माणसे, विश्वास, काम

     जीवन जगताना आपल्याला अमक्याची अमक्या ठिकाणी ओळख आहे,  अमक्यामुळे काम नक्की होणार  असे सांगितले जाते. काही जण अशा माणसांच्या बाबतीत - यांच्या शब्दाला फार मान आहे  - असे सांगतात. काही ओळखीच्या माणसांमुळे काम होणार, असे नक्की वाटू लागते. प्रत्यक्षात अनुभव येतो तो वेगळाच. 
    एकदा एके ठिकाणी अर्ज केला होता. ज्या मध्यस्थाकरवी मी अर्ज केला होता तो छातीठोकपणे सांगत होता- येथील एका निवृत्त ज्येष्ठांच्या शब्दाला येथे मान आहे. तुम्ही त्यांच्या परिचयात असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकेल - मी त्या व्यक्तीशी परिचित होतो. मुलाखत न घेताच निवड व्हावी अशी माझी बिल्कुल अपेक्षा नव्हती. तसेच मुलाखत चांगली दिली नाही तरीही त्या व्यक्तीने माझी शिफारस करावी, असेही अपेक्षित नव्हते. संबंधित ज्येष्ठ व्यक्तीने त्या संस्थेत दीर्घ काळ काम केले होते. तेथील लोक त्यांना मानत होते. जेव्हा मला मुलाखतीला बोलावले गेले तेव्हा माझ्याव्यतिरिक्त खूप उमेदवार मुलाखतीकरिता आल्याचे दिसले. तेव्हाच, माझ्या निवडीची शक्यता धूसर झाली. मुलाखत घेणाऱ्या पॅनलमधे ही व्यक्ती नव्हती. नंतरही कधी ही व्यक्ती त्या संस्थेच्या आवारात दिसली नाही. नवल वाटले. हे पॅनल  वरून कोठून तरी आलेले असते, मुलाखतीची पध्दत- मुलाखत घेण्यास कोण असावे - अंतिम निर्णय या बाबी पॅनलच ठरवते, असे निरीक्षणांती व थोड्या चौकशीअंती समजले. संस्था सोडून गेलेल्यांना फार किंमत नाही, असे दिसले.  
   एका मनुष्यबळ विकास विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याशी चांगली ओळख होती. कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच अडचणी सोडवणे, किमान ऐकून तरी घेणे एवढे या विभागाच्या अखत्यारीत नक्की असते. हे अधिकारी गप्पा मारायला अगदी मोकळे होते. त्यांच्याकडून अडचणी सोडवल्या जातील असा विश्वास वाटावा, असे त्यांचे वागणे होते. प्रशिक्षण देण्यात कुशल होते. अनेक अडचणी त्यांनी सोडवायचा प्रयत्नही केला होता.  ही अडचण यांच्याकडून सोडवली जाणारच, असे काही बाबतीत वाटले पण प्रत्यक्षात त्यांची हतबलता दिसून आली.
   एका नातेवाईकाकडे गेलो असताना एका मित्राची सहजच नोकरीविषयक समस्या सांगितली. मित्राला या नातेवाईकाच्या कंपनीत नोकरी मिळाल्यास आनंद होणार होता. नातेवाईकाने ताबडतोब बायोडेटा पाठवायला सांगितला. आपल्या सहकाऱ्याशी चर्चा केली. एकदम उत्साहवर्धक चित्र तयार झाले. मित्रही उत्साहित झाला. काही दिवसांनी कळले की, पुढे काहीच होणार नाही.

   असे काही अनुभव. गंमतीदार तसेच उत्साहावर पाणी फिरविणारे. एखाद्याचे मनात उभे केलेले चित्र अशा अनुभवांमुळे बदलून जाते. कशाच्या आधारावर लोकांनी अशांची शिफारस केली,  आपण  संबंधितांकडून  जास्तच अपेक्षा केली होती का असे असंख्य प्रश्न अशा अनुभवांमुळे मनात उमटून जातात. अर्थात, आपला घटनांचा पूर्ण अभ्यास झालेला नसतो. आपल्याला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी या घटनांच्या मागे असू शकतात.