे असे काही मनसुबे रचत  गिरीश  बाकापाशी आले तेव्हा गिरीश ची 'ती '  उठत च होती तितक्यात गिरीश   तिला  म्हणाले ' अगं बस बस ! सॉरी  हं !अगं माझा मित्र !" पुढे अजून काही गिरीश ने सांगायच्या आत 'ती ' ने पाठमोरीच तिच्या डाव्या हाताची मूठ गिरीश च्या  मांडीवर ठेवली आणि म्हणाली " तुम्ही काही ओळखलं नाहीत ,आता तो बॉक्स   उघडून बघा लवकर ! आणि हो ! मला भूक लागलीय आपण इथूनच त्या dunkin donuts मध्ये जाऊ . गिरीश नी  तो छोटा बॉक्स   उघडला तर  आत चक्क  एक सुंदर निळ्या रंगाचा टाय !
  आता  मात्र गिरीश ना  फारच अवघडल्या सारखे झाले . आणि तिच्या  समोर उभे राहून बोलावे म्हणून  ते बाकावरून उठू लागले इतक्यात तिने तसाच पाठमोरा त्यांचा हात पकडला आणि म्हणाली " आता ते माझ्यासाठी आणलेले फुल तसेच हातात कोमेजवणार आहात की माझ्या केसात घालणार आहात ?"  गिरीशना  एक क्षण वाटले की 'नक्की हिच्या पाठीला डोळे आहेत . माझ्या  हातात त्या मोहन ने कोंबलेले फुल हिला दिसलेच कसे ?
 असो हा हि ट्रेंड आपण विसरलोय  असे वाटून त्यांना तिच्या हुशारीचे आणि मॉडर्न  पणाचे कौतुक च वाटले . आणि त्यांनी हातातले सुंदर गुलाबाचे फुल तिच्या salt - pepper केसांत अडकवले . आणि  आता तिचा चेहरा बघायला अत्यंत आतुर असलेल्या गिरीश ने  तिचे खांदे तिला आपल्याकडे वळवले. गिरीश चा  मफलर त्यांच्या तोंडा भोवती गुंडाळलेला पाहताच तिने एक मिश्किल हास्य केले . आणि ती हसत हसतच म्हणाली " आता तरी काढा की तो मफलर ! " ते ऐकताच 'अनेक वर्षांनी एखाद्या स्त्री ला  अशा  पद्धतीने भेटल्यावर भान हरपलेले गिरीश  भानावर आले . त्यांनी गुंडाळलेला मफलर एका हाताने चष्मा धरून दुसऱ्या हाताने काढला . त्यांनी तो काढला आणि आता आपण  हिला प्रपोज करावे का ?  कसे करावे ? आणि कोणत्या शब्दात करावे या सगळ्याची जुळवाजुळव ते मनात करू लागले . मफलर बाजूला करून आणि  मान वर करून गिरीश ने  तिच्याकडे नजर टाकली मात्र त्यांच्या कानावर एक जोरदार किंकाळी आली . त्या स्त्री चा चेहरा काहीतरी विचित्र प्राणी बघितल्यासारखा दिसत होता आणि ती ताडकन बाकावरून उठून उभी राहिली. गिरीश  काही बोलायला तोंड उघडणार तितक्यात तिची बड बड  सुरू झाली.  ' अहो काही लाज ! माझी आपली एक पाठ होती , पण तुम्हाला तरी कळत होतं  ना ! कमाल च आहे हं तुमची ! "  गिरीश  ना काहीच कळत नव्हते. आता पर्यंत तर गाडी छान सुरळीत चालली होती आणि आता एकदम हिला काय झाले असा मनातला विचार ते तिला बोलून दाखवणार इतक्यात पुन्हा तीच म्हणाली " नाही म्हणजे मला वाटलं की ह्यांनी नेहमीप्रमाणे इथे बोलवलंय  तसं  आज हि आपण इथे जमायचं  आणि मग दिवस एनजॉय   करायचा. "  गिरीश  यावर  पुढे काही बोलणार इतक्यात मोहन  पुन्हा  एकदा तिकडे हजर झाला. मोहन ला पाहताच गिरीश  ना पुन्हा एकदा त्याचा असा काही राग आला की , पण ते काही त्याला सांगायच्या आत च 'ती' स्त्री त्या मोहन जवळ जाऊन उभी राहिली . आणि त्याला उद्देशून म्हणाली " अहो ! हि चेष्टा तुम्ही तर नाही ना केलीत ? तुमचा न चावट पणा  हल्ली दिवसें दिवस वाढत चाललाय. " तेव्हढ्यात मोहन पुढे आला आणि गिरीश ना सगळे स्पष्टीकरण देऊ लागला . "  हेलो  मिस्टर गिरीश  ! घाबरू नका , अहो ही  माझी सुविद्य पत्नी!  शैला सबनीस, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दर वर्षी प्रमाणे आम्ही तो एन्जॉय करणार. " पुढे काही मोहन बोलणार इतक्यात पुन्हा 'ती ' म्हणजे शैला सबनीस नेहमी प्रमाणे मोहन चे बोलणे तोडत म्हणाली ," आम्ही आज  कुठे तरी बाहेर फिरायला  जाणार आणि पूर्ण दिवस मजेत घालवणार  असं ठरवलं होतं. आणि म्हणूनच मी इतकी तयार होऊन आलेय."  मोहन चा चौकस स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देईना म्हणून ते भुवया उंचावत  म्हणाले "पण मला कळले नाही की गिरीश  तुम्ही का आणि कसे बुवा  हिला डेट   वर बोलावलेत ? "
गिरीश ना  हे सगळे ऐकून एक मिनिट काय बोलावे तेच कळेना , पण तरी धीर करून ते म्हणाले " अहो माझा की नाही काही तरी गैर समज झाला , म्हणजे झालं  असं की मी ना companion डॉट कॉम वरून एका स्त्री शी इमेला इमेली करत होतो आणि आज आम्ही हि इथेच भेटायचं ठरवलं होतं , आणि गंमत अशी आहे की ती कशी दिसते ते मला माहीत नाही आणि मी कसा दिसतो ते तिला हि माहीत नाहीय , आम्ही फक्त या मेपल ट्री   जवळच्या बाकावर भेटायचं ठरवलं  आणि तुमच्या सौ ला मी पहिला आणि मला वाटलं  की माझीच " ती " आलीय आणि माझी वाट बघतीय.  सॉरी  हं ! चुकून माझ्याकडून काही कमी अधिक बोललं गेलं असेल तर !! "त्यावर मोहन खळखळून हसायला लागले आणि म्हणाले " अहो ! आमची ही ना जरा वेंधळीच !  गिरीश  बरं ते जाऊ द्या ! तुमची ती डेट वाली कुठे आहे पण ?  काय हो ? " मोहन ने असा खडा सवाल केल्यावर गिरीश  खरंच विचार करू लागले की अरे मग 'ती' कुठेय ?  म्हणून त्यांची नजर इकडे तिकडे भिरभिरू लागली . गिरीश च्या मनात बरेच प्रश्न खदखदत होते.  मोहन ला गिरीश च्या मनातले आणि चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह कळले आणि त्याने खुलासा करायला सुरुवात केली . " त्याचं असं झालं गिरीश ! सध्या आम्ही दोघे हि आमच्या २ मुलांकडे राहतोय . ही माझ्या मुलीकडे आणि मी माझ्या मुलाकडे ! पण आज लग्नाचा वाढदिवस! दरवर्षी प्रमाणे आपण दोघांनी एकत्र घालवायचा.  त्याप्रमाणे मी हिला या बागेत भेटायचे ठरवले. आता दिवस भर आम्ही दोघे मस्त मजा !."  "आणि मग रात्री आमच्या मुला नातवंडाबरोबर पार्टी !" पुन्हा एकदा शैला मोहनचे वाक्य  तोडत म्हणाली .मोहन पुढे म्हणाला " पण मगाशी तुमचा चेहरा इतका आनंदी आणि फुललेला होता की मी म्हटलं पाहू काय होतंय तुमचं आमच्या सौ बरोबर" असे म्हणत मोहन ने डोळे मिचकावत आपल्या प्रिय पत्नी कडे पहिले आणि तिला ढोपराने खुणावले . शैला ने नुसतेच एक प्रेम कटाक्ष टाकला आणि आता निघूया अशी खूण केली .  . मग मोहन ने विषय जास्त न वाढवता गिरीश  च्या पाठीवर मित्रत्वाची थाप टाकत म्हणाले " प्रिय दोस्त गिरीश  ! आता या अशा पद्धतीने का होईना पण आपली मैत्री झालीय. वूड लाइक टू कीप इन टच  आणि   all the BEST ! " असे म्हणत खिशातून स्वत: चे कार्ड दिले . गिरीश  ना आता ची हि पाठीवरची थाप खूप च काही देऊन गेली आणि त्यांनी हि ते कार्ड आपल्या कोट च्या खिशात ठेवले . मोहन आणि शैला ला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि चुकून त्यांच्या हातात आलेलं मोहन चं  गिफ्ट  ही !
   मोहन आणि शैला तिथून निघाले आणि पुन्हा एकदा आपला फोन  कुरवाळत गिरीश  त्या 'ती ' ची वाट पाहू लागले . पुन्हा एकदा नजर इकडे तिकडे फिरवली , सगळे बाक नजरेखालून  घातले पण त्यांना 'ती' म्हणजेच   " लीना बापट " नामक जी स्त्री त्यांना भेटायला येणार होती ती काही दिसली नाही . मनात अनेक उलट सुलट विचार येत होते . तिने ऐनवेळी भेटायला यायचे रद्द तर केले नाही ना  म्हणून ५० वेळा ईमेल  चेक केली.  त्यावर दिलेला फोन नंबर  त्यांनी try  केला पण तो लागत नव्हता. गिरीश  खूपच हवालदिल होत होते, काय करावे काही सुचत नव्हते आणि आता एक मोठा घोळ घातल्या मुळे त्यांच्या तला कॉनफीडन्स  हि कमी झाल्या सारखा वाटत होता . तितक्यात गिरीश ना एक कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या सारखेच सैर भैर होऊन इकडून तिकडे दुडूदुडू पळताना दिसले, त्याला पाहून त्यांना एक क्षणभर त्यांची आणि आपली अवस्था एकच आहे असे वाटले फक्त ते पिल्लू आपल्या मालकाला शोधत होते आणि गिरीश  आपल्या जीवन साथीदाराला !पण दोघांचे ध्येय एकच  होते , आपला म्हणावा असा हक्काच्या माणसाचा शोध ! इतक्यात ते पिल्लू गिरीश च्या पायाशी आले आणि आपली शेपटी त्यांच्या पायावर घासू लागे ,  गिरीश ना खरं तर  कुत्री मांजरी विशेष आवडत नव्हती . त्यामुळे ज्यांच्या घरी कुत्री मांजरी पाळली आहेत अशा मित्रांच्या घरी जायचे ते टाळत. कारण अशा मित्रांकडे गेले की त्या मंडळींचे कुत्रा मांजर पुराण चालू व्हायचे. कोणीही  पाळीव प्राण्यांचे कौतुक करायला लागले की त्यांना पु लं  चे ' मी आणि माझा शत्रू पक्ष ' आठवत असे . त्यामुळे  गिरीश पाळीव प्राणी असलेल्या लोकांपासून चार हात लांब च राहत. आता ते पिल्लू त्यांच्या पायाशी आल्यावर गिरीश  त्याच्यापासून जरा दोन पावले बाजूला झाले. पण ते पिल्लू पुन्हा गिरीश च्या पायाजवळ आले आणि शेपटी घासू लागले. गिरीशने मनातल्या मनात " अरे बाबा ! दुसरे कोणी नाही का मिळालं ? माझ्या मागे काय ? "असा विचार मनात करत, हात हालवत आणि त्याला 'शुक शुक ' करत बाजूला  करायचा केविलवाणा  प्रयत्न केला , पण ते कावरे बावरे झालेले पिल्लू पुन्हा पुन्हा गिरीशच्या अजूनच जवळ जायचा प्रयत्न करू लागले. आता गिरीश  ची चुळबूळ अजूनच वाढली  एकतर ते त्या 'लीना बापट ' ची वाट बघून बघून अगदी कंटाळले होते आणि त्यातच आता पिल्लू त्याचा पिच्छाच सोडत नव्हते . काय करावे ते कळत नव्हते 
 मनातल्या या वैतागाने ,त्या बिचाऱ्या पिल्लाला उगीचच बडवून काढावे असे हि त्यांच्या मनात आले पण ही  अमेरिका आहे , इथे  लोक माणसांपेक्षा कुत्र्यांवर जास्त  प्रेम करतात, त्यामुळे असले काहीही विचार मनात सुद्धा आणून उपयोग नाही हे त्यांच्या वेळीच लक्षात आले. त्या कुत्र्याचा मालक दिसतो का म्हणून त्यांनी नजर फिरवण्यासाठी पुन्हा एकदा स्वत: भोवतीच एक गोल गिरकी घेतली तर लगेच त्या पिल्लाने देखील त्यांच्या सारखी गिरकी घेतली. जणू काही त्या पिल्लाला तो खेळच वाटत होता . शेवटी आता काही ती 'लीना बापट ' येत नाही असा विचार करून ते घरी जाण्यासाठी पार्किंग लॉट  कडे जायला लागले. बागेच्या दारापर्यंत ते चालत आले. आता गिरीश ची नजर  'लीना बापट ' च्या ऐवजी त्या पिल्लाच्या मालकाला  ला शोधत होती. कारण ते बिचारे  गोंडस पिल्लू त्यांच्या मागे पळत पळत आता इथपर्यंत आले होते. त्या पिल्लापासून छुटकारा मिळण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा गिरकी घेतली. इतक्यात ' फझी   ए फझी ' असा एक आवाज त्यांना लांबून आला. म्हणून त्यांनी वळून पहिले , तर त्या दिशेने एक स्त्री ' फझी  फझी ' अशी हाका मारत आणि धापा टाकत  त्यांच्यापाशी आली.  स्वेट शर्ट  आणि  ट्रॅक पॅंट आणि कानाला इअर मफ  घातलेली आणि एका हातात कुत्र्याचा पट्टा घेतलेली ती स्त्री त्या पिल्लाजवळ आली , तिने पटकन वाकून त्या पिल्लाला उचलून घेतले. हातात घेतल्या घेतल्या  त्या पिल्लाला कुरवाळत ती त्याच्याशी बोलू लागली " कुठे पळालास माझी नजर चुकवून हं ? किती शोधलं मी तुला ? आता अजिबात जाऊन देणार नाही. कळलं ? " ही सगळी वाक्य तिने एका दमात म्हटली ती ऐकून गिरीशनाच  दम लागला. कुत्र्याशी गुजगोष्टी करून झाल्यावर तिने मान वर करून गिरीश  कडे पहिले आणि म्हटले " सॉरी आणि  थॅंक यू  . I could find him because of you. थॅंक यू सो मच  ! लीना हियर ! असं म्हणून तिने तिचा हात पुढे केला , लीना हे नाव ऐकताच गिरीशच्या  डोक्यात लख्ख वीज चमकली आणि ते म्हणाले ' ओह ! नाईस टू सी यू !  गिरीश  आपटे .१० वाजता भेटायचं ठरलं होतं ना ! त्यावर लीना म्हणाली "actually माझी फ्रेंड  जरा ,"  तिचे ते वाक्य तोडत गिरीश भरभरून बोलायलाच लागले . त्यांना कधी एकदा या स्त्री ला आपली जीवन कहाणी सांगेन असे झाले होते . लीना  पुन्हा एकदा " सॉरी  हं आम्हाला उशीर झाला . रियली सॉरी  !परत तिला तोडत गिरीश म्हणाले " नो प्रॉब्लेम ! मी पण आताच आलो आहे . गिरीश ला तिच्या सॉरी सॉरी  या पालुपदाला आळा घालून मुख्य मुद्द्याला हात घालायचा होता . मग गिरीश ने तिला शेजारीच असलेल्या विस्तीर्ण अशा  मॅग्नोलीया  ट्री  खाली असलेल्या बाकावर बसण्याची खूण केली आणि ते स्वत: हि जाऊन बसले . झाडाच्या मस्त टवटवीत गुलाबी रंगांच्या फुलांकडे पाहत जणू ते त्यांच्या हि टवटवीत तारुण्यात पोचले आणि बोलू लागले .  " तशी तुम्हाला माझी इतर माहिती त्या वेब साईट  वरून मिळालीच आहे . त्याचं काय आहे , अलीकडे ना हा एकटे पण खूपच जाणवायला लागलाय . आणि सारखे असे वाटते की आपल्या बरोबर आपली सुख दुःखे share  करायला हक्काचे असे कोणीतरी पाहिजे. म्हणून ही उठाठेव. तसं कॉलेज मध्ये असताना माझं एक मुलगी मला  खूप खूप आवडायची आणि लग्न करीन तर हिच्याशीच अस मनात ठरवून पण टाकले होते . पण आमचा संकोची स्वभाव आड आला आणि जो पर्यंत तिच्याशी बोलायचं , तिचं  नाव विचारायचं आणि गोष्टी पुढे न्यायचं  बळ आलं  तो पर्यंत ती दुसऱ्या  कोणाची होणार अशी बातमी येऊन ठेपली. त्यांनंतर इकडे अमेरिकेला शिकण्याकरता आलो . मग शिक्षण , नोकरी याच्या मागे लग्नाचं सो  कॉल्ड वय आलं कधी आणि गेलं कधी तेच कळलं नाही. पण जेव्हा जेव्हा भारतात जायचो आणि माझ्या लग्नाचा विषय निघायचा तेव्हा मला ती च डोळ्यासमोर यायची . "  गिरीश ची ती गोष्ट ऐकून आता आपण सगळे सांगून टाकावे म्हणून इतका वेळ बाकाच्या शेजारी फझी  ला घेऊन उभी असलेली लीना गिरीशच्या जवळ बसली . तिला आता गिरीश बद्दल फारच आपुलकी वाटू लागली. गिरीश आणि लीनाचा मिलाफ व्हायलाच पाहिजे असे प्रकर्षाने जाणवू लागले . 
      लीना बापट नामक मुलीच्या  बाबतीतही तिला तिचा जोडीदार मिळता मिळता राहिला होता . कॉलेज संपता संपता लीनाचे  लग्न ठरले,  दिलीप साठे नावाच्या एका हुशार , बुद्धिवान , 
हँडसम अशा साइंटीस्ट शी. चांगला परिचय झाला , मुलाचे घर , घरातली माणसे सगळे काही छान होते . कॉलेज च्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी साखरपुडा ही झाला . लीना आणि तिचा होणारा नवरा दोघेही खूप खूश होतो, त्यानंतर एखादे वूड बी  जोडपे जसे करेल तसेच ते दोघे  बरेच ठिकाणी एकत्र फिरले , ते दिवस म्हणजे दोन्ही राजा राणी न अगदी स्वप्नातल्या सारखे होते,  दोघे तासंतास चालत जायचे  , वेगवेगळी निसर्गरम्य ठिकाणे बघायचे  , अनेक वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायचे . त्याच दरम्यान दिलीप चे त्याच्या  बायोमेडिकल रिसर्च साठी रशिया ला जायचे ठरत होते. आणि त्याला त्या सेंटर  चे बोलावणे आले आणि तो १५ दिवसात च रशिया ला जायला निघाला. लीनाशी ठरलेले  लग्न; तो रशिया हून सुट्टी करता आला की करायचे असे  planning झाले. आणि तो रशिया ला रवाना झाला. त्यानंतर काही दिवस , महिने  पत्र आणि फोन वरून होत असलेले त्यांचे कम्युनिकेशन  पुढे पुढे  कमी होत गेले . दिलीप आता पुढचे १-२ वर्ष तरी भारतात येऊ शकत नाही त्यामुळे लीनाने दुसरा एखादा जोडीदार शोधून लग्न करावे असे मोकळेपणाने लिहिलेले पत्र लीनाला एक मोठा धक्का देऊन गेले होते त्याच दरम्यान अमेरिकेत लीना ला MS साठी admission मिळाली आणि लीना चे पाऊल इकडे अमेरिकेत   रोवले गेले, कधीही लग्न न करण्याच्या निश्चयाने . !
      इतक्यात  विचारमग्न लीनाच्या हातून हा फझी  कधी पुन्हा सुटून गेला ते ही तिला कळले नाही . फझी  पळाला म्हणून गिरीश ताडकन उठून त्याच्या मागे पळत सुटले. कुत्री विशेष आवडत नसली तरी आता लीना ला खूश करायला , तिच्यावर इम्प्रेशन  मारायला गिरीशना त्या कुत्र्याशी लगट करणे भागच होते . पण फझी  जोरात पळत एका दुसऱ्या  व्यक्तीच्या पायाशी जाऊन उभा राहिला.. फझी ला हातात पकडण्यासाठी म्हणून गिरीश आणि ती व्यक्ती दोघेही एकाच वेळी खाली वाकले. दोघांची डोकी एकमेकांवर आपटली. आणि दोघे हि डोक्याला हात लावत सरळ उभे राहून एकाच वेळी "सॉरी  ! " म्हणाले . गिरीश ने समोर पहिले आणि त्यांचा आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही .  समोर सुंदर लेमन  रंगाचा कुर्ता त्यावर छोटेसे मोत्याचे पेंडंट  असलेले गळ्यातले , कुर्त्यावर त्याच रंगाचा  स्वेटर , जीन्स , आणि गार वाऱ्यापासून कान झाकण्यासाठी क्रीम कलर चे इयर मफस ! असा सिंपल  पण  स्वीट पेहराव केलेला चेहरा ! हाच चेहरा ज्याच्या कडे नुसते बघत, एकतर्फी प्रेम करत त्यांनी कॉलेज चे दिवस काढले होते.  हाच चेहरा - जिच्या कडे पाहिल्यावर - लग्न करीन तर हिच्याशीच अशा निश्चय त्यांनी मनातल्या मनातच केला होता . आणि हाच चेहरा जिच्या मुळे आज वर गिरीश बिन लग्नाचे राहिले होते . आणि आता तोच चेहरा असा अचानक समोर येताच  गिरीश पुन्हा एकदा गडबडले . आज आपल्या आयुष्यात  एक नाही दोन नाही तीन तीन बायका! हा  नुसताच भास आहे की काय असे त्यांना वाटायला लागले . आपण स्वप्नात तर नाही न हे तपासायला त्यांनी स्वत: लाच एक जोरदार चिमटा ही काढला. गिरीश पुतळ्या प्रमाणे एकदम स्तब्ध उभे होते , त्यांना खरं तर तिच्या शी खूप बोलावेसे वाटत होते पण एक शब्द ही बाहेर पडत नव्हता . 
   इतक्यात नेहमीप्रमाणे फझी  च्या मागे धापा टाकत लीना पळत पळत तिथे आली तिने फझी ला आपल्या दोन्ही हातांनी पकडले आणि म्हणाली " आता बरा सापडलास ! सारखा कसा हातातून निसटतोस रे ? जा आता मी तुझ्या गळ्यात बेल्ट च बांधते म्हणजे कायम माझ्या बरोबर राहशील . " असे म्हणत तिने प्रेमाने त्याला जवळ घेऊन त्याचा बेल्ट बांधला . पण तिला ही मात्र पक्की खात्री होती की फझी  कितीही दूर पळाला तरी  तो आपल्या माणसाकडेच जाऊन  थांबतो! लीना ने पटकन फझी  ला बांधून आपल्या हातात घेतले आणि गिरीश कडे पाहत ती म्हणाली " मिस्टर गिरीश ! मी माझ्या मैत्रिणी ची ओळख करून देते. हि लीना बापट!" गिरीश आता पूर्णपणे चक्रावून गेले होते. आपल्या साध्या सरळ आयुष्यात अचानक एकाच दिवशी अनेक विविध प्रकारचे धक्के बसतायत आणि या सगळ्याला आपण सामोरे जायला तयार आहोत का असा विचार करू लागले . गिरीश च्या चेहऱ्या वरचा एकाच वेळी असलेले प्रश्नचिन्ह , आश्चर्य आणि आनंद या सगळ्या भावना या लीना ने टिपल्या आणि ती लगेच हसत म्हणाली " अ ! मगाशी तुम्ही मला लीना बापट म्हणून तुमची सगळी कहाणी सांगितलीत खरी पण मी लीना ! लीना नाडकर्णी आणि माझी नाव भगिनी आणि अमेरिकेत आल्या पासून ची जीवाभावाची मैत्रीण म्हणजे ही लीना बापट ! हिचेच नाव आम्ही companion डॉट कॉम  वर नोंदवले होते . खरंतर लीना अजिबात या गोष्टी साठी तयार च नव्हती पण मी आणि माझा नवरा हिच्या इतके मागे लागलो की शेवटी लीना ने आज इथे यायचे कबूल केले ." असे म्हणत लीना नाडकर्णी लीना बापट कडे बघत म्हणाली " Thank  God लीना ! तू आलीस. " इतका वेळ नुसतीच शांत उभी असलेली ' लीना बापट ' आपल्या हळुवार आवाजात म्हणाली " दोस्तीत Thank you आणि सॉरी   ला अजिबात जागा नसते   मॅडम  ! प्लेझर इज माइन डियर  !" लीना बापट चा तिच्या सारखाच सुंदर आवाज ऐकून गिरीश तिच्या कडे एकटक पाहत च राहिले आणि लीना ने दोस्ती करता समोर केलेला हात , हातात घ्यायचे ही त्यांच्या लक्षात आले नाही.आता खरोखरी गिरीश ची  लीना त्यांना  म्हणाली " हेलो  मिस्टर गिरीश ! नाईस टू मीट यू  ! आता पुन्हा माझे नाव वगैरे सांगत बसत नाही.पण इफ यू डोंट माइंड  , आपण  वॉक  घेत पुढच्या गप्पा मारायच्या का ? " तिच्या या बोलण्याने गिरीश भानावर आले आणि तिला " हो ! हो ! नक्की !" असे म्हणत तिला हस्तांदोलन दिले .
    आणि आता लीना नाडकर्णी ला पुन्हा एकदा धन्यवाद देत गिरीश आणि लीना बापट समोर पसरलेल्या ट्यूलिप च्या ताटव्या च्या दिशेने चालू लागले.
    

Post to Feed
Typing help hide