गडचिरोली - एक वृत्तांत

धनकवडी येथील आदर्श मंडळातर्फे गडचिरोली येथील पोलिस दलासाठी आकाश दर्शन कार्यक्रम  नुकताच पार पडला. ह्या कार्यक्रमास सहायक म्हणून जाण्याचा योग मला आला. ह्या निमित्तानं आपल्या पोलिस दलाची सेवा करण्याची संधी तर मिळालीच, पण त्या बरोबरच गडचिरोली आणि सभोवतालच्या गावांमध्ये असणारी परिस्थिती सुद्धा समजून घेता आली.

आदर्श मंडळातर्फे काही दिवसांपूर्वी येथील पोलिस दलास एक अद्ययावत दुर्बीण (टेलिस्कोप) भेट देण्यात आली. आमच्या दौऱ्यामागील प्रमुख उद्देश हा जवानांना रात्रीच्या आकाशाची माहिती देणे आणि दुर्बीण वापरण्यास शिकवणे हा होता. पुढे पोलिस दलामार्फत गावागावांत जाऊन आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. त्या निमित्तानं गावांतील लोकांशी संपर्क वाढवणे, गावांतील हालचालींवर लक्ष ठेवणे अशी अनेक प्रयोजने असावीत.

शनिवारी सकाळी आम्ही चंद्रपुरात पोचलो. येथील उड्डाणपूल, विकसित एम. आय. डी. सी, मोठ्या कंपन्या आणि विस्तीर्ण रस्ते पाहिल्यावर समजतं की आपल्या कल्पनेपेक्षा चंद्रपूर भरपूर विकसित आहे. चंद्रपूर ते गडचिरोली हे दोन तासांचे अंतर कापून आम्ही दुपारी गडचिरोली येथे पोचलो. वाटेत दुतर्फा पसरलेले विस्तीर्ण जंगल, आणि त्यामध्ये ठराविक अंतरावर छोटी छोटी गावे लक्षात घेता हा प्रदेश लपण्यासाठी आणि नक्षली कारवाया करण्यासाठी फारच सोयीचा झाला आहे. त्याच वेळेस पोलिसांचे कार्य किती अवघड आहे ह्याची कल्पना येऊ शकते.
गडचिरोली मध्ये पोचल्यावर पोलिस दलातर्फे संदीपजी वाघमारे आम्हाला न्यायला आले होते. स्वाभाविकपणे आमचा पहिला प्रश्न हाच होता की
"नक्षली लोकांचा धोका आणि दहशत इथे किती प्रमाणात आहे? "
संदीपजींच्या बोलण्यातून समजलं की आदल्या दिवशीच चार लोकांना उचलून नेण्यात आलं होतं, आणि त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला होता. हे ऐकून आमचे धाबे दणाणले.

काही मिनटात आम्ही पोलिसांच्या मुख्यालयात पोचलो. खरोखर ह्याला तर आधुनिक युगातील  बालेकिल्लाच म्हणावा लागेल. प्रचंड विस्तार असलेली जागा, त्याला ८-१० फूट उंचीची तटबंदी, त्यावर काटेरी तारा, दर ठराविक अंतरावर एक दरवाजा. दरवाजाच्या दुतर्फा चौक्या, आणि त्यात प्रत्येकी दोन  सशत्र पहारेकरी! दरवाज्यात गाडी येऊन थांबली तरी काही सेकंद दार उघडले नाही. मग लक्षात आलं की डावीकडे भिंतीमध्ये असलेल्या एका फटीतून आमच्यावर नजर फिरवली जात आहे. काही सेकंदांनी दार उघडलं आणि आम्ही आत गेलो.

संध्याकाळी आकाश दर्शन कार्यक्रम उत्तम पार पडला. आम्ही प्रेस रूम मध्ये दाखल झालो तेव्हा सर्व जवान आपापल्या जागेवर बसलेले होते. येथील मुख्य पोलिस अधिकारी मा. कवडे साहेब आल्यावर कार्यक्रम सुरू झाला. पडद्यावर आम्ही एक विडीयो आणि काही स्लाइड दाखवल्या. ते बघताना जवानांच्या चेहऱ्यावर प्रचंड कुतूहल जाणवत होतं. त्यांना गुरु आणि शनी ग्रहांची माहिती देण्यात आली. त्यानंतर बाहेर मैदानातून आकाशातील दिशा कश्या ओळखायच्या ते सांगितलं. काही नक्षत्रांची आणि ताऱ्यांची माहिती देण्यात आली. दुर्बिणीमधून चंद्रावरील खड्डे, तसेच गुरु ग्रह आणि त्याचे चंद्र दाखवण्यात आले. चार लोकांचा एक चमू खास दुर्बिणीबद्दल माहिती घेण्यासाठी नेमण्यात आला होता. आम्ही त्यांना माहिती देऊन त्याच्याकडून प्रात्यक्षिक सुद्धा करून घेतलं. कार्यक्रम उत्तम पार पडला.
मा. कवडे साहेबांनी खूश होऊन दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांच्या घरी नाश्त्याला बोलावलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी कवडे साहेबांच्या घरी गेलो. त्यांच्याशी गप्पा मारल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. थोडक्यात सारांश असा -
नक्षलवाद्यांनी ह्या भागात बऱ्यापैकी दहशत पसरवलेली आहे. ह्यांच्या हालचाली रात्रीच होतात. प्रसंगी एखाद्या गावात घुसून ते लपून बसतात. आपल्या पोलिस यंत्रणेसारखीच त्यांचीही यंत्रणा असते. त्यांचेही गुप्तहेर गावा-गावांत असतात. नक्षलवाद्यांकडेही अद्ययावत शस्त्र आणि इतर सामुग्री आहे. १०-१२ वर्षांच्या पोरांना उचलून नेऊन त्यांना अनेक वर्ष ट्रेनिंग देऊन पक्कं तयार करण्यात येतं. एका नक्षल वाद्याचा मासिक खर्च हा १२०० ते १५०० रुपये इतकाच असतो. ते दाट जंगलातच तंबू टाकून राहतात. घनदाट जंगलामुळे गूगल नकाशे, ड्रोन कॅमेरा अश्या गोष्टींचा फारसा उपयोग होत नाही. नक्षलांनी कोणाला पकडून नेलं, तर तो जिवंत परत येण्याची शक्यता फार फार कमी. नक्षलवादी शक्यतो गोळ्या घालत नाहीत, तर गळा चिरून मारतात.  'माइन्स' लावून पोलिसांच्या अनेक गाड्या उडवून लावल्या आहेत. ह्या भीतीने पोलिसांच्या गाडीवर लाल दिवा अथवा तत्सम वस्तू लावता येत नाहीत. लोकांमध्येही प्रचंड दहशत आहे. जीवाच्या भीतीने लोक पोलिसांना सहकार्य करत नाहीत. त्यामुळे शोध कार्यात मोठा अडथळा येतो. नक्षल वाद्याला पकडून दिल्यास अथवा पोलिसांना मदत केल्यास सरकारने लाखो रुपये इनाम लावलेला आहे.
येथील पोलिसांच्या कारवाई मध्ये सरकारचा किंवा नेते मंडळींचा अजिबात हस्तक्षेप होत नाही. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड भागातील जंगलात नक्षलवादी लपून बसतात.
कबीर कलामंच ही काय चीज आहे ते वाचून-ऐकून माहिती होताच. शीतल साठे भूमिगत असताना इथेच जंगलात वास्तव्यास होती अशीही माहिती ह्या निमित्तानं मिळाली. राजकारणातील कम्युनिस्ट पक्षातील लोकांचे येथील नक्षलवाद्यांशी छुपे संबंध असल्याचे धागेदोरेही सापडले आहेत असं समजलं. नक्षल लोकांच्यात जवळपास तीस ते चाळीस टक्के महिला आहेत अशीही माहिती मिळाली. शक्य तेव्हडी माहिती आम्हाला साहेबांनी समजावून सांगितली.

असं असूनही ह्या भागात लाखो लोक राहत आहेत. गडचिरोली हे एक मोठे शहर आहे. सरकारच्या अनेक सुविधा येथे पोचत आहेत. त्यावरून परिस्थिती इतकी वाईट नक्कीच नाही हे समजतं. पोलिसांना अद्ययावत शस्त्र सामुग्री आणि उपकरणे उपलब्ध आहेत. नक्षली कारवाया आटोक्यात आलेल्या आहेत. पुण्याच्या एका पोलिस चौकीत दिवसाला जितक्या तक्रारी दाखल होतात, त्यापेक्षा कमी तक्रारी संपूर्ण महिन्याभरात येथील चौक्यांमध्ये येतात असं आकडेवारी सांगते. येथील नक्षली कारवायांत बळी पडणाऱ्या लोकांची संख्या पुणे-मुंबई मधल्या खून-मारामाऱ्यांत मरणाऱ्या संख्येपेक्षा बरीच कमीच आहे!

येथील पोलिसांची आणि त्यायोगे  देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. पोलिसांनी आमची सर्व व्यवस्था अगदी उत्तम लावली होती. आमच्या रूम च्या चाव्या देणाऱ्यापासून ते अगदी ताटामध्ये जेवण वाढणारे हे सर्व पोलिसच होते! ह्या सर्वांचा मी खरंच खूप आभारी आहे. ह्या सर्वांबद्दल प्रचंड आदरभाव निर्माण झाला. नवीन ओळखी झाल्या आणि मित्र मिळाले. अनमोल असा अनुभव मिळाला.

आपल्याला माहीत असलेली आणि प्रत्यक्ष असलेली गडचिरोली फार वेगळी आहे. बातम्या आणि चर्चांमध्ये असलेली गडचिरोली हा ह्या शहराचा फक्त एक भाग आहे. त्यामुळे खराब झालेलं ह्या शहराचं नाव हे दुर्दैवच म्हणावं लागेल!